मानधन : माझे मला, मीच दिले...!

    दिनांक :18-Aug-2019
उदय भांगे
शीर्षक वाचून जरा गोंधळायला होईल... होणारच. कारण मुळात गोंधळ सुरू होतो असाच हा विषय आहे. ती घटना माझ्यासोबत घडली तेव्हा माझा तर पुरता गोंधळ उडाला होता. ‘पुरता गोंधळ उडणे’ या वाक्‌प्रयोगाचा मी ‘याचि देही...’ अनुभव घेतला.
 
दुपारची वेळ होती. सुट्‌टीचा दिवस होता. त्यामुळे छानपैकी जेवून डोळ्यांवर अंमल करू पाहणारी झोप गोंजारत मस्तपैकी पहुडलो होतो. आता दुपारची डुलकी लागणार तेवढ्यात मोबाईल वाजला. आपल्याला सुट्‌टीच्या दिवशी दुपारचे जागरण सहन होत नाही, तरीही मी मोबाईल अटेंड केला. कारण मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यापासून त्यावर महत्त्वाचेच कॉल्स येतात, असा आपला समज झालेला आहे. 

 
 
आताचा कॉल फारच महत्त्वाचा होता. कारण पलीकडून लोणकढ्या इंग्रजीत एक स्त्री बोलत होती. ती कुठल्याशा आंतरराष्ट्रीय कंपनीकडून बोलत होती. त्यांना आयटीचा काहीतरी सर्वे करायचा होता आणि मी त्यात तज्ज्ञ आहे, असे त्यांनी ठाम मत करून घेतले होते. त्यांना माझा छोटेखानी इन्टरव्ह्यू हवा होता. त्या बयेचे इंग्रजी समजून घेत अन्‌ माझे देशी इंग्रजी तिच्या गळी उतरवत मी पाऊणेक तास इंग्रजांचा सूड घेतला.
 
मुलाखत झाल्यावर ती म्हणाली, ‘‘सर, तुम्हाला याचे मानधन मिळेल. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि माहिती आमच्याशी शेअर केली आहे...’’
 
याला चार-पाच महिने होऊन गेले आणि मग एक दिवस आठवले की, आपल्याला ते मानधन तर आलेच नाही! मग त्यांनी दिलेल्या ई-मेलवर विचारणा केली, माझ्या मानधनाचे काय झाले? त्यानंतरही दोनेक महिन्यांनी लंडनच्या ईस्ट-वेस्ट बँकेचा धनादेश म्हणजेच शुद्ध मराठीत ज्याला चेक म्हणतात तो आला. तोही 365 पाऊंडांचा. आता त्या वेळी भारतीय रुपयाचे अन्‌ साहेबांच्या पाऊंडचे कसेकाय नाते होते, हे मला माहिती नाही. तरीही रक्कम मोठी होती. मी तो चेक तातडीने माझ्या बँकेत जमा केला. महिनाभराने बँकेकडून मला मेसेज आला, ‘ही बँक बंद होऊन बराच कालावधी लोटला आहे. तुम्ही असा चेक जमा केल्याने 700 रुपये दंड म्हणा, बँकेला लागलेला खर्च म्हणा तुमच्या खात्यातून कापून घेण्यात आला आहे...’
नंतर बँकेत गेल्यावर अधिकार्‍यांनी सांगितले की, ‘‘तुमच्या या खात्याचे डिटेल्स आता त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे खाते फेरफार करून घ्या...’’