गोड गैरसमज!

    दिनांक :22-Aug-2019
नितीश गाडगे
 
स्वप्नातल्या आणि खर्‍या आयुष्यात कितीही फरक असला, तरी बर्‍याचदा आशादायी आयुष्य जगण्यासाठी स्वप्न इंधनाचे काम करते. गायत्रीच्या बाबतीतही असेच काहीतरी चालले होते. बीएस्सीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या गायत्रीचे तिच्याच वर्गातल्या अक्षयवर एकतर्फी प्रेम होते. एकाच वर्गात असल्याने अक्षय तिचा तसा मित्र होता, पण त्यांच्यातली मैत्री अगदीच घट्ट वैगरे नव्हती. गायत्री सर्वसाधारण कुटुंबात वाढलेली. दिसायला अगदीच आकर्षक नसली, तरी तिच्या साधेपणात एक वेगळेच सौंदर्य दडलेले होते, तर अक्षय दिसायला गोरापान, उंच, रुबाबदार आणि घरचा श्रीमंत! त्याचे आई आणि वडील नामांकित वकील होते. मुंबईत जुहू सारख्या उचभ्रु ठिकाणी त्यांचे स्वतःचे घर होते. रंगरूप, आर्थिक स्थिती जरी चांगली असली, तरी अक्षयला याचा अजिबात उन्माद नव्हता. स्वतःचा बढेजाऊपणा न दाखवता तो सगळ्यात मिसळायचा. सगळ्यांशी आपुलकीने बोलायचा. त्याच्या याच स्वभावावर गायत्री घायाळ झाली होती. गायत्रीसाठी तो स्वप्नातला राजकुमारच होता. अक्षयचा स्वभाव मनमिळावू असला, तरी गायत्रीला स्वतःहून त्याच्याशी बोलण्याची किंवा गप्पा मारण्याची कधीच हिंमत झाली नाही. एकदा गायत्री कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये एकटीच कॉफी पीत बसली होती. 
 
 
दरम्यान अक्षयही कॅण्टिनमध्ये आला. त्यादिवशी त्याच्यासोबत कुणीच मित्र नव्हते. कॉफीची ऑर्डर देऊन कॅण्टिनमध्ये कोणी ओळखीचं दिसतं का, म्हणून त्याने नजर फिरवली. गायत्री खिडकीजवळच्या टेबलवर कॉफी पीत नोट्स चाळताना त्याला दिसली. तो कॉफी घेऊन थेट तिच्याजवळ गेला आणि तिला ‘‘हाय गायत्री!’’ म्हणत तिच्या समोर बसला. गायत्रीसाठी हा एक सुखद धक्काच होता. अचानक अक्षयला पाहून ती भांबावूनच गेली. ‘‘मी इथे आलेलो तुला आवडले नाही का?’’ असा मिश्किल प्रश्न अक्षयने गायत्रीला विचारला. गायत्रीसाठी हा अचानक आलेला बाउन्सर होता. या प्रश्नाला कसे उत्तर द्यायचे हे तिचे तिलाच कळत नव्हते. ‘‘नाही तसं काही नाही’’ गायत्रीने गोंधळलेल्या हावभावाने उत्तर दिले. तिला असं गोंधळले पाहून अक्षयला हसू आवरताच आले नाही. नंतर तिलाही कळले की, ती किती वेंधळ्यासारखी वागतेय्‌, नंतर तिलाही तिचं हसू आलं. कॉफीचा घोट घेत घेत दोघांमध्ये छान गप्पा रंगल्या. कालांतराने अक्षय आणि गायत्रीची मैत्री घट्ट होऊ लागली होती. रात्री बराच वेळ दोघे चॅटिंग करायचे. गायत्रीच्या साधेपणातल्या सौंदर्याची तो अनेकदा स्तुती करायचा.
 
अक्षय आपल्याला पसंत करतो असा गोड गैरसमज गायत्रीचा झाला होता. एकेदिवशी कॉलेज सुटल्यावर अचानक अक्षय स्वतःहून गायत्रीकडे आला. गायत्री कॉलेजच्या कॅण्टिनजवळ फोनवर बोलत होती. अक्षय जवळ येताच गायत्रीने आपले बोलणे आटोपले आणि फोन ठेवला. ‘‘बरं झालं गायत्री, तू भेटलीस’’ अक्षय म्हणाला. ‘‘का? काही काम होतं का?’’ गायत्रीने विचारले. ‘‘मला तुझे नोट्स हवे आहे. तुला काही काम नसेल तर प्लिज देशील मला?’’ अक्षय म्हणाला. खरं तर अक्षयला हवे असलेले नोट्स गायत्रीच्या बॅगमध्ये होते, पण तिने ते अक्षयला ‘‘उद्या देते’’ म्हणून सांगितले. अक्षयला पुन्हा भेटता यावं म्हणून ती खोटं बोलली होती. दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये आल्यावर आपण आल्याबरोबर अक्षय आपल्याला नोट्स मागेल असं तिला अपेक्षित होती, पण सलग तीन लेक्चर्स होऊनही अक्षय तिच्याकडे फिरकलासुद्धा नाही. मग न राहवून कॉलेज सुटल्यावर तीच अक्षयजवळ गेली. अक्षय कॉलेजच्या गेट जवळ कुणाशीतरी फोनवर बोलत होता.
 
फोनवर बोलताना त्याच्या आवाजातली भीती स्पष्टपणे जाणवत होती. त्याचे चित्त थार्‍यावर नव्हतेच, त्याने फोन ठेवताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. काय झाले आणि काय नाही, याचा गायत्रीला काहीच अंदाज नव्हता. तिने अक्षयचा हात हातात घेत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘‘सायलीचा अपघात झाला. ती आयसीयूमध्ये अॅडमिट आहे’’ थरथरत्या आवाजाने अक्षय पुटपुटला. ‘‘सायली? कोण सायली?’’ गायत्रीने दबक्या आवाजात विचारले. ‘‘माझी गलफ्रेण्ड!’’ अक्षय म्हणाला. अक्षयची गलफ्रेण्ड असल्याचे आणि त्यात तिचा अपघात झाल्याचे समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली, अशा परिस्थितीत तिने अक्षयला सावरावे की स्वतःला? हा नियतीने तिच्यासमोर मांडलेला यक्ष प्रश्नच होता.