म्युच्युअल फंडातल्या यशाचा मंत्र

    दिनांक :19-Aug-2019
इक्विक्वटीतली गुंतवणूक शेअर बाजारातल्या जोखमीशी संबंधित असते. मात्र याच शेअर बाजारात गुंतवणूक करून काही जण श्रीमंत होतात तर काही आपला सगळा पैसा गमावून बसतात. एकाच शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांमध्ये एवढा विरोधाभास का असावा, हा प्रश्न अगदी सहज उपस्थित होतो. मानसिकतेला फरक याला कारणीभूत असतो, असं आपण म्हणू शकतो. व्यावसायिक फंड मॅनेजर्स इक्विटी म्युच्युअल फंड्‌सचं व्यवस्थापन करतात. मात्र शेअर बाजारातल्या चढ-उतारांचा फटका या फंडांना बसतो. त्यातही लघुकालीन गुंतवणूकीवर या चढ-उतारांचा अधिक प्रभाव पडतो. 
 
 
सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या पद्धती हाव आणि भीती या मानवी भावभावनांवर आधारित असतात. त्यातच इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना फक्त फॉर्म आणि पैसे भरून भागत नाही तर या क्षेत्राचा अभ्यासही करावा लागतो. चांगल्या परताव्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. संयमही राखावा लागतो. पण गुंतवणूकदार या बाबी गृहित धरतच नाहीत. म्युच्युअल फंडाची निवड करण्याआधी गुंतवणूकदारांनी आर्थिक उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे. आपण कशासाठी गुुंतवणूक करत आहोत हे गुुंतवणूकदारांना माहीत हवं. तसंच उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत गुुंतवणूक सुरू ठेवणंही गरजेचं असतं. मात्र नवे गुंतवणूकदार कोणत्याही नियोजनाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करतात. दूरदृष्टीचा अभावही शेअर बाजारातल्या अपयशाला कारणीभूत ठरतो. त्यातच आपण किती धोका पत्करायला हवा किंवा किती धोका पत्करू शकतो, याबाबतही नवे गुंतवणूकदार अनभिज्ञ असतात. परिणामी त्यांच्या हाती काहीच लागत नाही. असे लोक इतरांच्या मनातही भीती उत्पन्न करतात. यामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार शेअर बाजारापासून चार हात लांब रहाणं पसंत करतात.
 
या सार्‍या बाबी लक्षात घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी आपण पत्करू शकत असलेल्या जोखमीचा आढावा घ्यायला हवा. आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती जोखीम पत्करायला हवी हेही जाणून घ्यायला हवं. त्यानंतर फंडाचा नीट अभ्यास करायला हवा. या क्षेत्राचं ज्ञान नसेल तर आर्थिक सल्लागार िंकवा अनुभवी फंड वितरकाची मदतही घेता येईल.