मोझरी नजिक एसटी बस उलटली

    दिनांक :17-Aug-2019
सहा जखमी, मोठी घटना टळली
 
तिवसा,
अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज मोझरी नजीक हॉटेल साईकृपा जवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एसटीबस शनिवारी रात्री ८वाजता उलटली. यात सहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या तिवसा व मोझरी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
नागपूर येथून अमरावती जाणारी बस क्रमांक एम एच४०वाय५२६६ हि बस अचानकपणे महामार्गावरील मोझरी नजिक असलेल्या हॉटेल साईकृपा जवळ अनियंत्रित झाली. त्यात बस महामार्गावरून रोडच्या खाली थेट खड्डयात उलटली. या बसमध्ये एकूण ४६ प्रवाशी होते. यात चालक बाळू ठाकरे व वाहक सय्यद अन्सार हे होते.

 
 
या अपघातात पुंडलिक नारायण सोळके रा. तळेगाव शामजीपंत, मधूकर वामनराव अटाळकर (वय 80, रा. आसेगाव पूर्णा) हे जखमी झाले असून त्यांना तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर चार अन्य जणांना मोझरीच्या श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर,नगराध्यक्ष वैभव वानखडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमींना उपचारार्थ हलविले. यावेळी तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. बस पलटी झाल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे. बस उलटण्याचे नेमके कारण समोर आले नाही.