संततधार बरसनाऱ्या पावसाने पुन्हा तोडला भामरागडचा संपर्क

    दिनांक :02-Aug-2019
गडचिरोली,
जिल्हयात संततधार बरसणाऱ्या पावसाने अनेक नदी,नाले दुथडी भरुन वाहत आहे. काल आणि आज झालेल्या मुसळधार पावसाने भामरागड तालुक्याचा पुन्हा एकदा जगाशी संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गाव पुन्हा एकदा संपर्क क्षेत्राच्या बाहेर झाले आहेत. आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली व कुमरगुडा नाल्यावरही पाणी आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
 
 
मागील आठवड्यात 27 जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात सतत मुसळधार पावसाने कहर केला होता. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने 28 जुलै ते 31 जुलै पर्यंत सतत चार दिवस भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटलेला होता. 31 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान पर्लकोटा नदीवरील पूर ओसरल्याने रहदारी सुरू झाली होती.मात्र, पुन्हा आज पर्लकोटा नदीवरील पुलावर पाणी चढल्याने अल्लापल्ली भामरागड मार्ग बंद झालेला आहे.
भामरागड तालुक्याच्या मुख्यालयात पाणी शिरल्याने येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासनाने तब्बल 300 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार की काय?? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरवर्षीच भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसत असून पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे मात्र या मुख्य प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी भामरागड वासियांना पूर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.