तरुणाईच्या आरोग्य समस्या...

    दिनांक :02-Aug-2019
• डॉ. अपर्णा आल्हाद सदाचार
 
नमस्कार!
आपण तरुणाईच्या काही समस्यांत डोकावू या.
  • रश्मीला डोकेदुखीचा फार त्रास होतोय, सोबत उलट्याही. हा त्रास दर महिन्यातून दोनदा तरी होतोच. खूप औषधं घेतली, तात्पुरतं बरं वाटलं, पण पुन्हा तेच...
  • रेशमाच्या केसांत कोंडा फार. कितीही महागडे ‘डॅण्ड्रफ फ्री’ शॅम्पू वापरले तरी काही फरक दिसत नाही, त्वचाही कोरडी आणि मुरूम तर विचारूच नका.
  • प्रतीक्षाला पाळीचा त्रास झालाय. औषंधाचा वापर सतत करत राहावा लागतो.
  • खुशबूला ॲनिमिया डिटेक्ट झालाय. आता जर इंजेक्शन देऊन काम झालं नाही, तर ब्लड द्यावं लागेल. कारण अभ्यासाच्या वेळापत्रकात तिच्याकडे जेवण करायलादेखील वेळ नसतो, म्हणून खूप अशक्तपणा आलाय.

 
सख्यांनो, ही सगळी 14 ते 25 या वयोगटातली काही प्रातिनिधिक उदाहरणं. आमच्याकडे अशा प्रकारच्या अनेक समस्या घेऊन या तरुण मुली येण्याचं प्रमाण वाढलंय. यात भ्रमणध्वनी आणि आंतरजाल (इंटरनेट) यामुळे आणखीनच भर पडलीय.
इतक्यातच सिद्ध झालंय की, सोशलमीडियाचा अत्याधिक वापर आपल्याला शारीरिक आणि मानसिक आजार होण्यास कारणीभूत ठरतो.
 
धकाधकीच्या या जीवनात शाळा, कॉलेज आणि जीवघेणी स्पर्धा यांनी आजचा तरुण विद्यार्थी गोंधळून गेलेला दिसतोय आणि याचमुळे, न्यूनगंड, डिप्रेशन आणि मानसिक ताण-तणाव यातून त्यांना जावे लागत आहे. अनेक आजार त्यांना घेरू पाहत आहेत. वेळीअवेळी जेवणामुळे ॲनिमियासारखे आजार मुलांना होत आहेत. मुलींमध्ये पाळीचा त्रास, पाळीची अनियमितता, पांढरे पाणी जाणे, त्यातून पाय दुखणे, पोटात दुखणे इत्यादी प्रकार होत आहेत. योग्य आणि सकस आहार न घेतल्यामुळे, अकाली केस पिकणं, केस गळणं, डोक्यात कोंडा होणं, त्वचा निस्तेज होणं आणि त्यावर पुरळ येणं यांसारख्या अनेक गोष्टी होताना दिसत आहेत.
 
रस्त्याच्या कडेला मिळणारे पदार्थ, फास्ट फूड, चायनीज, जंक फूड खाण्यामुळे नेगेटिव्ह 000000माल00000000 नुट्रीशनच्या केसेस जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. मुलींना लट्ठपणा आणि हायपो थायरॉईडीझमसारखे आजार जडायला सुरवात झालेली आहे. दर दहा मुलींमध्ये चार ते पाच मुलींना वरील त्रास किंवा पाळीचे विकार होत आहेत.
 
अशी पिढी पुढे लग्न झाल्यावर माता बनण्यास तयार होते त्या वेळी वंध्यत्वासारख्या समस्या घेऊन समोर येतात व पुढे निर्माण होणारी पिढी कमकुवत होते. पुढे लसीकरण, प्रतिजैविकांचा मारा करून नव्या पिढीच्या रोगप्रतिकारकशक्तीचं खच्चीकरण होताना आढळतंय. हे सगळं टाळायचं असेल तर काय कराल? घाबरण्याचं काहीच कारण नाही.
 
  • गृहिणी, आई, मुलगी, सून म्हणून आपली काय जबाबदारी आहे ते आपण बघू.
  • पहिलं म्हणजे, ‘लवकर उठे त्यासी आरोग्य-धनसंपदा लाभे!’ हे ब्रीद आपल्या आयुष्यात उतरवणे.
  • हे कटाक्षाने पाळून टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप ही प्रलोभनं दूर सारून लवकर झोपावं.
  • झोपताना नामस्मरण किंवा श्लोक म्हणावेत.
  • विज्ञानाने हे सिद्ध केलंय की, अशा प्रकारच्या शांत भाव असलेल्या रचना रात्री झोपताना म्हटल्या किंवा ऐकल्या की मन शांत आणि एकाग्र होतं व शांत झोप लागण्यास मदत होते.
पहाटे लवकर उठून शौच, मुखमार्जन आदी उरकून सूर्यनमस्कार, योगासनं करावीत. सकाळी चांगला व्यायाम केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि मधुमेह, डिप्रेशन, थायरॉईडच्या समस्या तसंच लठ्ठपणा आपल्यापासून दूर पळतो. नंतर स्नानादी उरकून न्याहारी (ब्रेकफास्ट) घ्यावी (आपल्या भारतात अनेक स्त्रिया सकाळी न्याहारी घेतच नाही आणि मग त्यांना हायपर ॲसिडिटीसारख्या समस्या भेडसावतात, पुढे त्याचं रूपांतर मायग्रेनमध्ये होतं). न्याहारीत खजूर, बेदाणे, अक्रोड, बदाम, काळ्या मनुका; तसंच दूध, अंडी, मोड आलेली कडधान्यं आणि भारतीय पारंपरिक पदार्थ जसे उपमा, शिरा, उकरपेंडी, पोहे, सांजा, थालीपीठ इत्यादींचा समावेश असावा. दुधात आळीव्ह घेतल्याने कॅल्शिअम आणि आयर्न यांची कमतरता कधीच जाणवणार नाही. आठवड्यातून एकदा तरी इडली, डोसा यांसारखे आंबवलेले पदार्थ खावेत.
 
जेवणात वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, सलाद, दही, ताक, आमटी, कढी या सर्व पदार्थांचा आलटूनपालटून समावेश करावा, यालाच चौकस आहार असं म्हणतात. मुरमुरे, फुटाणे, लाह्या आणि विविध फळं, भरपूर प्रमाणात पाणी यांचा आपल्या आहारात अंतर्भाव करणं आवश्यक आहे.
 
आठवड्यातून एकदा घरी केलेले गोड पदार्थ घेण्यास हरकत नाही.
तेल, तूप, मीठ, साखर हे पदार्थ प्रमाणात घेतल्यास शरीराला पोषकच असतात.
आपल्या देशात आपण ज्या प्रांतात राहतो तेथील पारंपरिक पदार्थांचा जेवणात समावेश करणं उत्तमच आहे आणि पारंपरिक सणांना तयार होणारे पदार्थ आरोग्याला पोषक ठरतात, त्याची चर्चा आपण पुढे करू.
 
अशाप्रकारे आजच्या स्पर्धायुगात अव्वल राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, झोप आणि आपले आवडते छंद जोपासणं फार आवश्यक आहे. यानेच आपलं मन आणि शरीर निरोगी राहून आपण स्वतःला आणि परिणामी आपला परिवार आणि समाज सक्षम, सुदृढ घडवण्याकरिता हातभार लावू शकतो.