राखी पौर्णिमेसाठी जाताना काळाचा घाला

    दिनांक :16-Aug-2019
सातगाव भुसारी येथील २ तरुणांचा अपघाती मृत्यू तर १ गंभीर जखमी
चिखली,  राखी पौर्णिमेसाठी चिखली येथून नाशिक जाणाऱ्या तिघांची स्विफ्ट कार (एम एच २० सी एस ४९२३) औरंगाबाद -नाशिक रोडवरील जांभाळा गावानजिक उभ्या ट्रकवर (जी जे १० एक्स ७१५७) आदळून भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एका गंभीर जखमीवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये  उपचार सुरू आहेत.

 
चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील हे तीन तरुण आहेत. परमेश्वर ज्ञानेश्वर सोनाळकर, उमेश राजू कोलते आणि आकाश कैलास ठोंबरे अशी त्यांची नावे आहेत. उमेश कोलते यांची बहीण नाशिक येथे राहते. राखी पौर्णिमेनिमित्त नाशिकला जाण्यासाठी हे तिघे बुधवारी सकाळी कारमधून सातगाव भुसारी वरून निघाले होते. जांभाळा फाट्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला या तिघांची कार धडकली. या भीषण अपघातात कार ट्रकच्या खाली अडकली होती. यामध्ये परमेश्वर सोनाळकर आणि उमेश कोलते यांचा जागीच मृत्यू झाला. दौलताबाद पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आकाश ठोंबरे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुगणालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. दोन्ही वाहने क्रेनद्वारे वेगळी करण्यात आली. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या बाबत पुढील तपास दौलताबाद पोलीस स्टेशन चे एएसआय एम. एस. पवार करीत आहे.