रोजगार मिळत नसल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    दिनांक :18-Aug-2019
अकोला,
रोजगार मिळत नसल्याने नैराश्यापोटी पातुर तालुक्यातील चान्नी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमोल पवार (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
चान्नी येथील अमोल पवार हा तरुण ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या घरी शेती नसल्याने त्याचे वडील व अमोल पवार हे दोघे मजुरी करीत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे रोजगार मिळत नसल्याने अमोल पवार निराश झाला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विंवचनेतच अमोलने आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला. अमोल पवार यांच्या वडिलांच्या फियार्दीवरून चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहे. मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून मदत देण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.