भूस्खलनामुळे ‘ही अडकली हिमाचल प्रदेशात

    दिनांक :22-Aug-2019
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन झाले होते. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती. या भूस्खलनामुळे चंदीगढ, मनाली आणि काजा राजमार्ग येथील वाहतूक सेवेवर परिणाम होऊन विस्कळीत झाली होती. मनाली आणि काजा राजमार्गादरम्यान मल्याळम अभिनेत्री मंजू वॉरिअर आणि तिची ३० जणांची टीम तेथे अडकली होती.
 
 
 
 
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी मंजू आणि तिच्या टीमला तेथून सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ही संपूर्ण टीम हिमाचलमध्ये पोहोचली होती. प्रशासनाने त्यांना तेथून निघण्यास सांगितले होते. परंतु चित्रीकरण पूर्ण झाल्याशिवाय परतणार नाही असा हट्ट टीमने धरला होता. परंतु अचानक हवामानामध्ये बदल झाला आणि जोरदार हिमवृष्टी होऊ लागली.
काल रात्री मंजूने मदतीसाठी भावाला फोन केला होत. तिच्या भावाने केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री वी. मुरलीधरन यांच्याकडे मदतीची धाव घेतली. मुरलीधरण यांच्या मदतीने मंजू आणि तिच्या संपूर्ण टीमला तेथून सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आले आहे.
मंजू वॉरिअर लवकरच ‘जॅक अॅन्ड जिल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती कालिदास जयाराम आणि सोबीन शाहिरसह दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिवनने केले आहे. त्यानंतर मंजू धनूषच्या तमिळ चित्रपटातदेखील दिसणार आहे.