महादेव रुद्राभिषेक

    दिनांक :17-Aug-2019
कलियुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे व रुद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदेवी अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा. अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पूर्ण वास्तूमध्ये शिंपडावे.
 
 
 
 
 
या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्यामध्ये एकादशिनी, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादी प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री अशा पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात.
 
श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक
रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र एकादशिनी ) - 11 आवर्तने
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -121 आवर्तने
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) - 1331 आवर्तने
अतिरुद्र अभिषेक:- (अतिरुद्र) - 14641 आवर्तने
(महत्त्वाचे - हे विधान आपल्या वास्तूमध्ये करावे)
श्रीगुरुचरित्रामध्ये रुद्र अभिषेकाचे महत्त्व सांगितले आहे .
 
लघुरुद्र आणि अतिरुद्र
अनेक ठिकाणी शंकराच्या देवळांतून लघुरुद्र केले जातात व अभिषेक केले जातात. अभिषेक हे प्रतीक आहे. अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे.
रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते अकरा वेळा म्हटले की एक एकदष्णी होते. अकरा एकदष्णीचा एक लघुरुद्र. अकरा लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि अकरा महारुद्र केले की एक अतिरुद्र होतो.
 
अशाप्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची, उपासनेची एक पद्धत आहे.
रुद्र आवर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहेत. रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय व पद्धती आहे. त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात. म्हणून रुद्राभिषेक हा जाणकार ब्राह्मणांकडून करून घ्यावा लागतो. ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती आहे. योग्य पद्धतीने उच्चार झाल्यावर ती शक्ती कार्यरत होते व अनुभवाला येते.
 
रुद्राभिषेक घरात, बाहेर कोठेही, क्षेत्राचे ठिकाणी केव्हाही केला तरी चालतो. हा अगोदर ठरवून करावा. विशेषतः प्रदोष, सोमवार, एकादशी अशा दिवशी केलेला उत्तम. तुमच्या सवडीने महिन्यातून वरीलपैकी कोणताही एक दिवस ठरवा व रुद्राभिषेक करा. त्याचा तुम्हाला हमखास फायदा मिळेल. रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही. तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. म्हणजे अडथळे दूर होऊन प्रगती साधली जाते. रुद्र हे वेदमंत्र असल्याने त्याचे जसजसे उच्चारण होते तसतशा देवता तिथे उत्पन्न होतात व लोककल्याण करतात.
 
रुद्राभिषेकाचे फायदे
अ) घराण्याचे दोष कमी होणे- कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही. त्यातूनच पितृदोष निर्माण होतात. पितृदोषांमुळे घराणीच्या घराणी नाहीशी झाल्याची उदाहरणे आहेत. कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की, जगणे मुश्कील करतात. काही घरात सर्व सुखसोई असूनही अस्वस्थता असते. काही घरात काही कारण नसताना सतत भांडणे होतात. काही घरात जेवण तयार असून शांत रीतीने खायला मिळत नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे शिवोपासना करणे.
 
ब) मनोविकार कमी होणे : रुद्र आवर्तने ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात. तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र/ महारुद्र करता, तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी ते ऐकावे, श्रवण करावे. यामुळे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत व असतील तर पुढे नाहीसे होतात.
 
क) पाऊस पडणे : पाऊस पडत नसेल तर सामूदायिक प्रार्थनेचा जरूर उपयोग होतो व ईश्वरीशक्ती आपले कार्य करते. पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करीत असत. शिविंलगावर अभिषेक करत असत. तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तरी पाऊस पडण्यास मदत होते. परंतु, अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत ठेवायला लागते.
 
ड) भूकंपापासून रक्षण : सध्या लहान मोठे भूकंप सतत खूप ठिकाणी होत आहेत. जेथे जमीन पोकळ असते तेथे असे भूकंप होत असतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिविंलगे बाहेर येत असतात. म्हणून ती पोकळ जमीन टणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करून शिवाला शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा, तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी अथवा देवदेवळातून रुद्राभिषेक जरूर करावेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल.