हात दाखवून अवलक्षण!

    दिनांक :19-Aug-2019
आपल्याच कृतीने स्वत:ची आणि आपल्या देशाचीही बेइज्जती मोल घेणारे एक महाशय आहेत. त्यांचं नाव इम्रान खान! हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून जगभरात कुख्यात असलेल्या पाकिस्तानला आज कुणीही दरवाजात उभे करायला तयार नसताना, आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचे कृत्य या महाशयांनी नुकतेच जागतिक व्यासपीठावर केले. कारण काय तर म्हणे, भारताच्या संसदेने जम्मू-काश्मिरातील 370 कलम हटवून टाकले.
 
 
यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. कारण, या देशाचे राजकारणच आतापर्यंत काश्मीर या एकाच मुद्याभोवती फिरत राहिले. आता मोदी सरकारने 370 कलम हटविल्यामुळे काय उपाय करायचा म्हणून या देशाचे सुभेदार जगात अनेक देशांत फिरले, पण कुणीही समर्थन तर सोडाच, उलट रशियाने खड्या शब्दांत पाकिस्तानची कानउघाडणी केली. मग इम्रान यांनी आवडीच्या मुस्लिम देशांकडे जाऊन दयेची भीक मागितली. तशीही अलीकडे पाकिस्तानला भीक मागण्याची सवयच जडलेली आहे. त्याला अनुसरूनच ते वागले. पण, मुस्लिम देशांनीही हात वर केल्यामुळे इम्रानचे एक सुभेदार इतके निराश झाले की, आम्हाला कोणताही देश पािंठबा द्यायला तयार नाही, हे त्यांना जाहीर करावे लागले. किती ही मानहानी. मग इम्रान महाशयांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले. हा विषय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चर्चेला यावा, अशी त्यांची मनस्वी इच्छा. त्यासाठी इम्रान यांनी चीनला हाताशी धरले. हा विषय सुरक्षा परिषदेत चर्चेला येईल, चीन भारताला विरोध करेल, आणखी काही देश विरोध करतील, असा कदाचित इम्रानभाईंचा होरा असावा. पण, झाले उलटेच! चर्चा होईल, पण अनौपचारिक. कोणतेही अधिकृत पत्रक संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जारी केले जाणार नाही, अशा शब्दांत युनोच्या अध्यक्षांनी खडसावले. चीनने तोंडदेखलेपणा तेवढा केला. कारण, चीनचे पाकिस्तानात एक मोठे घोडे अडले आहे. चीनलाही हवेचा रोख आधीच समजला होता. 370 कलम रद्द करणे, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी ज्या क्षणी रशियाने जाहीर प्रतिक्रिया दिली, तेव्हाच युनोत काय होईल, याचा अदमास चीन आणि पाकलाही आला होता. अपेक्षेप्रमाणे सुरक्षा परिषदेत चर्चा झाली, पण बहुतेक देशांनी पाकिस्तानचीच कानउघाडणी केली. रशिया, फ्रांस, ब्रिटन आणि अमेरिकासुद्धा पाकिस्तानच्या विरोधात उभी ठाकली. बिचारे इम्रानभाई. केवढी ही नामुष्की. इम्रान खान यांना वाटले, काही देश तरी विरोध करतील. पण कसचे काय. सर्वांनी चार हात दूरच राहण्याची भूमिका घेतली. आता इम्रान महाशय दाद मागण्यासाठी जागतिक न्यायालयात जाणार आहेत म्हणे. कंबरेला तेल लावून जाण्याची खुमखुमी इम्रान खान यांची गेलेली दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे, युनोत जवळजवळ सर्वच देशांनी भारताची भूमिका उचलून धरली. युनोतील भारताचे स्थायी सदस्य अकबरुद्दीन यांनी तर स्पष्टच शब्दांत सांगितले की, जम्मू-काश्मीर हा भारताचे अभिन्न अंग होता आणि आहे. ही वास्तविकता पाकिस्तानने स्वीकारली पाहिजे. दहशतवादाला खतपाणी घालणे बंद केले तरच चर्चा होऊ शकते. अन्यथा नाही!
 
तिकडे अमेरिकेनेही पाकिस्तानला खडसावले आहे. दोन्ही देशांतील तणाव दूर करावा हेच सर्वांच्या हिताचे आहे, असा मोलाचा सल्ला ट्रम्प यांनी दिला. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानला देण्यात येणार्‍या रकमेत 444 दशलक्ष डॉलर्सची कपात करून टाकली. कूटनीतीच्या जागतिक सारिपाटावर द्यूत कसा खेळला जातो, याचे धडे इम्रानभाईंनी मोदी यांच्याकडून घेतले पाहिजे. 370 कलम रद्द करताच, जगभरातील सर्व देशांच्या राजदूतांना बोलावून त्यांना आपल्या भूमिकेची मोदींच्या शिलेदारांनी कल्पना दिली. 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान युनोत जाईल, चीनची मदत घेईल, हे भारताला अभिप्रेतच होते. त्यामुळे भारताने आधीच कूटनीतीचा अवलंब केला. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, चीन सध्या हॉंगकॉंगच्या आंदोलनामुळे कधी नव्हे एवढा त्रस्त आहे. त्याच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. उत्पादन मदंगतीने सुरू आहे. त्यामुळे चीन फारशी आदळआपट करणार नाही, हे भारत आधीच ओळखून होता. पाकिस्तानात तरी काय स्थिती आहे? ईदेच्या दिवशी तेथे टोमॅटो 300 रुपये किलो होते. भाज्या 100 ते 150 रुपये किलो होत्या. साधी पोळी 30 रुपयांची आहे. पाकिस्तानचे लोक इम्रानभाईंना शिव्या घालत आहेत. जनतेला दिलासा न देता, काश्मीरचे तुणतुणे वाजवत पाकिस्तान युनोत गेल्यामुळे पाकमधील वाहिन्यांनी इम्रानभाईंच्या सुभेदारांची चांगली खरडपट्टी काढली. इम्रान खान गेल्या दोन महिन्यांपासून पैशासाठी जगभर भीक मागत िंहडत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, बलुचिस्तानातील वाढता असंतोष. गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर म्हणजे पीओके आणि अक्साई चीन हे प्रदेशसुद्धा त्यात येतात, असे म्हटल्यापासून पाकिस्तान आणि चीन अस्वस्थ झाले आहेत. युनोत जर खुली चर्चा झाली असती, तर हॉंगकॉंग आणि बलुचिस्तानचा प्रश्नही उपस्थित झाला असता. याचीही चीनला धास्ती होतीच. आज पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला आहे. तो चवताळल्यागत करतो आहे. नुकताच त्यांना एक साक्षात्कार झाला. मोदी सरकार वांशिक सफाई करण्याचे धोरण अवलंबित आहे. मोदी सरकारची आण्विक शस्त्रांवर पूर्णपणे पकड आहे. त्याचा वापर तो यासाठी करण्याची शक्यता आहे. इम्रानभाई, आधी आपली अण्वस्त्रे सांभाळा. ती अतिरेक्यांच्या हातात जाणार नाहीत, याची काळजी घ्या. भारतातील अल्पसंख्य समुदाय सुरक्षित आहे. पाकिस्तानात किती सुरक्षित आहे? अतिरेक्यांना दाणे टाकणे थांबवा आणि जागतिक बेइज्जती होणार नाही, याची काळजी घ्या. भारतात आता लेचेपेचे सरकार नसून मोदींचे सरकार आहे, हे लक्षात ठेवा.
 
आपण कोणतीही अनुचित कृती केली तर भारत दहा पटींनी उत्तर देऊ शकतो, याचा अनुभव दोन सर्जिकल स्ट्राईकवरून इम्रानभाईंनी घेतला असेलच. त्यामुळे बाजवा वगैरे लोक कितीही धमक्यांची भाषा वापरीत असले, तरी त्यांना कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी दहादा विचार करावा लागणार आहे. 370 रद्द झाल्याने जम्मू आणि लडाख हे दोन्ही प्रदेश आनंदोत्सव साजरा करीत आहेत. पण, काश्मीर खोेरे शांत असल्याचे पाहून इम्रान आणि बाजवा अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते काश्मिरी युवकांच्या हाती शस्त्रे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. इम्रान यांनी असे न करता, दहशतवादाला मूठमाती द्यावी आणि भारतासोबत चर्चेसाठी एका टेबलावर यावे. आता तर चर्चेचा अजेंडाही बदलला आहे. फक्त पीओकेवर चर्चा तेवढी होऊ शकते, असे संरक्षणमंत्री राजनाथ िंसह यांनी म्हटले आहे. त्याची तयारी करा. आज खोर्‍यातील जनमतही शांत आहे. किरकोळ घटना वगळता कोणतीही मोठी घटना तेथे घडलेली नाही. सोमवारपासून तेथे वातावरण मोकळे होणार आहे. तेव्हा काय प्रतिक्रिया उमटते हे दिसेलच. त्यामुळे आमच्या सुरक्षा दलांना येणार्‍या काळात अधिक सतर्क राहावे लागेल. ऑक्टोबरमध्ये श्रीनगरला गुंतवणूकदारांची मोठी परिषद भरणार आहे. ती परिषद यशस्वी करण्याचे मोठे आव्हान मोदी सरकारसमोर आहे. सीमेवर डोळ्यांत तेल घालून राहावे लागेल. येणारा महिना तरी खोर्‍यात आव्हानांचा असणार आहे.