मायग्रेनला कमी लेखू नका...

    दिनांक :02-Aug-2019
सर्वसामन्यपणे डोकेदुखीला आपण सहजतेने घेतो. पण नेहमी होणारी डोकेदुखी सहज घेणं महागात पडू शकते. सतत होणार्‍या डोकेदुखीचं कारण मायग्रेन ही असू शकतं. मायग्रेन म्हणजे अर्धशिशीमध्ये डोक्याच्या एकाच बाजूला वेदना होतात. तीव्र स्वरूपाच्या या वेदना काही वेळ किंवा तीन तासापर्यंतही राहतात. तीव्र डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ अशा प्रकारचा त्रासही होऊ शकतो. भडक प्रकाश किंवा गोंगाटानेही अर्धशिशीच्या रुग्णाला त्रास होण्याची शक्यता असते. मायग्रेनच्या सततच्या त्र्रासाने ब्रेन हॅमरेज किंवा पॅरेलिसिसचा त्रास होण्याची शक्यता असते. 
 
 
हाय ब्लडप्रेशर असलेल्या व्यकतींना मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जर तुमच्या भावना दाबून ठेवत असाल तर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. मायग्रेन हा आजार अनुवांशिकही असतो. स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन मायग्रेनचं कारण बनू शकतं. मायग्रेनचा त्रास होत असल्यास थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवा. असं केल्याने धमन्या प्रसरण पावतात आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
 
ताण- तणाव कमी करणार्‍या उपायांचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मायग्रेनपासून मुक्ती मिळायला मदत होते. जास्त वेळ उपाशी राहणं टाळा म्हणजे मायग्रेनचा त्रास होणार नाही. तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी भडक प्रकाश, गोंगाट किंवा उग्र वास यांपासून दूर रहा. तुम्ही जंक फूडचे अधिक भोक्ते असाल तर मायग्रेची तीव्रता वाढू शकते यामुळे जंक फूड किंवा पॅक्ड फूडपासून लांब रहा. पनीर, चॉकलेट, चीज, नुडल्स, केळी अशा पदार्थांपासून मायग्रेनच्या रुग्णांनी लांब राहणं योग्य असतं.