बुद्धगिरी टेकडीवरील बुद्ध मूर्तीची चोरी

    दिनांक :22-Aug-2019
*भिक्खूची गादीही जाळली
*अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल
मूल, 
मूल-चंद्रपूर मार्गावरील मूल जवळील बुद्धगिरी टेकडीवरील बुद्ध मूर्तीची चोरी करून, समाजकंटकांनी भिक्खूची गादीही जाळल्याची घटना बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बौद्ध अनुयायांनी बुद्धगिरीवर भेट देवून पाहणी केली. अज्ञात समाजकंटकांना तातडीने अटक करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बौद्ध अनुयायांनी रेटून धरली आहे. अज्ञात समाजकंटकाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

 
 
दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट देवून पाहणी केली. श्वानपथकाद्वारे शोध घेण्यात आला. पण, रात्री उशिरापर्यंत मूर्ती किंवा आरोपींचा शोध लागला नव्हता. मंगळवारी बौद्ध भिक्खूंनी बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर ते कामानिमित्त चंद्रपूरला गेले. रात्री 10 वाजताच्या सुमारास पुन्हा स्थानिक भिक्खू वंदना घेण्यासाठी बुद्ध टेकडीवर गेले असता, त्यांना बुद्ध मूर्ती दिसली नाही. शिवाय त्यांच्या बसण्याचीही गादीही जाळल्याचे आढळून आले. रात्रीच मूर्तीचा लगतच्या परिसरात शोध घेण्यात आला. पण, मूर्तीचा पत्ता लागला नाही. या घटनेची तक्रार मूल पोलिसात दाखल करण्यात आली. बुधवारी सकाळीच संतप्त बौद्ध अनुयायी बुद्ध टेकडीवर पोहचले. त्यांनी अज्ञात समाजकंटकाविरोधात रोष व्यक्त करून कडक कारवाईची मागणी रेटून धरली. पोलिस प्रशासनाने बौद्ध अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अज्ञाताविरोधात भादंवी 379, 435, 427 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.