बिहारमधील राजदची अधोगती...

    दिनांक :22-Aug-2019
दिल्ली वार्तापत्र  
 
श्यामकांत जहागीरदार
 
राजदचे एकेकाळचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून चारा घोटाळ्यात तुरुंगात असल्यामुळे, आणि ते विविध व्याधींनी आजारी असल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे राज्यातील अस्तित्व धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केल्यानंतरही राजदचे बारा वाजले, राज्यात एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. येथूनच राजदमध्ये अंतर्गत संघर्ष म्हणण्यापेक्षा भाऊबंदकी सुरू झाली. तुरुंगात गेल्यामुळे लालूप्रसाद यादव यांनी राजदची धुरा आपला लहान मुलगा तेजस्वी यादवकडे सोपवली होती. त्याआधी 2016 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजदने नितीशकुमार यांच्या जदयुशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. या आघाडीने राज्यात भाजपाचा पराभव करत सरकार स्थापन केले होते. यात नितीशकुमार मुख्यमंत्री, तर राजकारणाचा आणि प्रशासनाचाही कोणताही अनुभव नसलेले तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री अशी व्यवस्था होती.
 
 
राजकारणातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांंची ही सर्वात विजोड जोडी होती. सुदैवाने या जदयु-राजद आघाडीचे सरकार राज्यात फार दिवस टिकले नाही. याला आघाडी सरकारमध्ये तुरुंगातून होत असलेला लालूप्रसाद यादव यांचा अनावश्यक हस्तक्षेप आणि तेजस्वी यादव यांचे मनमानी वागणे होते. मानसिक आरोग्य ठीक नसलेले तेजप्रताप यादव यांना आरोग्यमंत्री बनवण्यात आले होते! त्यांनी आपल्या कर्तृवाने आरोग्य खात्यात वेगळाच गोंधळ घातला होता. नितीशकुमार यांनी या सरकारमधून माघार घेत भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केल्यामुळे बिहारच्या जनतेने सुटकेचा श्वास सोडला.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच राजदमध्ये भाऊबंदकी सुरू झाली होती. तेजस्वी यादवचे नेतृत्व तेजप्रताप यादव यांना मान्य नव्हते. तेव्हापासून दोन भावांत संघर्ष सुरू झाला होता. त्यात तेजप्रताप यादव यांनी आपली पत्नी ऐश्वर्या रायला घटस्फोट देण्याची घोषणा करताच यादव घराण्यातील यादवी चव्हाट्यावर आली. ऐश्वर्या राय यांनी आपल्या पतीचे- तेजप्रताप यादवचे प्रताप जाहीर केले आहेत. स्वत:ला कृष्णाचा भक्त म्हणवणारा तेजप्रताप स्वत:ला राधा समजून आणि तसे कपडे घालून शृंगार करतो, असे ऐश्वर्या राय यांनीच सांगितल्यामुळे त्यावर अविश्वास ठेवण्याचे कारण नाही. मध्यंतरी तेजप्रतापचे कावड यात्रेतील आणि नदीत आंघोळ करतानाचे साधूच्या वेशातील फोटोही आले होते.
 
तेजप्रताप यादवचा राग आपल्या पत्नीवर आणि सासरे चंद्रिका राय यांच्यावर होता. सारणमधून चंद्रिका राय यांना राजदची उमेदवारी द्यायला तेजप्रताप यादव यांचा विरोध होता. चंद्रिका राय फक्त तेजप्रतापचे सासरेच नव्हते, तर आधीपासूनच राजदचे ज्येष्ठ नेते होते. लालूप्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होता. एवढेच नाही तर त्यांचे वडील दरोगा राय बिहारचे माजी मुख्यमंत्रीही होते. मात्र, तेजप्रताप यादव यांनी आपल्या वागणुकीने सर्वांनाच प्रचंड मनस्ताप दिला. जावई हा 16 वा ग्रह असतो, याचा चांगला अनुभव चंद्रिका राय यांनी तेजप्रतापमुळे घेतला.
कॉंग्रेस आणि राजद यांच्यात साम्य कोणते? असा प्रश्न विचारला तर हा काय प्रश्न आहे, काहीच साम्य नाही, असे उत्तर झटक्यात दिले जाईल. साम्य सांंगायचेच तर हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत, त्यातही एक राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा प्रादेशिक पक्ष. याशिवाय आणखी मोठे साम्य म्हणजे हे दोन्ही पक्ष घराणेशाहीवर आधारित आहेत. घराणेशाहीच्या राजकारणात देशात गांधी घराण्याचे जे स्थान आहे, ते बिहारच्या राजकारणात यादव घराण्याचे आहे. लालूप्रसाद यादव यांनी आपल्या अनुपस्थितीत राजदची धुरा तेजस्वी यादवकडे सोपवली. श्रीमती सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडत ते राहुल गांधींकडे सोपवले. दोघांनीही आपल्या महान कर्तृत्वाने आपापल्या पक्षांची लोकसभा निवडणुकीत वाट लावली.
 
पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जवळपास 70 दिवस कॉंग्रेस नेतृत्वहीन स्थितीत होती. तसाच प्रकार तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये केला. लोकसभा निवडणुकीतील राजदच्या पराभवानंतर ते जे गायब झाले ते कालपरवाच उगवले. जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त काळ तेजस्वी यादव बेपत्ता होते. पक्षाच्या कामात ते सक्रिय नव्हते, ते कुठे गेले आहेत, हे कुणालाच माहिती नव्हते. राजदचे ज्येष्ठ नेतेही अंधारात होते. तेजस्वी यादव कुठे आहेत, याची आम्हाला कल्पना नाही, असे राजदचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनीही सांगितले. विशेष म्हणजे याच दरम्यान बिहार विधानसभेचे अधिवेशन होते. पण, विरोधी पक्षनेते असलेले तेजस्वी यादव फक्त दोन वेळा सभागृहात आले, पण त्यांनी सभागृहात एकही शब्द उच्चारला नाही. विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे राजद सभागृहात प्रभावहीन झाली होती.
मागील शुक्रवारी राजदच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. पण, त्यालाही तेजस्वी यादव आले नाही. उद्या मी बैठकीला येतो, असा त्यांचा निरोप आल्यामुळे ही शुक्रवारची बैठक रद्द करत शनिवारी बोलावण्यात आली, पण शनिवारीही तेजस्वी यादव न आल्यामुळे ही बैठकही रद्द करावी लागली. तेजस्वी यादवच्या अशा वागण्यामुळे राजदचे नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
 
राहुल गांधी यांनाही अशीच बेपत्ता होण्याची सवय आहे. राहुल गांधी सभागृहात आले, तरी निर्गुण निराकार चेहरा करून बसतात. सभागृहात सुरू असलेल्या कामकाजाशी आपला काहीच संबंध नाही, अशा भूमिकेत वावरत असतात. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यास नकार दिल्यामुळे तसेच अध्यक्षपदासाठी दुसरे तेवढेच सक्षम नाव समोर न आल्यामुळे की येऊ न दिल्यामुळे, श्रीमती सोनिया गांधी यांची कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली.
असाच प्रकार बिहारमध्ये झाला. तेजस्वी यादव यांनी पक्षाला वार्‍यावर सोडल्यामुळे त्यांच्या आईला- राबडीदेवींना तेजस्वी यादवच्या अनुपस्थितीत राजदची सूत्रे पुन्हा आपल्या हातात घ्यावी लागली. 19 वर्षे कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवणार्‍या श्रीमती सोनिया गांधी यांनी आतापर्यंत कोणतेही घटनात्मक पद भूषवले नाही. मात्र, राजकारणाचा कोणताही गंध नसलेल्या आणि फारसे शिक्षण न झालेल्या राबडीदेवी यांनी लालूप्रसाद यादव पहिल्यांदा तुरुंगात गेल्यावर बिहारचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. भारतीय राजकारणातील ही सर्वात चमत्कारी घटना म्हणावी लागेल. नवर्‍याच्या माघारी पत्नीने घरचे दुकान सांभाळावे, शेती पाहावी तसे राबडीदेवी यांनी राज्य चालवले.
 
लालूप्रसाद यादव यांची एकेकाळी बिहारच्या राजकारणावर चांगली पकड होती, सुरुवातीच्या काळात त्यांची प्रतिमाही चांगली होती. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जी नेतेमंडळी समोर आली, त्यात लालूप्रसाद यादवही होते. नंतर मात्र त्यांना सत्तेची नशा चढली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे तसेच अनिर्बंध कारभारामुळे लालूप्रसाद यादव यांनी आपल्या हाताने आपली प्रतिमा खराब करून घेतली. त्यामुळे त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली. आता त्यांची मुले त्यांच्यावरही ताण निघाली. बापाने जे कमावले ते या दोन्ही मुलांनी आपल्या वागणुकीने गमावले. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेजस्वी यादव या आठवड्यात राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव यांना राजदने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहे. राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तेजस्वी यादवची निवड करावी, अशी मागणीही राजदमधून सुरू झाली आहे.
2016 चा अपवाद वगळता आतापर्यंत भाजपा आणि जदयुने या निवडणुका एकत्र लढवल्या, यावेळीही या निवडणुका जदयु आणि भाजपा एकत्र लढवेल, याबाबत शंका नाही. राज्यात आता राजदचा प्रभाव पूर्णपणे संपला आहे, तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी राज्यातील राजदचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणले आहे. राजदची ही घसरण रोखणे आता लालूप्रसादांना तुरुंगातूनही शक्य नाही!
 
9881717817