दिव्यांच्या अवसेची कहाणी...

    दिनांक :17-Aug-2019
आषाढात दिवस छोटा होत असतो. संध्याकाळी आषाढ घनांनी आभाळ भरून जातं. काळेजांभळे ढग दाटीवाटीनं जमतात आणि लवकरच दिवेलागणीची वेळ होते. आषाढातली अवस तर जास्तच काळोखी. त्या अवसेची कहाणी- दिव्यांच्या अवसेची कहाणी.
 
 
 
 
एक होता राजा. त्याची एक सून. रूपानं साजरी, गुणानं गोजरी, कामाची कम्मळजा...! लहानांना जीव लावी. मोठ्यांचा मान ठेवी. सगळे जेवल्यावर आपण जेवी. रोज घरातले दिवे-पणत्या, मिणमिणत्या समया, नंदादीप, लामणदिवे घासूनपुसून स्वच्छ ठेवी. टेंभे, पलिते जागेला लावी. तिन्ही सांजेला एक दिवा देवाला, एक तुळशीला, एक गाईच्या गोठ्यात, एक वेशीवरच्या मारुतीला ठेवी. तिच्या करतुकीनं दिवे हसत, उजळत. एकदा हिने घारगे केले. एक एक करत हिनेच खाल्ले. आळ घेतला उंदरांवर. चिडलेल्या उंदरांनी सूड घेतला. तिचा शेला फाडला, पाव्हण्याच्या खोलीत टाकला. चीची करत गवगवा केला. रागावलेल्या राजाने सुनेला घरातून हाकलून दिलं.
 
दिवे काळवंडले, उजेड म्हणून देईनात. सुनेनं सकाळी वेशीवरचा दिवा घ्यावा, नदीवर न्यावा, घासूनपुसून स्वच्छ करावा. मारुतीच्या पायाजवळ ठेवावा. एकदा राजा गेला शिकारीला. आषाढाची अवस होती. रात्र झाली. वेशीवरच्या झाडाखाली थांबला. एकाएकी झाड उजळलं. घरोघरचे दिवे झाडावर येऊन बसले. मारुतीच्या पायाजवळच्या दिव्यांनी वेस उजळली. राजाघरचे दिवे काळवंडलेले, काजळलेले. म्हणाले, राजाने सुनेवर अन्याय केलाय. उजेडाचा अंधार केलाय. राजाला पश्चात्ताप झाला. मोठ्या मानाने मिरवत मिरवत सुनेला मेण्यातून आणली. दिवे हरखले, लखलखले. सगळ्यांना आशीर्वाद दिला. तसा तो सगळ्यांना मिळो!
 
दिवा ज्ञानाचं प्रतीक. तो प्रकाशला की अज्ञानाचा अंधार नाहीसा होता. दिवा- मूकपणे त्याग करणार्‍या सज्जनांचं प्रतीक. दिवा- जीवनाचं प्रतीक, म्हणून दिवा विझणं अशुभ मानतात. वास्तविक दिवा विझणं ही एक भौतिक आणि अटळ क्रिया आहे. तेल संपलं की, वात संपली की, पाण्याचा िंकवा हवेचा झोत आला की दिवा विझतो. दिव्याचं तेवत राहणं आपल्याला इतकं आवडतं की, दिवा विझला की मन अस्वस्थ होतं. दिवा विझण्याचा कुठल्याही अशुभाशी संबंध नाही, हे समजूनही मनाला हुरहुर लागते. ही हुरहुर थांबवता आली पाहिजे. म्हणजे सुजाणपणाचा दिवा तेवत राहील.
 
‘‘दिवा जळो देवापाशी उजेड पडो तुळशीपाशी.’’ असं आपण अजूनही सवयीने म्हणतो. नवीन पिढी विचारते, ‘‘असं कुठे होतं?’’ मुलांचा प्रश्न रास्त आहे. घराच्या रचना आता बदलल्या. पूर्वी कुटुंबं संयुक्त होती. घराची बांधणी सर्वतोभद्र या प्रकारची असायची. मधे मोठी चौकोनी जागा मोकळी ठेवून चार बाजूंनी खोल्या असत. मधल्या मोकळ्या चौकोनात स्त्रियांचा वावर असे. त्या चौकोनाच्या एका बाजूला छोटेसे देवघर, तेही फार बंदिस्त नसायचे आणि दुसर्‍या बाजूला तुळसवृंदावन असे. त्यामुळे देवासमोर दिवा लावल्यावर तुळशीपुढेही उजेड पडत असे. आज घरांच्या रचना बदलल्या, प्रार्थनेचे शब्द तेच राह्यले.
विजेच्या दिव्यांच्या झगमगाटामुळे आज तेलाच्या दिव्यांचं कौतुक नाही. पण, पूर्वी घरोघरच्या अंगणात, देव्हार्‍यात, वृंदावनासमोर पणती लावली जाई आणि एक पणती संध्याकाळी उशिरा शेतातून घराकडे परतणार्‍या कष्टाच्या मालकासाठी, वेशीवरच्या मारुतीच्या देवळात ठेवली जाई. अनेक प्रकारच्या अंधारांमध्ये ग्रामीण माय-बहिणींनी उजेडाचं, प्रकाशाचं हे व्रत एखाद्या पणतीसारखं जपलं.
 
दिव्यांच्या अवसेच्या कहाणीत, उंदीर म्हणजे घरातले नोकरचाकर आणि दिवे घासूनपुसून लख्ख ठेवणं म्हणजे सुनेचं वादातीत स्वच्छ वागणं आहे.
 
प्रज्ञा जयंत बापट
9405501769