गोपाल खाडे राष्ट्रीय नवाचार पुरस्काराने सन्मनित

    दिनांक :20-Aug-2019
तेरा वर्षाच्या मेहनतीला मिळाले फळ 

 
 
कारंजा लाड, 
जि. प. विद्यालयातील शिक्षक गोपाल खाडे ह्यांना मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांचे हस्ते दिल्लीत नुकतेच राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
अरविंदो सोसाईटी व एनसिटीइ नवी दिल्ली (झिरो इनव्हेष्टमेंट इनोव्हेशन एज्युकेशनल इनिशिएटिव्हज्) शुन्य निवेश राष्ट्रीय नवाचार पुरस्काराचे दिल्ली येथील माणेकशा सभागृहामध्ये वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल, भारत सरकार निती आयोगाचे विशेष सचिव यदुवेंद्र माथुर, शालेय शिक्षण व साक्षरता सचिव रीना रे, एनसिटीइ च्या अध्यक्षा सतबीर बेदी, एनसिटीइचे सदस्य सचिव संजय अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
एनसिटीइ च्या रजत जयंती समारंभाचे औचित्य साधुन विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी आयोजित आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परीषदेला भारतासह इंग्लड, अमेरिका, किरगीस्थान, पोलंड, कजाकीस्तान, ढाका जापानसह अनेक देशातील अभ्यासक,विविध राज्याचे शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक उपस्थित होते.
 
भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते गोपाल खाडे यांना सन्मनचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गोपाल खाडे हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील जि. प.विद्यालय कामरगांव येथे शिक्षकपदावर कार्यरत आहे. त्यांनी जि. प. विद्यालय कामरगांव येथील इ. 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांत पक्षाप्रती संवेदना व प्रेम निर्माण करणे ह्या विषयावर शुन्य निवेश नवोपक्रम सादर केला होता.देशभरातुन या पुरस्कारासाठी तब्बल दोन लाख प्रस्ताव आले होते. त्यातुन 62 शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यात गोपाल खाडेंच्या प्रस्तावाची निवड झाली.आजपर्यंत राज्यासाठी पथदर्शक असलेला उपक्रम देशभरातील शिक्षक, विद्यार्थी व शाळांपर्यंत पोहचणार आहे. आंतरराष्ट्रीय परीषदेत भारतात शिक्षक शिक्षण-वर्तमान परिस्थिती या चर्चासत्रात महाराष्ट्रातील शिक्षण याविषयी मत मांडण्याची संधी पण गोपाल खाडेंना मिळाली.
जि. प. शाळेतील शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावरील भरारी पाहता त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय अरविंदो सोसाईटी दिल्ली, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना दिले.