बॉलिवूड फिल्मच्या सीडी जप्त

    दिनांक :17-Aug-2019
नवी दिल्ली,
भारतानं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारतीय कलाकार अथवा भारतीय उत्पादनांशी संबंधित जाहिरातींवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानकडून आता बॉलिवूड चित्रपटांच्या सीडी जप्त करण्यात येत आहेत.
 
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटीने (पीईएमआरए) याआधी भारतीय जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 'आम्ही भारतीय जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली आहे आणि भारतीय चित्रपटांच्या सीडी जप्त करण्यासाठी दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे,' अशी माहिती पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार फिरदौस आशिक अवान यांनी दिल्याचं वृत्त 'डॉन'नं प्रसिद्ध केलं आहे. भारतीय चित्रपटांविरोधात आधीपासूनच कारवाई करण्यात येत आहे. आता राज्य सरकारांच्या मदतीने देशातील अन्य भागांतही कारवाई करण्यात येईल. पाकिस्तानातील काही सीडीच्या दुकानांवर छापे टाकले असून, भारतीय चित्रपटांच्या सीडी जप्त करण्यात आल्या आहेत, असंही अवान यांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.