टिप्पर व खाद्यतेलाच्या टँकरमध्ये धडक

    दिनांक :19-Aug-2019
*टँकरमधून तेल नेण्यासाठी एकच गर्दी
 
नागभीड,
खाद्य तेल घेऊन जाणार्‍या एका ट्रँकरला टिप्परने मागावून जोरदार धडक दिली. यात टँकर फुटून रस्त्यावर तेलाची धार लागली. याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घरातील साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली व तेल भरून घरी नेणे सुरू केले. सायंकाळपर्यंत नागरिकांचा हा उपक्रम सुरूच होता. ही घटना तालुक्यातील मोहाळी-बामणी मार्गादरम्यान सोमवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.
 

 
खाद्य तेलाचा एक टँकर नागपूर जिल्ह्यातील भुयाराजवळील कारखान्यातून सोयाबीन तेल भरून ते छत्तीसगड येथील तेल शुध्दीकरण कारखान्याकडे जात होता. दुपारी 12 वाजताच्या सुमारास नागपूर महामार्गावरील मोहाळी-बामणी गावादरम्यान मागून येणार्‍या टिप्परच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोर जात असलेल्या टँकरच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. यात टिप्परच्या समोरील कॅबीन चकनाचूर झाली, तर खाद्य तेलाचा टँकर फुटला. त्यामुळे टँकरमधील तेल बाहेर पडून रस्त्यावर वाहू लागले. परिसरातील गावकर्‍यांना हे समजताच त्यांनी तेल भरणसाठी घरातील गुंड, पिंप, कॅन, चरवी आदी साहित्य घेऊन घटनस्थळी धाव घेतली व त्यात तेल भरून ते घरी नेणे सुरू केले. त्यामुळे घटनास्थळावर तेल नेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. तेथे असलेल्या वाहतूक पोलिसांनी नागरिकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणीच ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. काही नागरिक, तर टँकरवर चढून तेल काढू लागले. सायंकाळीपर्यंत नागरिकांचा तेल घरी नेण्याचा उपक्रम सुरूच होता.