तरुणीला फसविणाऱ्या तोतया फौजदारावर गुन्हा

    दिनांक :20-Aug-2019
 
नागपूर, 
सीआयडीमध्ये पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून एका २७ वर्षीय तरुणीची १० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी लोंढा पार्क, एमजीनगर, विरार (प.) मुंबई येथे राहणाऱ्या यश सुरेश पाटील या तोतया फौजदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

 
 
डिसेंबर २०१८ ते २६ जून २०१९ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. न्यू म्हाळगीनगर येथे राहणारी ऋचिरा रवींद्र दाणी (२७) ही उच्चशिक्षित तरुणी आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रोमोनी या संकेतस्थळावर तिची यशसोबत ओळख झाली. यशने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने तिला मी सीआयडी खात्यात पोलिस उपनिरीक्षक आहे असे सांगून सध्या त्याची नेमणूक बांद्रा येथे असल्याचे सांगितले. काही दिवसानंतर तो नागपूरला तरुणीच्या घरी आला. त्यावेळी त्याने ऋचिराच्या नातेवाईकांना ऋचिरासोबत लग्न करण्यास होकार दिला होता. त्यामुळे यशवर वाणी कुटुंबियांचा विश्वास बसला होता. दरम्यान, त्याने ऋचिराचा भाऊ आणि मित्र यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे त्याने आमिष दाखविले.
 
त्यासाठी पैसे लागतील असेही तो बोलला. त्यानंतर त्याने ऋचिराच्या फेडरल बँकेच्या खात्यातून आपल्या खात्यात दहा लाख वळते केले. काही दिवसांपूर्वी ऋचिराने त्याच्याशी संपर्क साधला असता त्याचा मोबाईल क्रमांक बंद येत होता. त्याचप्रमाणे तो कॉल घेण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे ऋचिराच्या कुटुंबियांनी मुंबईला जाऊन चौकशी केली असता यश तोतया फौजदार असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ऋचिराच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी यशवर १७०, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.