‘सेक्रेड गेम्स २’ ला पायरसीचा फटका

    दिनांक :16-Aug-2019
गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांना ज्या वेब सीरिजची प्रचंड उत्सुकता होता. ती ‘सेक्रेड गेम्स २’ १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. मध्यरात्री १२ वाजता ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा रंगली. नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजला केवळ देशातच नाही, तर विदेशातही चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. मात्र या सीरिजला पायरसीचा फटका बसला आहे. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही काळातच लीक झाली आहे.
 
 
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ तामिळरॉकर्स या वेबसाईटवरुन लीक झाली आहे. भारतात तामिळरॉकर्स ही वेबसाईट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. तामिळरॉकर्सने ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनची एचडी प्रिंट ऑनलाइन लीक केली आहे.
नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत. या सीरिजचा भारतात सर्वाधिक चाहता वर्ग आहे. त्यामुळे ही सीरिज लीक झाल्याचा परिणाम त्याच्या कमाईवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तामिळरॉकर्स यांनी यापूर्वी ‘गेम ऑफ थ्रोन्स’देखील ऑनलाइन लीक केला होता. इतकंच नाही तर २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नारकोस’ ही सीरिजदेखील लीक झाली होती.