वाघ वाढलेत, आता टिकविण्याचे आव्हान!

    दिनांक :18-Aug-2019
किशोर रिठे
 
रॉयल बेंगॉल टायगर म्हणजेच पट्‌टेदार वाघ! भारतातील जंगलांमधील जिवंतपणा सांभाळून ठेवणारा प्राणी! जगातील वाघांच्या एकूण संख्येच्या अर्धेअधिक वाघ एकट्या भारतात असल्याने, संपूर्ण जगाचे लक्ष आज भारतातील जंगलांकडे लागले आहे. 

 
 
भारतातील वाघांच्या सद्य:स्थितीबाबत अहवाल, जागतिक व्याघ्र दिनी, 29 जुलै 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे प्रकाशित केला. 2018 सालच्या सर्वेक्षणानुसार, देशात वाघांची संख्या 2967 वर पोहोचली असल्याचे जाहीर करण्यात आले.
 
सर्वप्रथम या अहवालावर एक नजर टाकणे आवश्यक आहे. सन 2006 पूर्वी वाघांच्या पायांच्या ठशांवरून त्यांची संख्या ठरविली जायची. सन 2006 मध्ये ही पद्धत रद्द करून कॅमेरा ट्रॅपद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून अचूकपणे ही संख्या निश्चित करणे सुरू झाले. या नवीन पद्धतीद्वारे सन 2006 मध्ये भारतातील 27 व्याघ्र प्रकल्पांमध्ये 1411 वाघांची नोंद करण्यात आली. तेव्हापासून दर चार वर्षांमध्ये हे सर्वेक्षण करून अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यामुळे या अहवालातील आकडेवारीची तुलना करताना 2006, 2010, 2014 या वर्षीच्या आकडेवारीचा वापर करण्यात आला आहे.
 
या अहवालातील 2967 हा आकडा जाहीर करताना कमीत कमी 2603 वाघ ते जास्तीत जास्त 3346 यांची सरासरी काढण्यात येऊन हा 2967 आकडा ठरविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तर असे करताना कॅमेरा कॅप्चर व रिकॅप्चर या पद्धतीचा वापर करून 2591 वाघ असल्याचे आढळून आले आहे. असे करताना यापैकी 87 टक्के वाघ हे प्रत्येकाची ओळख पटवून मोजलेले आहेत. त्यामुळे या आकडेवारीला आता वाघांच्या संख्येचा अंदाज (एस्टिमेशन) असे म्हणण्यापेक्षा वाघांची गणना, असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.
 
1973 साली 18,278 चौ. कि.मी. वनक्षेत्रावर घोषित झालेले 9 व्याघ्र प्रकल्प आता 2018 साली 20 राज्यांमध्ये 50 च्या संख्येत 72,749 चौ. कि.मी. वनक्षेत्रावर पसरले आहे. फक्तच वाघच या व्याघ्र प्रकल्पांमध्येच अस्तित्वात आहेत असे नाही. ते या प्रकल्पांच्या बाहेर असणार्‍या वनक्षेत्रात तसेच वन्यजीव अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्येही विखुरले आहेत. त्यामुळेच ही व्याघ्रगणना 3,81,400 चौ. कि.मी. एवढ्या वनक्षेत्रात करण्यात आली. त्यासाठी 141 स्थळांची निवड करून त्यात 26,838 ठिकाणी प्रत्येक 2 चौ. कि.मी. वनक्षेत्रात मध्ये एक जोडी याप्रमाणे कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात येऊन प्रत्यक्ष 1,21,337 चौ. कि.मी. वनक्षेत्रावर या कॅमेरांमधून टेहळणी करण्यात आली. प्रत्येक व्याघ्र प्रकल्प किंवा संरक्षित क्षेत्रात 200 चौ. कि.मी. क्षेत्रात हे कॅमेरा 25 ते 30 दिवस लावण्यात आले होते. यातून जवळपास 34,858,623 फोटो गोळा करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशियल इंटेलिजन्स)विषयक सॉफ्टवेअर वापरून त्या फोटोंची छाटणी केली असता, त्यामध्ये 76,651 वाघांचे, तर 51,777 बिबट्यांचे फोटो व उर्वरित इतर वन्यप्राण्यांचे फोटो असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पुन्हा सॉफ्टवेअर वापरून यातील एकाच वाघाचे अनेक फोटो वेगळे करून प्रत्येक वाघाची ओळख पटविण्यात आली.
 
यावेळी आणखी एक काम करण्यात आले. हे वाघ व बिबटे ज्या सांबर, चितळ व इतर तृणभक्षी प्राण्यांवर जगतात त्यांची घनता, त्यांच्या विष्ठा व त्यांच्या अधिवासावर असणारा जैविक व मानवी दबाव ही माहितीही सुमारे 317,958 ठिकाणांचे सर्वेक्षण करून जमविण्यात आली. यासाठी वनकर्मचारी व माहिती संकलन करणार्‍या प्रशिक्षित व्यक्तींनी 5,22,996 कि.मी. चालून एम स्ट्राईप नावाच्या मोबाईल ॲपच्या साहाय्याने दोन टप्यांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण केले. सुंदरबनसारख्या दलदलीच्या जंगलात या पद्धतीमध्ये बदल करून बोटींचा वापर करण्यात आला. भारतातील 491 वनविभागांमधून ही माहिती जमविण्यात आल्याचे सर्वेक्षणकर्त्या भारतीय वन्यजीव संस्थेने या अहवालात म्हटले आहे.
 
वाघांचा वावर फार पूर्वी देशातील संपूर्ण जंगलात आढळून यायचा. त्यामुळेच सन 1989 मध्ये व्याघ्र प्रकल्पांमध्ये 1327 वाघ, तर प्रकल्पांच्या बाहेर असणार्‍या राखीव वनांमध्ये जवळपास 3007 वाघ आढळून आले होते. परंतु, कालांतराने बाहेरील वनक्षेत्रांमधील वाघांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे यानंतर वाघांचे अस्तित्व फक्त काही व्याघ्र प्रकल्प व संरक्षित वनक्षेत्रांपर्यंत सीमित राहिले.
 
या 2018 च्या सर्वेक्षणामध्ये 2014 च्या तुलनेत मध्य भारतामध्ये वाघांचा वावर पुन्हा 8000 चौ. कि.मी. एवढ्या वनक्षेत्रात परत आढळून आला आहे. छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तेलंगाना, ओडिशा या राज्यांमध्ये वाघांच्या संख्येत तसेच व्याघ्र अधिवासांमध्ये र्‍हास झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. परंतु, मध्य भारतात या राज्यांचाही समावेश असल्याने या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे नेत्रदीपक यश असूनही ते झाकल्या गेले. तरीही संपूर्ण देशात मध्य भारताची सन 2014 मधील 688 वरून सन 2018 मध्ये 1033 वाघ ही झेप, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांनी असे नेमके काय केले की, ते संपूर्ण देशात आदर्श ठरलेत, हे पाहायला लावणारी आहे.
(पुढील भागात)