कंगना झाली ट्रोल!

    दिनांक :22-Aug-2019
मुंबई,
काळ्या रंगाची किनार असलेली ऑफ-व्हाइट बंगाली साडी नेसलेल्या अभिनेत्री कंगना रणौतचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. तिने नेसलेली साडी केवळ ६०० रुपयांची आहे हे ऐकून तिच्या फॅन्सना आश्चर्यही वाटत आहे. पण आता मात्र, कंगनाला नेटकऱ्यांनी याच साडीमुळे ट्रोल करायला सुरुवात केली आहे.


 
 
कंगना एका कार्यक्रमासाठी जयपूरला जात असताना तिने कोलकात्याहून अवघ्या ६०० रुपयांना विकत घेतलेली सुंदर साडी परिधान केली होती. तिच्या बहिणीने रंगोलीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत साडीची किंमत सांगितली होती.' कंगनाने नेसलेली साडी केवळ ६०० रुपयांना आहे. इतकी सुंदर साडी इतक्या स्वस्तात मिळाली याचं मला आश्चर्य वाटलं. शिवाय, आपल्या कारागिरांना त्यांच्या मेहनतीचे किती कमी पैसे मिळतात हे कळल्यामुळे वाईटही वाटतंय. आपण परदेशातील महागड्या ब्रँड्सवर पैसा उधळण्यापेक्षा आपल्या स्वदेशी गोष्टी वापरायला सुरुवात केली पाहिजे. परदेशी कपड्यांच्या ब्रँड्सना आपल्या कारागिरांच्या हक्काचे पैसे लुटायला देऊ नका' असं ट्विट तिनं केलं होतं.
 
 
 
 
कंगनाच्या लुकचं आणि स्वदेशी वापरण्याच्या आवाहनाचं तिच्या फॅन्सनं कौतुक केलं खरं, पण त्यानंतर कंगना तिच्या हातातील बॅगमुळे नेटकऱ्यांच्या टीकेची लक्ष्य झाली. कंगनाच्या हातातील बॅग 'प्राडा' या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ब्रँडची असून त्या बॅगची किंमत अडीच लाखांच्या आसपास असेल असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. '६०० रुपयांची साडी नेसून अडीच लाखाची पर्स वापरण्यात कसली देशभक्ती?' असा सवाल तिला काहींनी केला...तर, 'इतरांना स्वदेशीचा पुरस्कार करायला सांगायचा आणि स्वत: मात्र महागड्या विदेशी ब्रँड्सचे प्रॉडक्ट वापरायचे हा दुटप्पीपणा आहे' असं म्हणत काहींनी तिच्यावर टीका केली. कंगनानं मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.