काश्मीर... ज्ञानाच्या उगमाची गंगोत्री!

    दिनांक :22-Aug-2019
सर्वेश फडणवीस  
 
शतकांपासून काश्मीरचे भारताशी सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक संबंध आहे. भारताची उज्ज्वल ज्ञानाची परंपरा काश्मीर शिवाय सुरूच होऊ शकत नाही. प्रख्यात कवी, साहित्यिक, खगोलतज़्ज्ञ, व्याकरणतज्ज्ञ व तत्ववेत्ता आचार्य अभिनवगुप्त यांच्या अथक अभूतपूर्व प्रयत्नांमुळे कर्तृत्वामुळे काश्मीरची ज्ञानपीठ, शारदापीठ अशी ओळख जगभरात निर्माण झाली. केरळच्या कालडी मधून आलेले आद्य शंकराचार्य जगद्गुरू म्हणून याच भूमीतून ओळखले जाऊ लागले अशा भव्यदिव्य ज्ञानाच्या परंपरेची गंगोत्री म्हणून काश्मीरची ओळख आहे. काश्मीरचा उल्लेख महाभारतातही आहे. 

 
 
काश्मीरचे आचार्य अभिनव गुप्त यांनी साहित्य, संगीत, खगोल, नाट्यशास्त्र, तत्त्वज्ञान, वेद, उपनिषद आणि अन्य शास्त्रांत एवढे ज्ञान संपादन केले आहे. जगभरातील विद्वान भारताकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. अतिशय महान परंपरेने हा प्रदेश संपन्न आहे. इसवी सन 975-1025 हा अभिनव गुप्त यांचा कार्यकाळ आहे. त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची दखल संपूर्ण जगाने घेतली. आजही जगभरातील 80 विद्यापीठांत आचार्य अभिनव गुप्त यांचे साहित्य व तत्वज्ञान अभ्यासिले जाते. आचार्य अभिनव गुप्त यांच्याप्रमाणेच प्रख्यात संस्कृत व्याकरणकार व अष्टाध्यायी ग्रंथाचे रचनाकार पाणिनी, प्रख्यात राजा ललितादित्य यांच्यासारख्या कर्तृत्ववान लोकांमुळे काश्मीर विश्वविख्यात झाला. अकबर आणि सम्राट अशोक यांच्यापेक्षाही काश्मीरचा पराक्रमी राजा ललितादित्य याचा साम्राज्यविस्तार कितीतरी पट अधिक मोठा होता. त्याचे राज्य थेट दक्षिणेत कावेरीपासून ते थेट इराणच्या सीमेपर्यंत होते. सम्राट अशोक आणि अकबर यांच्या पेक्षाही त्यांचे साम्राज्य मोठे होते. पण हा इतिहास शिकवला जात नाही. आजही राजा ललितादित्य हे नाव अनेकांना परिचित नाही, ही वर्तमान पिढीची शोकांतिका आहे.
 
आज काश्मीर शिवाय भारताची ओळख होऊच शकत नाही. मुस्लिम राजवट हीच काश्मीरची ओळख झाली आहे. पण असा कीर्तिमान इतिहास आमच्यापर्यंत कधीच आला नाही. काश्मीर भारतापासून कधीच वेगळे केले जाऊ शकत नाही. आजवर 70 वर्षांत जी घडामोडी झाली ती नक्कीच आश्चर्यकारक आणि स्वार्थी राजकारण आणि स्वतःच्या स्वार्थासाठी होती. त्यात राष्ट्रहित ही भावना कुठेही जाणवत नव्हती.
 
तो इतिहासही रक्तरंजित असाच होता. काश्मीरमधून हिंदूंना हाकलण्यासाठी कॉंग्रेसने वर्ष 1947 मध्ये छोडो काश्मीर ही चळवळ उभारली. शेख अब्दुल्ला त्याचे नेतृत्व करत होते. राजा हरिसिंह यांनी त्यांना अटक केल्यानंतर जवाहरलाल नेहरू त्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आणि शेख अब्दुल्ला यांची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. त्या वेळी राजा हरिसिंह यांनी नेहरूंना दोन-तीन दिवस स्थानबद्ध ठेवून सन्मानाने परत पाठवले. त्याचा राग मनात धरून नेहरू यांनी राजा हरिसिंह यांचा भारतात विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव अनेक महिने दाबून ठेवला. शेख अब्दुल्ला यांची सुटका करून त्यांना पंतप्रधान करणार असाल, तरच विलिनीकरणाला मान्यता देऊ, अशी भूमिका नेहरू यांनी घेतली. हरिसिंह यांनी ती मागणी मान्य केली; मात्र तरीही नेहरू मानले नाहीत. पाकिस्तानच्या आक्रमणानंतर सरदार पटेल यांनी नेहरूंना ती मागणी मान्य करायला लावली.
जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा कलम 370 राज्यघटनेत घेण्यास सुचवले, तेव्हा डॉ. आंबेडकर आणि अन्य कॉंग्रेसजन यांनी हे कलम प्रथम धुडकावून लावले होते; मात्र नेहरूंनी दबाव टाकून ते घटनेत घुसवले. कलम 370 चा निषेध म्हणून या कलमावरील चर्चेवर डॉ. आंबेडकर यांनी बहिष्कार घातला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी या कलमामध्ये तात्पुरते कलम असा शब्द घालून हे कलम कायमस्वरूपी रहाणार नाही, याची दक्षता घेतली.
 
आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्ती करून त्यामध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घातले. त्या वेळी कलम ‘35 अ’ चा आधार घेत जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी धर्मनिरपेक्षता जम्मू-काश्मीरसाठी लागू नाही. आम्ही केवळ इस्लामी नियम पाळू, अशी जाहीर भूमिका घेतली होती. पुढे तेथील मूळ हिंदू संस्कृतीनुसार असलेली नावे पालटून ऊर्दू नावे ठेवली जात होती. शंकराचार्य टेकडीचे नामकरण तख्त-ए-सुलेमान असे केले गेले आहे, तर श्रीनगरचा उल्लेख तर शहर-ए-खास असा केला जात आहे. पण आज इतिहास बदलतोय्‌. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश हे नवं बिरुद आपल्या शिरपेचात लावणार आहे आणि आपण या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहोत.
 
काश्मीर : भारताचे नंदनवन! निसर्गाने भरभरून या काश्मीरला दिले. भारतमातेचे मुख म्हणून उल्लेख करतात असे काश्मीर! पण देवभूमी आणि प्राकृतिक संपदा परिपूर्ण असलेली हे काश्मीर आता विकासाच्या दिशेने यशस्वी, सकारात्मक दिशेकडे पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होत आहे.
जय हिंद! वंदे मातरम्‌!!