‘रयतेचे राज्य’ पुन्हा यावे!

    दिनांक :02-Aug-2019
राजकीय पक्षांचे नेते, मग ते सत्तेवर असो की विरोधात, आपली लोकप्रियता कितपत आहे, हे जाणून घेण्यासाठी, पक्षाचा प्रचार करण्यासाठी, निवडून येण्यासाठी किंवा पक्षाची ध्येयधोरणे अखेरच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी, लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या मार्गांचा उपयोग करताना दिसतात. जनताजनार्दनाशी संवाद साधण्यासाठी परिवर्तन यात्रा, संदेश यात्रा, संघर्ष यात्रा यापूर्वीही निघालेल्या आहेत आणि त्याचा त्या त्या पक्षाच्या नेत्यांना फायदा झालेला आहे. त्याच धर्तीवर ‘पुन्हा आणू या आपले सरकार’ हा उद्देश डोळ्यांपुढे ठेवून, महाराष्ट्राचे लाडके, युवा, तडफदार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरुकुंज मोझरी येथून महाजनादेश यात्रेचा बिगुल फुंकला. एका अर्थाने त्यांनी क्रांतिकारी नेत्यांना स्मरून राज्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धारच या यात्रेच्या निमित्ताने केला आहे. कुणी म्हणेल, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील विजयाने देवेंद्र फडणवीस यांचा विजय निश्चित झाला असताना, कशाला हवी महाजनादेश यात्रा? पण, कोणतीही निवडणूक ही राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शनाचा भाग असते आणि ती जिंकण्यासाठी, विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी लोकशाहीच्या या सारिपाटावरील प्रत्येक पाऊल जपून आणि खंबीरपणे टाकावे लागते. विरोधकांची कोंडी करून, त्यांच्या शक्तीचा अभ्यास करून, स्वपक्षाची ताकद ओळखून, कार्यकर्त्यांचा उत्साह जोखून, निधीची पुरेशी तरतूद करून, योग्य नियोजन करून, योजनेची अंमलबजावणी करून, त्याला जनसंपर्काची आणि कामाची जोड दिली, तर उमेदवार आणि त्याचा पक्ष हमखास निवडून येण्याची खात्री देता येते. निवडणुकीच्या या समीकरणातून कुणाची सुटका नाही. याच आयुधाचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची घोषणा केली आणि त्याचा शुभारंभ, त्यांच्या प्रत्येक यशाच्या वेळी त्यांची साथ देणार्‍या राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत करून, येणारा दिवस त्यांचाच असणार, यावरही शिक्कामोर्तब केले.

 
विरोधक असो वा सत्ताधारी, आपल्या राज्यघटनेनुसार प्रत्येक राजकीय पक्षाला आणि त्या पक्षाचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला दर पाच वर्षांनी जनताजनार्दनाचा आशीर्वाद घेण्यासाठी जावेच लागते. तुम्ही जर पाच वर्षांत योग्य कामे केली नसतील, तर निवडणुकीत कितीही पैसा फेका, कितीही मोठी कार्यकर्त्यांची फौज उतरवा, कुणाला कितीही आमिषे द्या, त्याला येथील जनता भीक न घालता त्याची जागा दाखवल्याशिवाय राहात नाही. खरेतर ही महाजनादेश यात्रा प्रारंभ करून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विजयाची कोनशिलाच आज रचली आहे. युद्धात कुणाची किती ताकद आहे याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी योग्य संधीचा वापर करण्याला आहे. त्यासाठी योग्य काळ आणि वेळेची निवड करण्यात त्यांना यश आले आहे. राज्यातील सारे विरोधक ढेपाळलेले असताना, लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवातून सावरलेले नसताना, गाफील असताना आणि स्वपक्षीय नेत्यांच्या पक्षांतराने गारद झाले असतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेचा प्रारंभ करून त्यांची पुरती कोंडी केली आहे. विरोधी पक्षाचे फलंदाज पीचवर उभे राहून सेटल होण्यासाठी कंबर कसत असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या चमूने त्यांना घातक गोलंदाजी करीत त्रिफळाचीत करून टाकले आहे. खरेतर गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आणि विभिन्न जातिसमुदायांसाठी केलेल्या कामांची यादी करतो म्हटले, तर एखादी डायरी भरून जाईल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी हे राज्य गेल्या 60-70 वर्षांत इतके खड्‌ड्यात घातले होते की, साधी साधी कामे करूनही मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर मात करता आली. प्रारंभीच्या काळात वैदर्भीय मुख्यमंत्री... हा काय मुंबईत येऊन काम करणार, अशी हेटाळणीही झाली. पण, देवेंद्र फडणवीस यांनी या पदावर आरूढ होताच कामांचा असा झपाटा लावला की, भल्याभल्यांची झोप उडून गेली आणि अनेकांची बोटं आश्चर्याने तोंडात गेली. केंद्रात नरेंद्र मोदींनी विकासाचा झंझावात लावला आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांनी विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी कंबर कसली.
 
देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली त्याच वेळी विरोधकांनी म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्याविरोधात कोल्हेकुई सुरू करून दिली होती. हा अननुभवी आणि इतका तरुण नेता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कशी सांभाळू शकेल, असे प्रश्न उपस्थित करून ते हतोत्साहित होतील, अशा अनेक कारवाया विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत करून पाहिल्या. महाभारतात कौरव जसे पांडवांना हतोत्साहित करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कुभांड रचत, त्याच धर्तीवर विरोधकांनी वारंवार सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. पण, ज्याप्रमाणे कौरवांचे सारे डाव पांडवांनी योजनाबद्ध पद्धतीने उलथवून लावले, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रत्येक चक्रव्यूहात केवळ प्रवेशच केला नाही, तर तो भेदून काढत विजयाची दुंदुभीही दिली.
 
विरोधकांच्या जातीयवादी राजकारणाचा अनुभव या राज्यातील निरनिराळ्या जाती-धर्माच्या लोकांनी घेतला. अनेकांना त्यांच्या अशा भूमिकांचे चटकेदेखील बसले. अनेकांची त्या वेळी सत्ताधार्‍यांविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नव्हती. अशा अनेक अबोल लोकांचा, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आवाज झाले. त्यांच्या हाकेला ओ देते झाले आणि त्यांच्या पदरी न्याय टाकण्याचे कर्तव्यही त्यांनी बजावले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केवळ फुले, शाहू, आंबेडकरांची नावे घेतली नाहीत, तर या महापुरुषांच्या अनुयायांना न्याय देण्याचा आणि त्या महापुरुषांच्या नावाने अस्तित्वात असलेल्या स्मृतिस्थळांच्या विकासासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिला. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून लटकला होता. त्या मुद्यावरून जातीचे राजकारणही झाले. मुख्यमंत्र्यांची जात काढून, हा काय मराठ्यांचे, दलितांचे, पीडितांचे आणि शोषितांचे प्रश्न सोडवणार, असे प्रश्नही उपस्थित केले गेले. पण, ज्याच्या मनात ‘जात’ नावाला थाराच नाही, जो घराच्या उंबरठ्याबाहेर जात विसरतो आणि ज्यांच्यात सामील होतो, त्यांच्याच जातीचा, समाजाचा होऊन जातो, अशा देवेंद्र फडणवीसांच्या प्रगतीत जात कधीच आडवी आली नाही, याची प्रचीती या राज्यातील जनतेला आली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी किती राजकारण केले, हे आपल्या सार्‍यांना माहिती आहे. सरसकट कर्जमाफीची मागणी करून लाभ लाटण्याचे प्रयत्न झाले, पण मुख्यमंत्री बधले नाहीत. पाणी, उद्योग, कृषी, प्रशासन, रस्ते, दूरसंचार आदी सार्‍याच क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारांच्या तिप्पट कामे त्यांनी केली. वैदर्भीयांना तर त्यांनी मुक्तहस्ते दान दिले. मुंबईचा कायापालट केला. राजकारणातील अहंपणाला चाप लावला. प्रोअॅक्टिव्ह भूमिका घेत, ‘रयतेचे राज्य’ ही छत्रपतींच्या राज्याची कल्पना साकारली. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हेच राज्य पुन्हा यावे, अशा शुभेच्छा देऊ या!