जबाबदारीचे भान गरजेचे

    दिनांक :15-Aug-2019
मीरा टोळे 
9225233263 
 
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो, मनासारखे वागू शकतो, आपल्याला हवे ते करू शकतो. परंतु हे स्वातंत्र्य उपभोगत असताना ज्यांनी याकरिता हालअपेष्टा सोसून हा सुदिन आपल्याकरिता आणला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. इतक्या कष्टाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी आपलीच आहे. 

 
 
आज आपण मुक्त स्वातंत्र्य उपभोगतो आहे. कुठल्याही प्रकारचे बंधन आपल्यावर नाही. पण हे करत असताना आपल्याला नैतिक जबाबदार्‍यांचेही भान ठेवायला हवे. विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती जागवण्याचे संस्कार शाळांमधून होतातच. परंतु ते कायम राखणे आपले राष्ट्रकर्तव्य आहे.
 
15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्रध्वजाला मानवंदना देतो. विशेषतः युवांमध्ये या दिवशी विशेष उत्साह असतो. ठिकठिकाणी युवा वर्ग एकत्र येऊन अभिमानाने तिरंगा खांद्यावर घेऊन रॅलीमध्ये सहभागी होतो. भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या घोषणांनी शहर दुमदुमते. अतिशय उत्साहाने ते आपल्यातील राष्ट्रप्रेम व्यक्त करतात, ही चांगली गोष्ट आहे. परंतु याचबरोबर समाजभान राखणे हे देखील आपले कर्तव्य आहे. रस्त्याने वेगाने गाड्या चालविणे, रस्त्यांवर थुंकणे, कचरा फेकणे, ध्वनिप्रदूषण करणे या सवयी आपण बदलायला हव्यात. देशातील व्यवस्था सुचारू पद्धतीने चालावी याकरिता सरकारतर्फे वेळोवेळी नियम, कायदे तयार केले जातात. आपण त्याचे पालन करतो का? याबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा, मग ती हेल्मेटसक्ती असो की स्वच्छता अभियान असो. देशहिताकरिता आपण काय करतो? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण सुरक्षित राहावे याकरिता आपले सैनिक कुठल्याही संकटाची पर्वा न करता सीमेवर दिवस-रात्र, प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे रक्षण करतात. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करायला हवा. युवा शक्ती एकवटली आणि तिला योग्य दिशा मिळाली तर संपूर्ण जगात भारताची मान उंचावेल.
 
गरिबी, कुपोषण, भ्रष्टाचार, हिंसाचार, महागाई, जातीयवाद, स्त्री-पुरुष असमानता आदी समस्यांपासून भारत मुक्त होणे हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ होय. तेव्हा स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनी मिळून स्वतःबरोबरच देशहिताचा विचार करूया.