माधव लवकरच दिसणार घईंच्या चित्रपटात

    दिनांक :19-Aug-2019
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चं यंदा हे दुसरं पर्व सुरु आहे. या पर्वामध्ये अनेकांनी सहभाग घेतला असून हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोमुळे अनेक जण प्रकाशझोतात आले. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे माधव देवचके. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामध्ये सहभागी झालेला माधव काही दिवसापूर्वी घरातून बाहेर पडला. विशेष म्हणजे या शोमधून बाहेर पडल्यानंतर माधवला चक्क सुभाष घई यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
 
 
 
यारों का यार म्हणून ओळखला जाणारा माधव बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकला नाही. मात्र त्याला शो मॅन सुभाष घई यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता ऑर्ट्स या निर्मिती संस्थेअंतर्गंत तयार होणाऱ्या ‘विजेता’ या चित्रपटामध्ये माधव झळकणार आहे. अमोल शेडगे दिग्दर्शत या चित्रपटामध्ये माधवव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. ‘विजेता’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या चित्रपटात माधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसापूर्वीच अभिनेता सुबोध भावे यानेदेखील ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली.
“बिग बॉस केल्यानंतर लगेचच सुभाष घईंसारख्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा मिळाला, हे माझे भाग्यच म्हणायला हवे. सुभाष घईंसारख्या दिग्गज फिल्ममेकरच्या सिनेमात काम करायला मिळणं ही निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजवर त्यांचे सुपरडूपर हिट सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालोय. आणि आता त्यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नवतच,”असं माधव म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “बिग बॉसचे फिल्मसिटीमध्ये सध्या जिथे घर बांधण्यात आले आहे. ती जागाच खरं तर माझ्यासाठी खूप लकी आहे. या अगोदर याच जागी ‘हमारी देवरानी’ आणि ‘सरस्वती’ या माझ्या दोन सुपरहिट मालिकांचे सेट लागले होते. ‘हमारी देवरानी’, ‘सरस्वती’ आणि ‘बिग बॉस’ माझ्या करिअरमधले तीन टर्निंग पॉईंट ठरले आहेत.”