रसिक सुजाण आहेत...?

    दिनांक :17-Aug-2019
चौफेर
सुनील कुहीकर
स्मशानघाटावर लाकडं तोडून, प्रेतं जाळायला सरण रचून देण्याचा, परंपरेने वाट्याला आलेला ‘व्यवसाय’ करण्यास नकार देणार्‍या एका छोकर्‍याचा, स्वत:शी, आपल्या कुटुंबाशी अन्‌ समाजाशीही चाललेला संघर्ष टिपणारा एक चित्रपट... ढीगभर पुरस्कारांचा मानकरी ठरला, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची माळही गळ्यात पडली, तरी मायबाप रसिक काही फिरकत नाहीत त्या चित्रपटाकडे. किती वेगवेगळ्या विषयांवरचे मराठी चित्रपट आलेत मध्यंतरीच्या काळात? विषयाची निवड, कथानकाची मांडणी, कलावंतांचा अभिनय, सर्वच दृष्टीने एकाहून एक अशा सरस कलाकृती सादर झाल्यात. पण सैराटचा अपवाद वगळला, तर कमाई नाही करता आली कुणालाच. का घडले असेल असे? दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी या संदर्भात उपस्थित केलेली खंत रसिकांच्या सजगतेवर, सुजाणतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ‘धग’सारखा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरतो. ‘हलाल’मधून वेगळ्या धाटणीची मांडणी होते. ‘भोंगा’सारख्या चित्रपटाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते, तरीही हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या ‘सफल’ गणले जात नाहीत. कारण पुरस्कार मिळाले तरी पैसा मिळत नाही अन्‌ वास्तव हे आहे, की नुसत्या पुरस्काराने पोट भरत नाही...!
 
 
 


 
 
भारतीय चित्रसृष्टीत एक हजाराहून अधिक चित्रपट वर्षाकाठी तयार होतात. त्यातील बहुतांश चित्रपट तर फक्त ‘तयार’ होतात. ते प्रदर्शित कधीच होत नाहीत. प्रेक्षकांपर्यंत तर अजीबात पोहोचत नाहीत. मग ते चित्रपट तयार करण्याचे प्रयोजन काय असेल? केवळ शासकीय अनुदानासाठी ते तयार केले जात असतील का, की या जगताच्या अर्थकारणाची गणितं याहून वेगळी आहेत? यासारखे कित्येक प्रश्न महत्त्वपूर्ण ठरत असले, तरी रसिकांची ‘टेस्ट’ दिवसेंदिवस बदलत चालली असल्याचे, त्याचा दर्जा दिवसागणिक खालावत चालला असल्याचे वास्तव मात्र भीषण आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अन्‌ म्हणून कोट्यवधी रुपयांचा गल्ला भरू शकलेल्या िंहदी पिक्चर्सला मिळणार्‍या प्रतिसादाची कारणं वेगवेगळी आहेत. दरवेळी कोट्यवधी रुपये कमावण्याइतका त्याचा दर्जा, उच्च प्रतीचा असतोच असे नाही. पण, त्याच्या निर्मात्यांना जमलेली ‘मार्केिंटग ट्रिक’ कमालीची असते. ती बहुतांश मराठी चित्रपट निर्मात्यांना जमत नाही. अपवादाने ती भट्‌टी ज्याला जमली त्याचा ‘सैराट’ होतो. उर्वरितांच्या वाट्याला मात्र खंत व्यक्त करण्यापलीकडे काहीच येत नाही.
 
दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी मांडलेली खंत दखल घेण्याजोगीच आहे. पुरस्कारासाठी पात्र ठरलेली कलाकृती रसिकांच्या पसंतीस उतरत नाही आणि प्रेक्षकांना भावलेली निर्मिती परीक्षकांना रुचत नाही, हे इथले अजब गणित अन्‌ भयाण असे वास्तव आहे. एकाच समाजाचा भाग असलेल्या रसिक आणि परीक्षकांच्या भूमिकेत, नजरेत, आवडी-निवडीत, उमजेत, इतकी मोठी तफावत असेल, तर त्याची कारणं खरंच शोधली गेली पाहिजेत कधीतरी. अन्यथा ‘सुईधागा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘धग’... यांसारख्या चित्रपटांना थेटर सापडत नाही अन्‌ त्या तुलनेत तद्दन फालतू चित्रपट करोडो रुपये कमावून जातात. नाही म्हणायला इथे रसिकांचा दोष आहेच. कुणाच्या पाठीशी उभं राहायचं हेही न कळणारे प्रेक्षक, कुणाच्यातरी प्रचारतंत्राला बळी पडत नको तिथे पैशाची उधळण करतात अन्‌ गुणी कलावंतांकडे मात्र अकारण पाठ फिरवतात, तेव्हाच एखाद्या दिग्दर्शकावर रसिकांच्या जाणतेपणावर प्रश्नचिन्ह उभे करण्याची वेळ येते.
 
असं म्हणतात की, राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट सुरुवातीला प्रदर्शित झाला तेव्हा पहिले काही महिने तर प्रेक्षक फिरकलेही नव्हते त्याकडे. नंतर त्यातील एका गाण्यात बदल करून, त्याचे पुन्हा ‘वेगळ्या पद्धतीने’ शूिंटग करून तो चित्रपट नव्याने प्रदर्शित झाला. तेव्हा तो इतका धंदा करून गेला की, प्रेक्षकांची गर्दी आवरता येईनाशी झाली. आठ महिन्यांपूर्वी काय आवडलं नसेल बरं त्या चित्रपटातलं प्रेक्षकांना? कथानकासहित कलावंतांपर्यंत, अभिनयापासून तर मांडणीपर्यंत सारंकाही जसंच्या तसं असताना आठ महिन्यांत असा कोणता चमत्कार घडला की, त्यावर उड्या मारायला बाहेर पडले रसिकजन? एका गाण्याने एवढा बदल घडला लोकांच्या भूमिकेत? तेव्हाही हटके विषय घेऊन येणार्‍या ‘मंडी’, ‘खंडहर’सारख्या चित्रपटांना प्रेक्षक गवसायचे नाही अन्‌ विषयाची खोली नाही, सादरीकरणाला विशेष दर्जा नाही, अभिनयाच्या नावाखाली सगळी बोंबाबोंब आहे, असे चित्रपट मात्र ख्याती प्राप्त करून जायचे. तीच परंपरा अव्याहतपणे सुरू आहे आजही. मंदिरात कीर्तन आयोजित केले तर ऐकायला श्रोते मिळत नाहीत अन्‌ दुसर्‍या टोकावर तमाशाचा फड मांडला तर गर्दी आवरत नाही, अशी अवस्था आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले चांगले लोक पराभूत होतात अन्‌ बिहारात कारागृहातून लढणारे उमेदवार निवडणुकी िंजकतात, यात दोष कुणाला द्यायचा? हेच चित्रपट क्षेत्रात घडते आहे. ठरवलं तरी हसू येत नाही, अशा दृश्यांचा समावेश असलेल्या भिकार चित्रपटांचा, दुसरा, तिसरा, चौथा भाग तयार करून काही लोक चिक्कार पैसा कमावताहेत अन्‌ चांगले विषय, चांगली मांडणी, कसदार अभिनय साकारणारे दमदार कलावंत असलेल्या चित्रपटांना मात्र पुरस्कारांच्या पलीकडे हाती काहीच लागत नाही, ही स्थिती दुर्दैवी आहे!
 
बरं, निर्माते, दिग्दर्शक या परिस्थितीसाठी अगदीच दोषी नाहीत, असेही नाही. नाटक असो वा चित्रपट, वा अन्य कुठली कलाकृती, ती लोकप्रिय ठरायची असेल, तर वेगळ्या पद्धतीने अन्‌ पुरस्कारांच्या दरबारात यशस्वी ठरायचे असेल, तर जराशा वेगळ्या पद्धतीने त्याची निर्मिती साकारावी लागते, त्याचे सादरीकरणही काहीसे निराळे असावे लागते, हे त्यांनाही लक्षात आलं आहे एव्हाना. त्यामुळे निर्माते-दिग्दर्शकांच्या लेखीही या कलाकृती मासेस आणि क्लासेस, अशा दोन वर्गात मोडणार्‍या रसिकांसाठी दोन वेगवेगळ्या असाव्या लागतात. लोकप्रिय आणि बक्षीसपात्र ठरण्याचे निकष सर्वांच्याच लेखी वेगळाले असल्याने, ही दरी निर्माण झाली आहे. जे इकडे असते ते तिकडे असत नाही. कलाकृतीचा दर्जा ठरवण्याचे निकषही वेगवेगळे आहेत. तज्ज्ञ लोकांच्या मते, जे दर्जेदार आहे ते सर्वसामान्यांच्या बुद्धिपलीकडचे असते. जे त्यांच्या आकलनाच्या मर्यादेत बसणारे असते, त्याला तज्ज्ञांच्या लेखी फारशी िंकमत नसते. पण, पैसा मोजणारे लोक तर तेच सर्वसामान्य रसिक आहेत. बरं, त्यांची आवड अगदीच टुकार आहे असेही नाही. त्यांना गीतकार आनंद बक्षीही आवडतो अन्‌ गुलजारपण. त्यांना निर्माता म्हणून अनुराग कश्यपही आवडतो अन्‌ मेघना गुलजारही. त्यांना गायनाच्या क्षेत्रातले अलीशा चिनॉय, हनी िंसगही आवडतात अन्‌ अरीजितिंसग, श्रेया घोषालही भावतात. खरंतर या दोहोंमधला कलाक्षमतांचा भेदही कळतो त्याला. एवढी जाण असलेल्या रसिकांच्या दुनियेत चांगल्या कलाकृती पुरस्कारप्राप्त ठरूनही व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरत असतील, तर एकदा समस्येच्या तळाशीच गेलं पाहिजे.
 
त्यात भर मार्केिंटग तंत्राची पडली आहे अलीकडे. टुकार दर्जा असतानाही केवळ मार्केिंटगच्या भरवशावर कमाई करण्याचे नवेच फंडे शोधून काढले आहेत काही हुशार मंडळींनी. आताशा तर, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कुणीतरी कोर्टातही गेलेलं असतं चित्रपटाच्या विषयाला धरून. त्यावर बंदी घालण्याची मागणी काय होते, त्याच्या बातम्या काय होतात, लोक त्याची चर्चा काय करतात... प्रचाराचे हे तंत्र, कमी पैशात दर्जेदार चित्रपट निर्माण करण्याची इच्छा बाळगणार्‍या, त्यासाठी इमानेइतबारे धडपडणार्‍यांना साधत नाही अन्‌ दुर्दैवाने स्पर्धेच्या बाजारात ते मागे पडतात. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रेमकथांच्या पलीकडे विषय सुचत नव्हते भारतीय चित्रसृष्टीला. आता ते दिवस मागे पडलेत. अफलातून, भन्नाट विषयांवर चित्रपट तयार होताहेत अलीकडे. ‘मनिकर्णिका’ असो की ‘केसरी’, ऐतिहासिक घटनाही आगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होतोय्‌. पण, तरीही शिवाजी लोटन पाटील म्हणतात, ती वस्तुस्थितीही आहेच. निदान मराठी चित्रपटांच्या बाबतीत तरी आहेच आहे. चांगले प्रयोजक मिळत नाहीत. प्रथितयश कलावंत बाजूला ठेवून नव्या दमाच्या चेहर्‍यांना संधी द्यावी, तर लोक हा प्रयोग स्वीकारतीलच याची शाश्वती नसते. थोडा दोष, आधुनिक तंत्रज्ञान नाकारणार्‍या, निर्मितीच्या चाकोरीबद्ध पद्धतीचा आहे आणि बराचसा दोष रसिकांचा. नवनवे प्रयोग त्यांनी स्वीकारले नाहीत, त्याला रसिकाश्रय मिळाला नाही, तर ते प्रयोग करण्याचे धाडस करणार कोण?
9881717833