मरणाच्या दारात पोहचलेल्या ‘त्या’ वृद्धाचे तरुणाने वाचविले प्राण!

    दिनांक :02-Aug-2019
तरुणाच्या तळमळीतून माणूसकीचा परिचय
 
भंडारा,
आज मी आणि माझा परिवार अशी मानसिकता फोफावत असताना कुणाकडून मदतीची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खपणाचेच ठरेल! परंतु अशा बदलत्या मानसिकतेतही माणूसकी जपणारे जीवंत आहे, याचा प्रत्यय नरेंद्र पहाडे नामक युवकाच्या कृतीतून आला. मरणासन्न अवस्थेत तीन दिवसांपासून निर्जनस्थळी पडून असलेल्या एका वयोवृद्ध इसमास रुग्णालयात दाखल करुन मरणाच्या दारात पोहचलेल्या एकाचे प्राण त्यांनी वाचविले. रक्ताचं नात, ओळख नाही किंवा कोणताही स्वार्थ नाही केवळ सेवाभाव म्हणून या तरुणाने केलेली कृती आदर्शवत अशीच आहे.

 
 
आज डोळयासमोर अपघात झाला तरी कोण ताप ओढवून घेईल, अशा विचाराने बरेच जण काढता पाय घेतात. अनेकदा डोळयादेखत घडलेल्या अशा घटनांवर नंतर चर्चा करण्यासह हेच लोक पूढे असतात. मात्र मदतीचा विषय आल्यानंतर बरेच प्रश्न अशांपूढे उभे रहातात. दिवसेंदिवस जिव्हाळा, प्रेम लोप पावत असताना माणूसकीचाही अभाव जाणवायला लागला आहे. आज जेथे रक्ताचे नाते असलेल्या व्यक्ती मदतीला धावून येताना दहादा विचार करतात, तेथे परक्यांचा विषयच नाही.
 
मात्र अशाही संकूचित मानसिकतेच्या वातावरणात आज काही जणांनी माणूसकी जोपासली आहे, हे तेवढेच खरे! याच माणूसकीचा परिचय आज नरेंद्र पहाडे या तरुण भाजपा कार्यकर्त्याने दिला. चक्कर रोड म्हणून ओळखल्या जाणा-या मार्गावर एक म्हातारा व्यक्ती तीन दिवसांपासून मरणासन्न अवस्थेत पडून असल्याची माहिती नरेंद्र पहाडे यांना मिळाली. तेथून ये जा करणा-या एक दोन लोकांनी पोलिस, रुग्णवाहीका यांना याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नाद सोडला. पहाडे यांना कळताच आज त्यांनी स्वतःच्या चारचाकी वाहनाने ‘त्या’ वृद्धाचा शोध घेतला. थंडीने कुडकूडत असलेल्या, मरणाच्या दारात पोहचलेल्या त्या व्यक्तीस गाडीत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून दाखल केले. तत्काळ रुग्णालयातील डॉक्टरांनी औषधपचार केला अन् त्या वृद्धाची हालचाल सुरु झाली. अखेरच्या घटका मोजणारा तो इसम ज्याच्या नाव, गावाचा पत्ता नाही, त्याला जीवनदान देण्याचे काम नरेंद्र पहाडे यांच्या तळमळीने दिले. अंगावर एकही वस्त्र नसलेल्या वृद्धास पहाडे यांनी कपडेही घेऊन दिले. रक्ताच नातं नसलं तरी माणूसकीच्या नात्याने या तरुणाने केलेली धावपळ नक्कीच कौतुकास्पद तर आहेच शिवाय मी व माझा ऐवढाच विचार करणा-यांच्या डोळयात अंजन घालणारी सुद्धा आहे.