'द गर्ल ऑन द ट्रेन' रिमेकचा लुक व्हायरल

    दिनांक :21-Aug-2019
मुंबई,
अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अनेक फोटोंमध्ये तिच्या खट्याळ हास्याचे आणि मिश्किल हावभावांचे तिचे चाहते कौतुक करताना दिसतात. तिचे अनेक फोटो तिच्या फॅन्सच्या संग्रहीदेखील असतील. पण सध्या परिणीतीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि तिचा हा फोटो पाहून तिचे फॅन्सदेखील घाबरलेत.
 
 
 
 
'द गर्ल ऑन द ट्रेन' या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटातील हा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या फोटोत ती एका बाथटबमध्ये जखमी अवस्थेत बसलेली दिसतेय.
'मुंबई मिरर'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिग्दर्शक रिभू दासगुप्ता म्हणाले की, ''द गर्ल ऑन द ट्रेन'च्या रिमेकमध्ये परिणीती दारूच्या आहारी गेलेल्या महिलेची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिच्या पात्राला अनेक कंगोरे आहेत जे चित्रपटाच्या कथेत उलगडले जातील. आम्ही मुंबईत या पात्राविषयी एकत्र बसून बराच अभ्यास केला आणि त्यानंतर लंडनला चित्रीकरणासाठी गेलो. आमच्या डोळ्यासमोर आम्ही हे पात्र घडवलंय आणि ते उत्तम रंगलंय याचा आम्हाला आनंद आहे ' असं ते म्हणाले.
या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. पॉला हॉकिन्स यांच्या लोकप्रिय 'द गर्ल ऑन द ट्रेन' या कादंबरीच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या कथेवर २०१६ मध्ये 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा हॉलिवूडपट बनवण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत होती.