रेल्वे प्रवास यापुढे राहणार अधिक सुरक्षित!

    दिनांक :19-Aug-2019
•विजय सरोदे
 
रेल्वेमधील प्रवास यापुढे पहिल्यापेक्षाही सुरक्षित राहणार आहे! याचे कारण म्हणजे - रेल्वेने स्वत:चे कमांडो दल (फोर्स) तयार केले आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण (वर्ल्ड क्लास ट्रेिंनग) घेतलेले हे कमांडो 24 तास रेल्वेच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. रेल्वेचे हे कमांडो दल नक्षली आणि दहशतवादी हल्ल्यांशिवायही कोणत्याही प्रकारच्या संकटग्रस्त स्थितीत रेल्वे प्रवासी व रेल्वेची संपत्ती यांच्या रक्षणार्थ सज्ज राहतील. या विशेष दलाला खास कोरस (कमांडोज फॉर रेल्वे सिक्युरिटी) हे नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर 1200 कोरस कमांडोजना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. 
 
 
हे कमांडो विशेषत: काश्मीर, ईशान्येकडील राज्यांसह इतर नक्षल प्रभावित क्षेत्रातही पाठविण्यात येणार आहेत. त्यांना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक प्रक्षिक्षणही दिले जाणार आहे. याबरोबरच रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांची गयही केली जाणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे पोलिस दलाने (आरपीएफ) अशा सुमारे 1000 तिकीट दलालांना रंगे हाथ पकडले आहे. आगामी काळातही अशा लोकांवर ही धरपकडीची कारवाई आणखी गतिमान होणार आहे. जर कुठलाही अधिकारी यात सामिल असल्याचे आढळून आले तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.
 
म्हणजेच या स्वातंत्र्यदिनापासून आपला रेल्वे प्रवास सुरक्षित झाला व तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांवरही अशा प्रकारच्या कारवाईचा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार आहे! त्यामुळे आपणास वेळेवर तिकीट मिळू शकणार आहे. मात्र चालू रेल्वेगाडीत होणार्‍या चोर्‍या व लुटालुटीला आळा घालणे जरुरीचे असून त्यासाठीही आरपीएफचे विशेष दल कार्यरत असणे आवश्यक आहे. काही वेळा भर डब्यात ऐन गर्दीत अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते येऊन कसलीही स्वच्छता व दर्जा नसलेले पदार्थ विकत असतात. त्यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
 
सरकार स्वयंचलित वाहन क्षेत्राच्या (ऑटो सेक्टर) पुनरुज्जीवनासाठी (रिवाइवल) मोठे पॅकेज जाहीर करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
 
प्रवासी वाहनांसह (पॅसेंजर कार) दुचाकी (बाईक) आणि वाणिज्य (कमर्शियल) वाहनांच्या विक्रीतही घट झालेली आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) तर्फे जारी आकड़ेवारी नुसार जुलैमधील पॅसेंजर्स कारची विक्री वार्षिक आधारावर तब्बल 36 टक्क्यांनी घटून 1 लाख 22 हजार युनिट इतकीच राहिलेली आहे, तर कमर्शियल वाहनांची विक्रीही वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी कमी होऊन 56 हजार 866 युनिट एवढीच झालेली आहे.
 
लवकरच आपल्या गल्लीतील दुकानदारही आपल्या दररोजच्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा ऑनलाईन करणार आहे! त्यामुळे आपल्याला माल घेण्यासाठी दुकानात येण्याची गरज भासणार नाही. फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पारंपरिक व्यापारीही आता ऑनलाईन डिलिव्हरी करणार आहेत. येत्या तीन महिन्यांत असे एक लाख व्यापारी आपल्या नेहमीच्या ग्राहकांसाठी ऑनलाईनचा मार्ग चोखाळणार आहेत. यासाठी जागतिक पातळीवरही संधान बांधले (लिंकिंग केले) जाणार आहे. सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर्सचीही मदत घेतली जाईल. एवढे मात्र खरे की व्यापार वाढविण्यासाठी ई-कॉमर्सची नितांत आवश्यकता असल्याचे या किरकोळ व्यापार्‍यांच्या (रिटेल ट्रेडसर्र्) लक्षात आले आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या म्हणण्यानुसार युवकांमध्येच ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढली असल्याने त्यासाठीच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे जरुरीचे झाले आहे.
 
मात्र या ऑनलाईन शॉपिंगमध्येही ग्राहकांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी केंद्र सरकारने अशा कंपन्यांवर त्वरित कारवाई करून ज्यांचे नुकसान झाले, त्यांना भरपाई मिळवून देणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांवरील ग्राहकांचा विश्वास उडण्याची शक्यताच जास्त राहणार आहे.