शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी इव्हीएमचा वापर !

    दिनांक :22-Aug-2019
*पाचमोरी येथील शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम
अकोला,
शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी इव्हीएमचा वापर.. झालात ना सर्व चकीत ! हो, हे अगदी खरे आहे. शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती मिळावी म्हणून अकोला पंचायत समिती अंतर्गत जि.प.शाळा पाचमोरी येथे नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेत एक माहिती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांनी 'वोटिंग मशीन' या ॲन्ड्राॕईड ॲपचा वापर करून टॕबच्या सहाय्याने मतदान घेतले.
 
 
आपला भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे. आपल्या देशापासून तर गावापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून दिलेले असतात. जि.प.शाळा पाचमोरी येथे एकूण सहा पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूकीच्या आदल्या दिवशी ॲपमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरून घेतले.
सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा जागांसाठी आठ विद्यार्थी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रत्येक मतदार सहा जागांसाठी मतदान करत होता. विशेष म्हणजे बॅलट (Ballot) बटनही मतदारच दाबत होता. परंतू कोणीही बोगस मतदान किंवा जादा मतदान केले नाही. मतदान केलेल्या विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली.
आज १००% मतदान झाले. ठिक १ वाजता मतदानाची वेळ संपल्यावर क्लोज (Close) बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली. मतदान अधिकारी मनिषा शेजोळे यांनी निकालासाठी रिझल्ट (Result) बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार केला. तोपर्यंत सर्व मतदार विद्यार्थी व उमेदवार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला. जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या कार्यालयात बोलावून सर्वांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांनी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यास सुरुवात केली. निवडणूक जिंकलेले विद्यार्थी निकाल ऐकताच एकच जल्लोष करत होते.
सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेल्या
मुख्यमंत्री - रेहान फारुख शेख,
शिक्षणमंत्री- आयुष धांडे
आरोग्यमंत्री - अनुष्का इंगळे
स्वच्छतामंत्री - अनिता परघरमोर
वनसंवर्धन मंत्री - समिक्षा जाधव
क्रिडामंत्री - आदेश खंडारे
या सर्वांचे पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
ही निवडणूक प्रक्रीया मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षिका सुरेखा पागृत व शा.पो.आ.मदतनीस शशिकला घुमसे यांच्या सहकार्याने पार पडली. यावेळी पालक प्रतिनिधी सुमित्रा निंबाळकर, बेबीताई वानखडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
इव्हीएमचा उपयोग करून शालेय मंत्रिमंडळ निवडणुक घेत मतदान जागृतीच्या करणाऱ्या पाचमोरी येथील शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.