पनामा पेपर लिक प्रकरणावर चित्रपट

    दिनांक :17-Aug-2019
जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासात सर्वात मोठे ठरावे असे ‘पनामा पेपर्स’ प्रकरण २०१६ मध्ये उजेडात आले होते. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य अमेरिकेतील पनामा या देशातील मोझॅक फॉन्सेका नावाच्या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची ११.५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड करण्यात आली होती. त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटू आणि अनेक बड्या असामींनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, जर्सी, बहामा आणि सेशल्स बेटे अशा कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पैसा कसा फिरवला गेला याबाबत थक्क करणाऱ्या बाबी स्पष्ट झाल्या होत्या. आता याच पनामा पेपर लिक प्रकरणावर लवकरच एक चित्रपट येणार आहे.
 
 
 
स्टीव्हन सोडरबर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘लॉन्ड्रोमॅट’ असं या चित्रपटाचं नाव आहे. दरम्यान, हा चित्रपट शोधपत्रकारितेतून उजेडात आलेल्या पनामा पेपर लिक प्रकरणावर आधारित आहे. ‘लॉन्ड्रोमॅट’ हा चित्रपट वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलसोबतच अन्य फिल्म फेस्टीव्हल्समध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच १ नोव्हेबर रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सोडरबर्ग यांनी एरिन ब्रोकोविच आणि ट्रॅफिक सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शिक केले होते. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. मेरील स्ट्रीप, अँटोनियो बँडेरस, मेलिसा रॉच, गॅरी ओल्डमॅन, शेरॉन स्टोन आणि डेव्हिड श्वाइमर यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
 
 
 
जगातील एकूण १४० व्यक्तींनी पनामात आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले होते. एकूण बारा देशांच्या माजी प्रमुखांची नावे यात समोर आली होती. युक्रेनचे अध्यक्ष, सौदी अरेबियाचे राजे, चित्रपट अभिनेता जॅकी चॅन यांचीही नावे कागदपत्रात आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कुटुंबीयांची खाती परदेशात असून ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन याच्या वडिलांचे खातेही असल्याचे समोर आले होते. तर आइसलँडच्या पंतप्रधानांचे परदेशात खाते असून लाखो डॉलर्स त्यात गुंतवलेले असल्याचे समोर आले होते. फिफाच्या नैतिकता समितीचे सदस्य जुआन प्रेडो दामियानी यांचे या प्रकरणाशी संबंधित तिघांबरोबर उद्योग व्यवसाय असल्याची माहितीही समोर आली होती. तसेच भिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफचे मालक के. पी. सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत, गुंड इकबाल मिर्ची यांसह ५०० भारतीयांची नावे पनामा पेपर्समध्ये नमूद केलेल्या कंपन्यांशी जोडलेली असल्याचे समोर आले होते.