प्रेरणादायी निसर्गयात्रा

    दिनांक :18-Aug-2019
अभय देशपांडे
 
निसर्ग जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांमधल्या बेजबाबदार मानवी कृत्यांमुळे पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरायचा असेल तर प्रत्येक माणसाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सुखासाठी निसर्गाचा हवा तसा उपयोग करून घेतला. विकासाच्या चुकीच्या संकल्पना निसर्गाच्या मुळावरच उठवून एक प्रकारे आपण आत्मघात करवून घेतला. आता मात्र फार थोड्या संधी शिल्लक असताना शर्थीचे प्रयत्न करणं, ही गरज नसून प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही वस्तुस्थिती सातत्याने आणि प्रकर्षाने पुढे आणली गेल्यामुळे तसंच याबाबत जनजागृतीच्या प्रभावी मोहिमा हाती घेण्यात आल्यामुळे अलीकडच्या काळात निसर्गसंवर्धनाची आणि रक्षणाची भावना निर्माण झाली असून या कामी अनेकांनी झोकून काम करण्याचं व्रत अंगिकारलं आहे. 

 
 
हे व्रत घेतलेल्यांपैकी अग्रणी म्हणता येईल, असं एक नाव म्हणजे ‘बेअर ग्रिल्स!’ एक अवलिया असंच त्याचं वर्णन करावं लागेल. जगभरातली घनदाट जंगलं, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंटं, महानद्या, अथांग समुद्र अशा कोणत्याही धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणार्‍या बेअर ग्रिल्स याची जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ ही मालिका डिस्कव्हरी वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय आहे. निसर्गाशी एकरूप होऊन, त्यातील संसाधनांचा वापर करत एकट्याने कसं जगायचं, अत्यंत विपरीत स्थिती असली तरी जीव राखण्यासाठी कोणते मंत्र कामी येतात, कोणकोणत्या प्रकारे पोटाची तहान आणि भूक या दोन्ही मूलभूत गरजा भागवता येतात, जंगलात उपलब्ध असणार्‍या साहित्यापासून निवारा कसा मिळवता येतो, या आणि यासारख्या अनेक बाबी तो सोदाहरण स्पष्ट करतो. या प्रयत्नात तो सामान्यांच्या कल्पनाशक्तीच्या पुढच्या अनेक बाबी सहजी करून जातो तर त्याच्याकडून होणारी काही कृत्यं बाळबोध व्यक्तींसाठी कोणत्याही अतर्क्यापेक्षा कमी ठरत नाहीत. त्याची जिगर, धडाडी, निडरता, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी हे सगळंच विलक्षण आहे. म्हणूनच जगभर त्याचा चाहतावर्ग बघायला मिळतो.
अलीकडे याच बेअरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शूट केलेल्या एका प्रसंगाची क्लिप शेअर केली आणि त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली.
 
या क्लिपमध्ये बेअरसोबत लाकडाचे शस्त्र हाती घेतलेल्या, रानवाटा तुडवणार्‍या, नदीचा प्रवाह कापणार्‍या पंतप्रधानांचा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आणि या रूपाने अनेकजण विचारात पडले. मुळात पंतप्रधान मोदी हे निसर्गात रमणारं, निसर्गाची जाण असणारं व्यक्तिमत्त्व आहे. उमेदीच्या काळात देश जाणून घेण्यासाठी पदयात्रा करताना त्यांनी अनेक दुर्गम पायवाटा तुडवल्या आहेत. आहे त्या परिस्थितीचा सामना करत, चिंतन करत त्यांनी निसर्गाचा सहवास अनुभवला आहे. आज या वयातही ते केदारनाथसारख्या ठिकाणी एका गुहेत रात्रभर आत्मचिंतन करतात, हातात काठी घेऊन परिसरात फिरतात, तेव्हा त्यांची निसर्गाशी असणारी सोयरिक कायम असल्याचं जाणवतं. या पार्श्वभूमीमुळेच मोदींचं निसर्गात वावरतानाचं रूप पाहण्याबाबत कुतुहल आहे. एकीकडे ही बाब पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाचा आगळा पैलू पुढे आणणारी, कार्यक्रमाचा टीआरपी वाढणारी आहे तर दुसरीकडे निसर्गरक्षणाचा मूलमंत्र खोलवर रुजवणारीही आहे. देशाचा पंतप्रधान अशा प्रकारे पुढाकार घेत असेल तर ही भावना सर्वदूर पसरणं आणि त्यापासून प्रेरणा घेत एक जत्था या कामात उतरणं अजिबात अवघड नाही.
 
जगभरातले भ्रमंतीकार, नवनव्या वाटा धुंडाळणार्‍या लोकांसोबतच दिवाणखान्यात बसून ‘डिस्कव्हरी’समोर ठाण मांडून बसणारे बेअरचा ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ हा शो चुकवत नाहीत. जगण्यासाठी काहीही खाणारा आणि निबीड अरण्यात वाट चुकल्यास सुखरूप परतीच्या प्रवासासाठी मोलाच्या युक्त्या सांगणारा बेअर मोदी यांच्यासह उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात फिरला. या निमित्ताने श्री. मोदी बेअरसोबत टीव्हीवर निसर्गातली विविधता आणि निसर्ग संवर्धनावरील उपायांवर चर्चा करताना दिसणार आहेत. ‘180 देशांमधले नागरिक भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील’, असा विश्र्वास त्याने व्यक्त केला आहे. या कार्यक्रमात मोदी यांनी स्पोर्टस ड्रेस परिधान केला आहे. त्याचबरोबर ते बेअरसोबत एका छोट्या नावेतून प्रवास करतानाही दिसतील. एकीकडे व्याघ्र दिन साजरा होत असतानाच वाघांची संख्या वाढल्याची शुभवार्ता मोदी यांनी देशवासीयांना दिली आणि त्यापाठोपाठ त्यांची ही छबी झळकली. त्यामुळेच त्या दिवसापासून या कार्यक्रमाच्या आणि या विषयाच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. यासारखे काही कार्यक्रम, उपक्रम वन्य जीवांच्या संरक्षणास कारक ठरत असतात. देशात वाघांची संख्या वाढणं हा त्यातीलच एक भाग म्हणायला हवा.
 
2018 च्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेनुसार देशात 2967 वाघांचा अधिवास आहे. भारतात 2006 मध्ये 1411 वाघ होते. 2010 मध्ये ते 1706 झाले. 2014 मध्ये ती संख्या 2226 इतकी झाली. यात गेल्या चार वर्षांमध्ये 714 वाघांची (20 टक्के) भर पडली आहे. जगभरातल्या एकूण संख्येपैकी तब्बल 70 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. वाघांची संख्या वाढल्याचा आनंद आहेच; परंतु त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या वाढल्याचंही दु:ख आहे. निसर्गसाखळीत वाघाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर वाघामुळेच जंगल टिकून आहे. 2014 मध्ये भारतात वाघांसाठी संरक्षित प्रकल्पांची संख्या 692 इतकी होती. ती 2019 मध्ये 860 पेक्षा अधिक झाली. याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. महाराष्ट्राचाच विचार केल्यास 2006 मध्ये आपल्याकडे केवळ 103 वाघ होते. 2010 मध्ये त्यांची संख्या 168 वर पोहोचले. 2014 मध्ये 190 झालेली वाघांची संख्या 2018 मध्ये 312 वर पोहोचली आहे. आता वाढलेल्या या वाघांनी रहायचं कुठे? सध्याच्या स्थितीत उपलब्ध असलेलं जंगल त्यांना पुरेसं आहे काय, याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तो न केल्यास आधीच वाढलेला मानव-वन्य जीव संघर्ष आणखी टोकाला जाण्याची भीती आहे. पुढे त्याचा परिणाम जंगलावर आणि एकूणच वन्यजीवांवर होणार आहे. त्यामुळे वाघांचं अधिवासक्षेत्र कसं वाढवायचं, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.
 
भारताशिवाय बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, थायलंड, व्हिएतनाम, उत्तर कोरिया आणि रशियामध्ये वाघ आढळतात. 2010 मध्ये असलेली वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय या सर्वच देशांनी उराशी बाळगलं. आश्र्चर्य म्हणजे भारताने हे ध्येय 2018 मध्येच गाठलं आहे. व्याघ्र संवर्धनासाठी भारताने केलेल्या नियोजनपूर्वक प्रयत्नांचं हे फलित म्हणावं लागेल. वाघांची ही वाढलेली संख्या आनंदासोबत अनेक आव्हान देणारी आहे. विविध माध्यमांमधून जंगलांवर म्हणजे वन्य जीवांच्या अधिवासावर वाढलेलं अतिक्रमण, त्यातून वन्य जीवांचा गावपरिसरात वाढलेला वावर यातून अनेक प्रश्र्न निर्माण होणार आहेत. वाढत्या शिकारी डोकेदुखी ठरत असतानाच वाढलेले हे वाघ आहे त्या जंगलात कसे राहणार, या प्रश्र्नाचं उत्तर शोधावं लागेल. विकासासाठी या जंगलांवर कुर्‍हाड चालवणं परवडणारं नाही.
 
निसर्गात एक साखळी असते. ती न जपल्यास मनुष्यजातीवरही वेगवेगळे परिणाम होत असतात. जागतिक पर्यावरण बदलाचा प्रतिकूल परिणाम केवळ मानवावर होत आहे, असं नाही तर एकूणच निसर्गातल्या सर्व घटकांवर परिणाम होत असतो. प्राण्यांसाठी जंगलं जशी सुरक्षित व्हायला हवीत, तशीच जंगलाखालील जमीन कमी होऊ नये, यासाठी पर्यावरणपूरक बांधकामांवर भर द्यायला हवा. बांधकाम आणि फर्निचरसाठी लाकडाला पर्याय शोधायला हवा. जमिनीची धूप न होण्यासाठी झाडं, पाणथळ जमिनी जशा आवश्यक आहेत तसाच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले, नद्या, ओढ्यांनाही मोकळा श्र्वास घेता आला पाहिजे. मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा वापर जंगल, जमीन आणि पाणी वाचवण्यासाठी केला तर त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील.
 
••