तंत्र फर्टिगेशनचं

    दिनांक :21-Aug-2019
पाण्यात मिसळणारं रासायनिक खतं ठिबकद्वारे पिकांच्या मुळाच्या कक्षेत देण्याच्या पद्धतीला फर्टीगेशन म्हणतात. थोडक्यात फर्टिलायझेशन विद् इरीगेशन म्हणजे फर्टीगेशन होय. यामुळे पिकांना आवश्यक ती खतं, योग्य मात्रेत मुळाजवळ देता येतात. याद्वारे पाण्यात मिसळलेली खतं पिकांच्या मुळांद्वारे ताबडतोब घेतली जातात. त्यामुळे खतं वाया जात नाहीत. 

 
 
फर्टीगेशनचे फायदे :
  1. पिकास खत आणि पाणी एकाचवेळी, योग्य मात्रेत तसंच तेही आवश्यक तेव्हा देता येतं.
  2. शिफारसीनुसार खतं हवी तेव्हा विभागून देता येतात. त्यामुळे खतांचा पुरेपूर उपयोग होतो. फर्टीगेशन पद्धतीनं खतं दिल्यामुळे खतांचा 90 टक्क्यापर्यंत उपयोग होतो. म्हणजे वनस्पतींची मुळं खतांमधील 90 टक्के अन्नद्रव्य शोषून घेतात. परंतु पारंपरिक पद्धतीनं खतं दिल्यास त्यांचा 10 ते 14 टक्क्यापर्यंतच उपयोग होतो.
  3. पिकास एकाचवेळी एकसमान खताचा पुरवठा करता येतो.
  4. प्रचलित पद्धतीच्या तुलनेत या पध्दतीने खतं देण्याच खूप कमी वेळ लागतो. शिवाय खतांचं प्रमाणही बरंच कमी लागते.
  5. या पध्दतीत खतं पिकांच्या मुळांजवळ दिली जात असल्यामुळे अन्य पध्दतीत बाष्पीभवनाद्वारे होणारं खताचं नुकसान कमी होतं. त्यामुळे 30 ते 50 टक्के खताची बचत होते.
  6. फर्टिगेशन तंत्राद्वारे पिकांना आवश्यक तेवढंच खत व्यवस्थितरित्या विभागून आणि तेही योग्य ठिकाणी दिलं जात असल्यामुळे माती प्रदुषण होत नाही.
  7. या तंत्राद्वारे पिकातील सर्व रोपांना एकसमान आणि एकाच वेळी खत मिळत असल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. त्यामुळे पीक उत्पादन आणि दर्जा दोन्हींमध्ये वाढ दिसून येते.
  8. काही वनस्पती अत्यंत महागड्या आणि नाजूक असतात. अशा वनस्पतींना खतं देताना जराही चूक झाली तर त्या वनस्पती तग धरू शकत नाहीत. त्यातून नुकसान सहन करावं लागतं. तेव्हा अशा वनस्पतींना तंतोतंत प्रमाणात खतं देण्यासाठी फर्टीगेशनचा पर्याय उत्तम ठरणारा असतो.