ट्रक-कारच्या भिषण अपघात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु

    दिनांक :18-Aug-2019
नागपुर - औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरची घटना
 

 
चांदूर रेल्वे,
नागपुर - औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जवळील खारवगळ नाल्याजवळ खड्डा चुकविण्याचा नादात अल्टो कार व ट्रकच्या भिषण अपघातात अल्टोमधील चौघांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मुळचे असलेले व सध्या नागपुरातल्या कस्तुरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आई, पत्नी व मुलासोबत नागपुर वरून घुईखेडकडे एमएच ४९ यु ३४०९ क्रमांकाच्या कारने येत असताना घुईखेडजवळील खारवगळ नाल्याजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या टाटा मोटर्सच्या एमएच १७ बीडी ९७४३ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कार चालवित असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे (३२) व त्यांचा मुलगा कबीर अनिल चेंडकापुरे (४) यांचा जागीच मृत्यु झाला. तर अनिल यांची पत्नी प्रज्ञा अनिल चेंडकापुरे (३०) हिचा पुलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ भरती केले असता मृत्यु झाला तर आई लिलाबाई सारंगधर चेंडकापुरे (६०) यांचा सावंगी मेघे रूग्णालयात मृत्यु झाल्याचे समजते. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली. यामुळे काही वेळापर्यंत वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी पंचनामा केला असुन पुढील तपास ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश सिरसाट करीत आहे. या घटनेतील आरोपी ट्रकसोडून फरार झाला असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 
 हायवेवरील खड्ड्यामुळे गेला जीव
एक्सप्रेस हायवे असतानाही यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात आणुन दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत असुन याच खड्डामुळे एकाच परिवारातील ४ सदस्यांना जीव गमवावा लागला. यापुर्वी सुध्दा खड्डांमुळे झालेल्या अपघातातुन अनेकांचे प्राण गेले. मात्र प्रशासनाला अजुनही जाग आलेली नाही.