किसी के जाने के बाद...

    दिनांक :21-Aug-2019
यथार्थ
श्याम पेठकर
फेसबुकवर तुमच्या जुन्या आठवणी उजागर करतात. म्हणजे तुमची िंकवा तुमच्या संदर्भातली याच तारखेची आठ-दहा वर्षांपूर्वीची पोस्ट ते उजागर करतात. असाच एक फोटो परवा आला फेसबुकच्या िंभतीवर. कसल्याशा पुस्तकाचे प्रकाशन करताना मी आणि माझा मित्र विवेक रानडे... त्या छायाचित्रात बघताना जाणवत राहिले की, अगदी आठ-दहाच वर्षे झाली आहेत, मात्र आमच्या दोघांच्याही चेहरेपट्टीत वय दाखविणारा बदल आता झालेला आहे. अर्थात, आपल्याला आपला भूतकाळ लोभस आणि वर्तमान गोंडसच वाटत असतो. त्यामुळे असेच वाटून गेले की, आम्ही दोघेही तेव्हापेक्षा आता जास्त चांगले दिसतो... तेव्हा अधिक काटकुळे आणि काळपट (अर्थात मी) वाटत होतो... अगदी आठ- दहा वर्षांत असे होत असेल, शरीराचा कड मोडला जात असेल, तर मग अगदी वीस- तीस वर्षांनी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर आली तर ती ओळखीची वाटेल, जवळचीही वाटेल, पण ओळखता येणार नाही. विद्या सिन्हा गेल्याची बातमी आली. कर्तृत्ववान आणि कलावंतांच्या (अर्थात कलावंत कर्तृत्ववान असतातच; नव्हे, ते असल्याशिवाय कलावंत होतच नाहीत.) निधनाच्या बातमीत त्यांनी लावलेली सृजनाची बहरलेली झाडे अन्‌ त्यांना आलेली फुले-फळे यांचेच वर्णन असते. विद्या सिन्हांच्या बाबतही ते तसे होतेच. मात्र, अलीकडे त्यांनी केलेल्या मालिकांची नावेही होती त्यात. बर्‍याच विश्रांतीनंतर त्या मोठ्या आणि छोट्या पडद्यावर अवतरल्या होत्या. ‘कुल्फी कुमार बाजीवाले’ ही मालिका कधीमधी ऑफच्या दिवशी अन्‌ तेही मालिका प्रसारणाच्या काळात घरी असलो तर पाहण्यात आलेली. त्यात आजीची भूमिका विद्या सिन्हा यांनी केल्याचे वाचले अन्‌ एकदम प्रकाश पडला, कधीमधीच ती मालिका बघताना ती आजी अशी आपली आपलीशी का वाटत होती ते... विद्या सिन्हा होती ती! आपल्या डोळ्यांच्या किरमिजी पडद्यावर सुगंधी स्वप्न फुलविणार्‍या अन्‌ अंतराळात घेऊन जाणार्‍या काही नायिका (त्या पडद्यावरच्याच असाव्यात असे नाही) तशाच्या तशाच राहाव्यात असे वाटत जाते. आपले वय वाढले तरीही त्या जाणिवा मात्र हिरव्याच राहतात, म. म. देशपांडेंच्या कवितेसारखं... छातीवर दगडही ठेवून पाहिला; पण ही कोवळी हिरवी पाने फुटतात कुठून कळतच नाही... दबा धरून बसलेली ही हिरवळ केव्हाही बाहेर पडू शकते. एका साबणचुर्‍याच्या जाहिरातीत एक गोंडस म्हातारी पाहिली. मग लक्षात आलं त्या वहिदा रहमान आहेत. तापल्या तव्यावर पाणी टाकल्यावर चर्रर्र व्हावं तसं झालं. यांनी म्हातारं होऊच नये... विद्या सिन्हांची त्या मालिकेतली दादी पाहिल्यावर असेच झाले. मग त्यांचे
 
कई बार यूं ही देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे
अन्जानी आस के पीछे
 
मन दौड़ने लगता है मधले अदबशीर अस्वस्थ होणे आठवत राहिले. भूतकाळातले प्रेम असे अचानक समोर आल्यावर आणि वर्तमानातला प्रियकर सोबत असल्यावर एखाद्या खानदानी प्रौढेची कोवळीक जशी ढवळूून निघावी अन्‌ आवरून घेतानाही वार्‍यावर फडफडणार्‍या उनाड पदाराला जे काय सांगायचे ते दाबून टाकताना होणारी ओढाताण विद्या सिन्हा यांनी खूप सुरेख दाखविली होती.
 
 
 
 
 
 
 
परवा एका मित्राने त्याला लिहायचे असल्याने आताचा सिनेमा आणि रसिक यात काय बदल झाला, असे विचारले. आताही नायक- नायिका आहेत. नायक- नायिका त्याच ज्या आपल्याला करावेसे वाटते, आपल्या स्वप्नांतही जे शक्य होत नाही अन्‌ काही स्वप्न स्वप्नांतही सत्य होत नाहीत, असे जे काय आपल्याला करावेसे वाटते ते लीलया करणारे म्हणजे नायक आणि नायिका असतात. तेव्हाचे नायक-नायिका असायचे अगदी आपल्याच सारखे. विशेष करून बासू चटर्जी, ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांतले नायक-नायिका असेच अगदी आपल्या घरचेच वाटावे असे. त्यांची स्वप्नंही अगदी आपल्या सारखीच, फार फार तर बोनसच्या पैशांत पूर्ण होणारी. नंतरच्या काळात नायक दहा-पाच गुंडांना लोळवू लागला अन्‌ आता तर तो सुपरमॅनच झाला आहे. नायिकांची वस्त्रं भूमिकांची मागणी सोडून रोजच्या वापरातली नसतात. ती वाईटच असतात, असे नाही, मात्र ती आपली वाटत नाहीत. त्यांना आपल्या दैनिक वावरात स्थान नसते अन्‌ कार्यप्रसंगातही तसली वस्त्रं आपण परिधान केली तर आपल्याला अवघडलेपण येतं... इतकंच. मात्र, आताचे नायक-नायिका अशी परिधानं आणि तसले व्यवहार जे असामान्य दर्जातच मोडले जावेत असेच करतात. त्यांचा पडद्यावरचा प्रवेशही दिल की धडकन वाढविणारा अन्‌ पिटात टाळ्या-शिट्ट्या वाजतील असाच असतो... विद्या सिन्हा, अमोल पालेकर यांचे सिनेमे असोत की, मग कधीमधी चुपके चुपके, मिली सारखे सिनेमे असोत, जे त्या काळात बर्‍यापैकी संखेत निर्माण व्हायचे, त्यात नायक-नायिकांचा वेश, वागणे अन्‌ स्वप्नं आपली वाटावी अशीच होती. साडीत मान खाली घालून अन्‌ बॅग िंकवा पुस्तक छातीशी कवटाळून वावरणारी विद्या सिन्हा म्हणून आपली वाटत राहिली. उमलत्या वयात ती मोठी होती आपल्यापेक्षा, पण इतकीही नाही की सहज तिचा हात धरून तारुण्याच्या प्रांतात वडीलधार्‍यांची नजर चुकवून फिरून येऊ नये... तसे अनेकदा घडले आहे, त्यामुळे आताची प्रौढ आणि विद्या सिन्हाच्या काळात उमलत्या वयात असणार्‍यांनी नाजूक रेशमी हळहळ व्यक्त करून घेतली. अशांसाठी डोळ्यांत येणारे अश्रूही अत्तर असतात आणि त्याचा सुगंध इतरांपासून दडवून ठेवावासा वाटतो...
 
विद्या सिन्हा अगदी आपल्या शेजारीही राहणारी तरुणी वाटत होती आणि तरीही ती नायिका होती रुपेरी पडद्यावरची. आताची नायिका आपल्या आजूबाजूला नसावी, असे वाटते. आपल्या शेजारची लेक देखणी असावी, मात्र आजच्या नायिकांसारखीच आहे, असे म्हणावे अशी नको, असे वाटते. तेव्हा तसे नव्हते. अगदी रेखा, शबाना, मौसमी चटर्जीपर्यंत असे नव्हते. ‘जानेमन जानेमन’ हे गाणे ऐकले, पाहिले की आमच्या गावच्या विद्या सिन्हांची आठवण येते. आमच्या गावात एका मोठ्या कास्तकाराची, पुण्याला की नागपूरला शिकून आलेली तरुण मुलगी अगदी विद्या सिन्हासारखी दिसते, असे लोक म्हणायचे. ते ज्या ‘आस्थे’ने म्हणायचे ती आस्था निर्माण व्हावी असे त्या वेळी वय नव्हते; पण पडद्यावरची विद्या सिन्हा मोहक वाटावी इतक्या जाणिवा जाग्याही झाल्या होत्या. त्यामुळे बंगलीच्या फाटकातून निघून कारमध्ये गडप होण्याच्या आधी पाटलांच्या त्या लेकीला पाहण्याची धडपड त्या वयात केलेली अन्‌ मग सिनेमा पाहताना पडद्यावर ओरिजनल विद्या सिन्हाच्या ऐवजी तीच चिकटवून पाहिलेली...
 
हे आठवले की मग गावचा अब्दुल चोरही आठवतो. अब्दुल चोर हा एक अध्याय आहे मोठा. तो नंतर सांगेन कधी; एवढेच की तो पाटी धरून फोटो पोलिसात लावलेला चोर होता. गावात चोरी झाली की पोलिस त्याला अधिकाराने पकडून न्यायचे. आधी तो विरोध करायचा की, मी जे नाही केले ते माझ्यावर का थोपविता? नंतर मात्र त्याच्या लक्षात आले की विरोध केला की जास्त त्रास होतो, त्यामुळे नंतर चोरी झाली की तोच पोलिसात जायचा... तर एकदा या आमच्या विद्या सिन्हावर चौकात चर्चा सुरू होती- ‘‘औरत वही खुबसूरत जो िंनदमे भी या िंनदसे जागने के बाद भी खबसुरत लगे.’’ असे कुणीसे म्हटले. आमच्या या अब्दुल चोरने त्याच रात्री पाटलांच्या त्या रूपवान कन्येच्या दुसर्‍या मजल्यावरच्या शयनकक्षात (तेव्हा बेडरूम नव्हत्या) प्रवेश केला अन्‌ पेन टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावर टाकून त्याने ती झोपेतही सुंदर दिसते का ते पाहिले. अर्थात, तिला जाग आली अन्‌ तिने विचारले, ‘‘कोण?’’ तर हा सवयीनुसार, ‘‘दीदी, मैं अब्दुल चोर’’ असं म्हणाला. मग जे काय व्हायचे ते झालेच. अब्दुल मग सहा महिने तुरुंगात होता. बाहेर आल्यावर त्याने गावातल्या उत्सुुकांना सांगितले की, ‘‘पाटील की बेटी सही खुबसूरत है, एकदम विद्या सिन्हा...’’ अन्‌ मग गावातल्या एकमेव टॉकीजमध्ये शहरांनी ओवाळून टाकल्यावर ‘छोटी सी बात’ लागला होता (पेटी स्वस्त झाल्यावर). तो बघायला ती आमच्या गावची विद्या सिन्हा गेली तेव्हा तिच्यासोबत सिनेमा बघता यावा अन्‌ ओरिजनल सोबत तिला पडताळून पाहता यावे यासाठी अवघे गावच सिनेमाला गेले होते...! तेव्हाच्या नायिका अशा आमच्या गावजीवनाच्या अन्‌ भावजीवनाच्या अविभाज्य अंग होत्या... आपल्या होत्या, आताच्या परक्या आहेत!