करणने मान्य केली 'ही' मोठी चूक

    दिनांक :20-Aug-2019
काळ कितीही पुढे गेला किंवा कितीही नवनवीन गोष्टी ट्रेंडमध्ये आल्या तरीही काही गोष्टींप्रती असणारी ओढ मात्र कमी होत नाही. चित्रपटांच्या बाबतीतही असंच आहे. आजवर या कलाविश्वात बऱ्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याचं आपण पाहिलं. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ९० च्या दशकात आलेला ‘कुछ कुछ होता है’. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने मैत्री आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असं जणू तेव्हाच्या तरुणाईच्या मनावर बिंबवलं होतं. मात्र या चित्रपटात मोठी चूक केल्याची कबुली करणने नुकत्याच एका मुलाखतीत दिली.

 
 
 
‘मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव’मध्ये करणने या चित्रपटाबद्दलचा एक किस्सा सांगत चूक कबूल केली. तो म्हणाला, ”कुछ कुछ होता है हा चित्रपट नैतिकदृष्ट्या चुकीचा होता. मला आठवतंय की, शबाना आझमी यांनी यूकेमध्ये कुठेतरी हा चित्रपट पाहिला होता आणि मग मला फोन केला. त्या खूप चिडलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘तू हे काय दाखवले आहेस? त्या मुलीचे केस लहान आहेत, त्यामुळे ती आकर्षक दिसत नाही आणि जेव्हा तिचे केस मोठे होतात तेव्हा ती सुंदर दिसते?’ मी त्यांची माफी मागितली तर त्या म्हणाल्या तुला फक्त एवढेच बोलायचे आहे का? मी म्हणालो हो, कारण मला माहित आहे की, तुम्ही जे म्हणत आहात, ते योग्य आहे.”
चित्रपटातील पहिल्या भागात काजोल टॉमबॉयसारखी दाखवली जाते आणि नंतर अचानक तिचा मेकओव्हर झाल्याचे दाखवण्यात आले. तेव्हा अचानक शाहरुख खान तिच्या प्रेमात पडतो. याच गोष्टीवर शबाना यांनी आक्षेप घेतला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. मात्र सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटात झळकण्यास बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी नकार दिला होता. यामध्ये रविना टंडन, ऐश्वर्या राय बच्चन, उर्मिला मातोंडकर, शिल्पा शेट्टी, ट्विंकल खन्ना, तब्बू यांचा समावेश आहे.