साहेबांचे राज्य...

    दिनांक :18-Aug-2019
आटपाट नगर होते. आता नगर आटपाटच का असते, असा सवाल तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे... असे सांगण्यामागे एक चलाखी आहे. आजकाल व्यवस्था तुम्हाला कुठले प्रश्न आणि समस्या पडल्या पाहिजे हे ठरविते आणि त्याची रेडीमेड उत्तरेही देवून टाकत असते. म्हणजे आधुनिक बाजाराकडे आधी रेडीमेड उत्तरे आणि समस्यांचे समाधान असते आणि नंतर ते प्रश्न कि‘एट (मराठीत काय म्हणायचं बर?) करतात. ते निर्माण केलेले प्रश्न आपल्याला पडले, असे आपल्याला वाटते नि मग कार्पोरेट जग त्याची त्यांच्याकडे विकायला तयार असलेली उत्तरे देत असते... तर आट काढावा लागतो तेव्हाच पाट लागू शकतो किंवा पाटात येत नाही ते नगर म्हणजे आटपाट नगर... आता अनेक नगरांत पाटाचे पाणी शिरले आहे, कारण या आधी तिथे असेच पाणी शिरल्यावरही आट काढला नाही. त्यामुळे आता त्या नगरांची वाट लागली आहे.

 
 
आता आटपाट नगर असले की मग त्याला एक राजाही लागत असतो. तसाच एक राजा (जाणता) या नगरांनाही होता. म्हणजे अशा नगरांचे ते राज्य होते आणि त्यांचा तो राजा होता. आता मराठीत जाणरा म्हणजे जाणव असलेला अन्‌ जाणता म्हणजे ज्याला जादुटोणा येतो, जादुटोणा करू शकतो किंवा काढू शकतो, असा. त्यालाही जाणता म्हणतात. हा जो राजा आहे (खरेतर होता) त्याला जाणता दोन्ही अर्थाने म्हणता येते, कारण त्या राज्याच्या काही भागांबद्दल म्हणजे पश्चिमेकडच्या जिल्ह्यांबद्दल या राजाच्या जाणिवा फार म्हणजे फारच हळव्या होत्या आणि आहेत आणि मग उर्वरित भागाबद्दल म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाबद्दल त्याच्या मनात केवळ टोणेगिरीच आहे. म्हणजे या भागावर तो करणी-कवटाळेच करत असतो...
तर अशा या राजाची ही कहाणी आहे. हे राज्य म्हणे साहेबांचे आहे. आधी ते जाणते राजे होते. आता सत्ता गेल्यावर ते साहेब झाले. घड्याळाचे काटे उलटे फिरले किंवा पुढे सरकत राहिले आणि काळ बदलला. साहेबांना मात्र ते कळले नाही. साहेबांना निवडणुकीच्या वेळीच आपल्या सोबत्यांची आठवण येते. दरवेळी मग ते ‘आधे इधर, आधे उधर... बाकी मेरे पिछे’ म्हणतात. मेरे पिछे म्हणजे मग त्यांची लेक, पुतण्या, नातू- पणतू... असे. आता त्यांचे आधे खरोखरीच ‘इधर’ गेले आहेत आणि आधे ‘उधर’ गेले आहेत. साहेबांच्या मागे घरचेही उरलेले नाहीत. अशा या साहेबांची ही कहाणी आहे. आटपाट नगराची ही कहाणी आहे. साहेबांनी तिकडे त्यांच्या साडेचार जिल्ह्यांच्या राज्यात मोठमोठ्या स्वप्नवत वाटणार्‍या नगर्‍या वसविल्या. कुणाला वाटले लवासा तर लावा, म्हणत तिथे घरे करण्यात आली. त्या भागात साहेबांनी जमीन, पाणी आणि हवेवरही कब्जा केला. म्हणजे मोक्याच्या जमिनी साहेबांच्या. म्हणजे त्यांच्या गुबूगुबू माना हलविणार्‍या माणसांच्या. अगदी हवा जोरदार असते तिथे साहेबांच्याच पवनचक्क्या... धरणे साहेबांची, पाणी साहेबांचे अन्‌ ऊसासह कारखानेही साहेबांचेच. आता या धरणांबद्दल दीर्घ शंका आली आहे सार्‍यांनाच अन्‌ साहेबांचे आप्त त्यात लघुशंका करण्याची भाषा करत होते. त्यावरून अस्मादिकांना एक कविता सुचली आहे.
इथल्याच धरणांत लघुशंका करताहेत
इथले जाणते राजे अन्‌ पाण्याच्या थेंबासाठी
इथली जनता नीलाम झाली आहे
तर एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे धरणे ओसंडून गावांना कवेत घेती झालेली आहेत. तिथेही पाणीच पाणी आहे; पण प्यायला नाही. लोकांच्या तोंडचे पाणी दोन्हीकडे सुटले आहे. अशात या साहेबांना केवळ त्यांचे साडेचार जिल्हेच दिसतात. साहेब बोलतात मोठे जहरी. त्यात न उच्चार करता ते जात आणतात, धर्म आणतात. साहेब पगड्यांचेही राजकारण करतात. ब‘ाह्मणी पगडी, फुलेंची पगडी... म्हणजे साहेबांचे राजकारण सलामत तो पगडी पचास! मागे साहेब म्हणाले होते, ‘यांच्या तोंडात राम आणि पोटात नथूराम आहे’, आता जनतेने दाखवून दिले की राम कुणाच्या मुखी आणि पोटी आहे ते. तरीही साहेबांचे हे चाळे गेलेले नाही. साहेब संकट काळातही जातीचे राजकारण करतात, प्रांताचे राजकारण करतात. त्यांना वाटते की राज्याच्या सिंहासनावर त्यांचेच ज्ञातीबांधव असले पाहिजे. तिथे 100 टक्के त्यांना आरक्षण हवे. त्यामुळे विदर्भाचा मु‘यमंत्री साहेबांना खटकतो. आता इतक्या पूर स्थितीत माणसाचा ऊर भरून यायला हवा, मात्र साहेबांना तिथेही, विदर्भाच्या मु‘यमंत्र्यांचे इकडे लक्ष नाही, असे म्हणावेसे वाटले. तुमचेच तुमच्याकडे लक्ष नाही म्हणून तुमचे सरदार तुम्हाला सोडून जात आहेत. मतदार तर कधीचाच सोडून गेला आहे. असे असतानाही साहेबांना मु‘यमंत्री विदर्भाचाच वाटतो. पुण्यात मेट्रो होते आहे, मु‘यमंत्री पूर स्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत, असे असताना साहेबांना ते दिसत नाही.
साहेबांना शेतकरी केवळ ऊसवालाच दिसतो. सोयाबीन, कापूस पेरणारे त्यांना शेतकरी वाटत नाही. साहेबांच्या उसाच्या अर्थकारणात ज्याचे पिचाड झाले तोच साहेबांना शेतकरी वाटतो. म्हणून तिकडे पूर आल्यावर साहेबांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे 100 टक्के कर्ज माफ केले पाहिजे, असे वाटले. तशी मागणीही त्यांनी करून टाकली. आता इकडे विदर्भात पावसाळा आलाच नाही अशी काही भागांत स्थिती आहे. अर्ध्याहून जास्त विदर्भात अन्‌ पूर्ण मराठवाड्यात पाऊसच नाही. कापूस, सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. दुबार कराव्या लागल्या. त्याही बर्‍याच प्रमाणात फळलेल्या नाहीत. असे असताना कापूस उत्पादक शेतकरी आपले दु:ख झाकून आपल्या बांधवांच्या वाहून गेलेल्या संसाराची जुळवणी करण्यासाठी जमेल तशी मदत करतो आहे. साहेबांना इकडची कोरड नाही दिसत, त्यांच्यासाठी ते ओरडही नाही करत. तातडी तिकडे आहे, हे खरेच आहे; पण निकड इकडेही आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरीही साहेबांना कर्जमाफी केवळ ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठीच हवी आहे.
आता पूरग‘स्त बांधवांना सगळेच मदत करत आहेत. धर्म, जात, पंथ सगळे भेद बाजूला ठेवून सगळे समोर आले आहे. मात्र साहेब जात पाहून पुतळे उद्ध्वस्त करण्यास उद्युक्त करणारे. त्यामुळे सांगलीत पटवर्धन नामक बिल्डर दाम्पत्याने त्यांच्या नव्याने बांधलेल्या इमारतींच्या सदनिका पूरग‘स्तांना खुल्या करून दिल्या. त्यावरूनही राजकारण करण्यात आले. पटवर्धन म्हणजे ब‘ह्मोकुलोत्पन्न आणि ते मग आपल्याच ज्ञातीबांधवांनाच मदत करत आहेत, अशी आवई सोशल मीडियावर उडविण्यात आली. साहेबांच्या अन्नावर पोसलेल्या काही पत्रकार आणि जाणकारांनी त्यावर निषेधाची काजळीही फासणे सुरू केले. मुंबईच्या एका पत्रकराने सत्याचा तळ गाठला, तेव्हा असे काहीच नाही हे दिसले. अगदी 18 मुस्लिम कुटुंबेही तिथे आश्रयाला आहेत, हे दिसले. त्या पत्रकार बांधवाने ही पोस्ट समाजमाध्यमांवर सोडली, मात्र तिकडे साहेबांच्या लोकांनी दुर्लक्ष केले... ‘मती फिरली, दिवस फिरले, त्यामुळे लोकही फिरले, मतदारांनीही पाठी फिरविल्या, सत्ता गेली, जिवाभावाची माणसेही गेली... इतकी दुर्दशा एका मतीने केली!’, हे साहेबांच्या बाबत सत्य आहे. आता बारामतीने न वागता बर्‍यामतीने वागले तर राखीव बारामती तरी राखता येईल... साहेबांचे राज्य खालसा होताना त्यांना हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे!