सराफा दूकान लूटणारी टोळी जेरबंद

    दिनांक :17-Aug-2019
7 लाखाचा मुद्देमाल जप्त
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई
 
अमरावती,
चांदूर बाजार येथील सराफा दुकान लुटून सुमारे सुमारे 33 लाख रूपयांचे सोने, चांदी व रोकड लुटून नेणार्‍या आरोपींच्या टोळीला स्थानीक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून सुमारे 7 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शनिवारी देण्यात आली.

 
 
चांदूर बाजार येथील सराफा व्यापारी धनंजय साबदरे यांच्या जयस्तंभ चौक परिसरातील भवानी ज्वेलर्समधून 9 ऑगस्ट रोजी धाडसी चोरीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 600 ग्रॅम सोने, 10 किलो चांदी व 10 लाखाची रोकड अशाप्रकारे 33 लाखाची चोरी केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात पाच पथके गठीत करण्यात आली होती. स्थानीक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वातील पथकाने मुंबई, आंबीवली व जालना याठिकाणी शोध मोहीम राबविली. सलग आठवडाभराच्या शोध मोहीमेनंतर पोलिसांना तीन आरोपींना पकडण्यात यश आले. पोलिसांनी अमरावतीच्या वडाळी परिसरातून मुख्तारसिंग जोगनसिंग टांक (32) याला अटक केली. याशिवाय शिवागासिंग वीरासिंग दुधानी उर्फ सिखलकर (28, साईकृपा नगर, आंबीवली, ठाणे) व करणसिंग छगनसिंग भोंडे (24, गुरूगोविंदनगर, जालना) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींजवळून 13 तोळे सोने, 2 किलो चांदी व 59 हजार रूपयाची रोकड असा एकुण 7 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींजवळून चोरीची कार देखील जप्त केली. सदर कार कारंजा घाडगे येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक मुकुंद कवाडे, नरेंद्र पेंदोर, त्र्यंबक मनोहरे, गजेंद्र ठाकरे, प्रमोद खर्चे, प्रवीण अंबाडकर, शकील चव्हाण, सचिन मिश्रा,मूलचंद भांबूरकर, संदीप लेकुरवाळे यांनी केली.