चिखली येथील बैलाच्या शर्यतीवर पोलिसांची कारवाई

    दिनांक :19-Aug-2019
21 जणांवर गुन्हा दाखल
30 लाखांचा ऐवज जप्त
मंगरुळनाथ, 19 ऑगस्ट
चिखली, 
पैशांच्या हारजीतवर बेकायदा बैलांची शर्यंत (शंकरपट) लावणार्‍यांकडून 30 लाख 11 हजारांचा ऐवज जप्त करुन 21 जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शेलुबाजार रोडवरील चिखली शेतशिवारात पोलिसांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे बैलांच्या बेकायदेशिर शर्यती भरविणार्‍यांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
 
 
मंगरुळनाथ पोलिसांच्यावतीने दिलेली माहिती अशी की, शेलुबाजार रोडवरील चिखली शेतशिवारात पैशांच्या हारजीतवर बेकायदेशिररित्या बैलांच्या शर्यंती सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मंगरुळनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले तेथे त्यांना रमेश पवार यांच्या शेतात रिंगीला जुंपलेले बैल व आखरेले शेत, नागरिकांची गर्दी दिसून आली. अधिक माहिती घेतली असता, सदरील शर्यंती पैशांच्या हारजीतवर अवैधरित्या घेतल्या जात असल्याचा खुलासा झाला. त्यामुळे घटनास्थळारुन 16 बैल, पाच रिंग्या, एक मोबाईल व आठ वाहने, बैलांना टोचण्यात येणारी पुराणी, बैल जोड्यांचे मालक व शर्यंती भरविणार्‍यांना पोलिासंनी ताब्यात घेतले. यावेळी मुख्य आयोजक गजानन वैजनाथअप्पा हापसे (वय 53) रा. शेलुबाजार व शंकर अनंतराव जुंगाडे (वय 32) रा. शेलुबाजार यांना विचारणा केली असता, प्रत्येक बैलजोडीकडून पाच हजार रुपये घेवून 100 मीटर अंतर कापून प्रथम येार्‍या बैलजोडी मालकास 40 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे घटनास्थळावरुन पोलिस पथकाने अंदाजे नऊ लाख 70 हजार रुपये किंमतीचे 16 बैल, 20 लाख रुपये किंमतीची आठ वाहने, 40 हजार रुपयाच्या चार रिंगी, एक हजार रुपयांचा मोबाईल व कुराणी असा एकूण 30 लाख 11 हजार रुपयाचा ऐवज पंचासमक्ष जप्त करण्यात आला. तसेच 21 जणांना ताब्यात घेऊन, पोलिस उपनिरीक्षक मंजूषा मोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांनी दिली आहे.