घाईघाईचे निष्कर्ष...

    दिनांक :02-Aug-2019
न मम  
 श्रीनिवास वैद्य 
 
 
नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यापासून सोशल मीडियावर सक्रिय राईट विंगर्स (कथित मोदी समर्थक) व लिबरल्स (मोदीद्वेष्टे) दोघेही अधिक कडव्या टोकाकडे जाताना दिसत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे झोमॅटो प्रकरण. झाले असे की, जबलपूर येथील, स्वत:ची ओळख पंडित अमित शुक्ला सांगणार्‍याने एक टि्‌वट केले- झोमॅटोवर खाद्यपदार्थाची ऑर्डर दिल्यावर ते पदार्थ आणणारा मुस्लिम होता म्हणून मी ती स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, झोमॅटोने ‘डिलिव्हरी बॉय’ बदलविण्यास नकार दिला तसेच पैसे परत करणार नाही म्हणून सांगितले. मी म्हटले की तुम्ही मला ऑर्डर स्वीकारण्याची बळजबरी करू शकत नाही. मला तुमचे रिफण्डही नको. ऑर्डर रद्द समजा. हे टि्‌वट या शुक्ला महाशयांनी सार्वजनिक केल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. अमित शुक्लाचे म्हणणे आहे की, आमचा श्रावण महिना सुरू आहे आणि या काळात मला मुस्लिमाकडून खाद्यपदार्थ स्वीकारायचे नाहीत.
 

 
 
खरे म्हणजे, एखादी ऑर्डर स्वीकारायची की नाही, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु, इथे शुक्ला महाशयांनी धर्माचे नाव घुसडून नकार दिला. एवढेच नव्हे तर ते कारण सार्वजनिकही केले. हा आगाऊपणा करण्याचे काहीएक कारण नव्हते. खाद्यपदार्थ आणून देणार्‍याने ते काही आपल्या घरी बनविले नव्हते. फक्त तुमच्यापर्यंत ते पोहचविले होते. श्रावण महिन्याचे एवढे सोवळे होते, तर शुक्लांनी अन्न घरीच तयार करायला हवे होते. हे असले दांभिक सोवळे काय कामाचे?
शुक्ला महाशयांनी ऑर्डर रद्द केल्यावर, झोमॅटो कंपनीने एक तत्त्वदर्शी टि्‌वट केले- कुठल्याच अन्नाला धर्म चिकटला नसतो. अन्न हाच एक धर्म आहे. आम्हाला भारताच्या संकल्पनेचा तसेच आमच्या सन्माननीय ग्राहक व भागीदारांच्या विविधतेचा अभिमान आहे. या मूल्यासाठी आमचा व्यवसाय बुडाला तरी त्याचे वाईट वाटणार नाही. या टि्‌वटची सर्वत्र खूप प्रशंसा झाली. झोमॅटोने ठाम भूमिका घेतली म्हणून लगेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी झोमॅटो कंपनीचे कौतुक केले. यात कॉंग्रेस नेते पी. चिदम्बरम्‌ यांनीही उडी घेतली व म्हटले की, मी आतापर्यंत खाद्यपदार्थांची ऑनलाईन ऑर्डर देत नसे. परंतु, आता मात्र झोमॅटोकडून खाद्यपदार्थ मागवणार. इतर अनेकांनीपण या पंडित अमित शुक्लाची चांगलीच टर उडवली आहे.
 
आता या सर्व प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा हिंदू धर्म यांना ओढण्याचे काही कारण नव्हते. परंतु, लिबरल व मोदीद्वेष्टे ही संधी कशी काय सोडतील? या एका व्यक्तीच्या कृतीचे कुणीही समर्थन केले नसताना, लिबरल लोकांनी हिंदू धर्म आणि नरेंद्र मोदी यांना झोडपणे सुरू केले. हे बघून मग काहींनी, या भारतात काही मुसलमान किंवा त्यांच्या संस्था अन्नाचा धर्म बघून व्यवहार करतात, हे उघडकीस आणले. उज्जैनमधील 30 मदरशांनी, इस्कॉनतर्फे पुरविण्यात येणारे माध्यान्ह भोजन स्वीकारण्यास नकार दिला. या ‘हिंदू अन्ना’मुळे आमचा धर्म बुडतो, हे कारण सांगितले होते. त्यावर लिबरल लोकांनी मदरशांची बाजू उचलून धरली होती. एवढेच नाहीतर, गेल्या वर्षी अन्नाच्या धर्मावरून आणखी एक वादळ उठविण्यात आले होते. बंगळुरू येथील अक्षयपात्र ही संस्था भारतातील 12 राज्यांतील 15 हजार 668 शाळांमधील 17 लाख 65 हजार 600 विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवत असते. सरकारकडून आवंटित रकमेत स्वत:चे पैसे घालून ही संस्था विद्यार्थ्यांना अत्यंत रुचकर, शुद्ध व स्वच्छ जेवण पुरवत असते. या संस्थेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच काही लिबरल लोकांनी या संस्थेला लक्ष्य बनविले आणि अक्षयपात्रच्या जेवणात लसूण व कांद्याचा वापर केला जात नाही म्हणून मुलांना ते आवडत नाही. त्यांना जेवण नाइलाजाने खावे लागते म्हणून या संस्थेशी झालेला करार संपविण्यात यावा, असा विषारी प्रचार सुरू झाला. ही संस्था जेवणात अंडे देत नाही, हाही आक्षेप होता. अक्षयपात्रच्या जेवणात पुरेशी पोषक द्रव्ये नसतात, असाही कुणीतरी शोध लावला. भारतातील एक सेवाभावी संस्था, लाखो मुलांना पदरचे पैसे खर्च करून उत्कृष्ट व सात्त्विक भोजन देते, यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे पोट दुखत होते. त्यांच्याच प्रोत्साहनाने हा अपप्रचार सुरू झाला होता, असे नंतर उघडकीस आले. हा सर्व प्रकार सुरू असताना उमर अब्दुल्ला, कुरेशी, चिदम्बरम्‌ झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. झोमॅटोचे मालक दीिंपदर गोयल यांचे म्हणणे योग्यच आहे की, अन्नाला धर्म नसतो, अन्नच धर्म असतो. आपल्याकडेही म्हटले आहे की, अन्न हे पूर्णब्रह्म! त्यामुळे गोयल यांनी घेतलेली ठाम भूमिका स्वागतार्हच आहे. सर्वांनी त्याचे समर्थनच केले पाहिजे. परंतु, या एका वैश्विक सत्याचा स्वीकार सगळे जण करतात का, याचाही विचार झाला पाहिजे. एकाने असेही लक्षात आणून दिले आहे की, मुस्लिम मालकाच्या डिपार्टमेंट स्टोर्समध्ये पतंजलीची एकही वस्तू विक्रीस ठेवत नाहीत. हे जर खरे असेल, तर मुसलमानांमधील या अशा लोकांनाही वैश्विक सत्याचे पाठ देण्याचे धाडस भारतातील तथाकथित लिबरल लोकांनी दाखविले पाहिजे. अक्कल पाजायचीच आहे तर त्यात कुठलाही भेदभाव करायला नको.
 
लागोपाठ दुसर्‍यांदा पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सब का विकास’ या त्यांच्या आधीच्या घोषणेत ‘सब का विश्वास’ हे शब्द जोडल्यानंतर, सोशल मीडियावरील काही प्रमुख व प्रसिद्ध राईट विंगर्स खवळले आहेत. मोदींनी मुसलमान समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर केली. आणखीनही काही योजना घोषित केल्या. त्यावरून ही मंडळी संतापली आहेत. मोदी जिन्ना बनायला निघाले आहेत, वगैरे टीका होऊ लागली. आजकाल ही मंडळी मोदींना ‘मौलाना मोदीद्दुदीन’ म्हणायला लागली आहेत. हाही अतिरेकीपणाच म्हणायला हवा. नरेंद्र मोदी यांनी केवळ आणि केवळ हिंदूंचीच  काळजी घेतली पाहिजे, असा यांचा आग्रह आहे. मुसलमानांसाठी कितीही केले तरीही ते मोदींना मत देणार नाहीत, असा यांचा दावा आहे. परंतु, ही मंडळी हे विसरतात की, मोदींनी भारतीय संविधानाची शपथ घेतली आहे. दुसर्‍यांदा कार्यभार सांभाळण्याआधी त्यांनी सर्वांसमक्ष भारतीय संविधानाच्या ग्रंथाला वाकून वंदन केले होते. विजयानंतरच्या आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे, ज्यांनी आम्हाला मते दिली नाहीत त्यांचाही आम्ही विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले होते. सत्तारूढ झालेल्या कुठल्याही सरकारचे हेच धोरण असले पाहिजे.
 
सोशल मीडियावरील राईट विंगर्स असोत वा लिबरल्स असोत, ही मंडळी संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करीत नसतात. त्यामुळे या निवडक लोकांनी घेतलेली भूमिका त्यांच्या त्यांच्या समाजाची भूमिका आहे, असे समजण्याचे कारण नाही. प्रत्येकच समाजात असे काही काळे-गोरे असतातच. आम्हाला या लोकांच्या पलीकडे जाऊन बघणे जमले पाहिजे. सोशल मीडियावरील या लोकांचा ठाम विश्वास आहे की, आमच्या डिजिटल प्रचारामुळेच मोदी सरकार दुसर्‍यांदा सत्तेवर येऊ शकले आणि या भ्रमात राहून ही मंडळी, मोदींनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगत असतात. असे सांगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. परंतु, ज्या पद्धतीने ही मंडळी हे सांगत असतात, त्यावरून समाजात विद्वेष पसरत असेल, तर हा प्रकार थांबवायलाच हवा. दुसरे म्हणजे लिबरल, वामपंथीय, सेक्युलर तसेच दरबारी पत्रकार या राईट विंगर्सवरून संपूर्ण हिंदू समाजच तसा असल्याचा ग्रह करून, हिंदू समाजाला झोडपणे सुरू करतात, तेही थांबायला हवे. भारतीय समाज बोलघेवडा नाही. तो मौन राहून मनातल्या मनात नोंदी घेत असतो. त्यामुळे कुणीही एखाद्दुसर्‍या घटनेवरून तत्काळ निष्कर्ष काढणे थांबविले पाहिजे. कारण, हे घाईघाईचे निष्कर्ष समाजात फूट पाडणारे असतात. भारताच्या विकासात खीळ घालणारे असतात. सुदैवाने बहुसंख्य भारतीय समाज हे ओळखून आहे.
9881717838