मनोरूग्ण महिलेचे अपहरण करून बलात्कार

    दिनांक :23-Aug-2019
 ऑटोचालकासह दोन गजाआड
 
नागपूर,
रस्त्याने जाणाऱ्या एका मनोरूग्ण महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी एका ऑटोचालकासह दोघांना अटक केली.
शेख शहजाद शेख शब्बीर (२६) मारवाडी चौक, इतवारी आणि मो. जावेद अंसारी (रा. उप्पलवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २९ वर्षीय पीडित मनोरूग्ण महिला ही विवाहिता आहे. तिला एक मुलगा आहे. मनोरूग्ण असल्याने पतीने तिला सोडले असून ती आपल्या आईवडिलांकडे राहते. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ती छत्रपतीनगर चौकाकडून नरेंद्रनगरकडे जात होती. त्यावेळी कृष्ण मंदिरसमोर ऑटोचालक शेख शहजादने कुठे जायचे आहे अशी तिला विचारणा केली. त्यावर महिलेने समोरच्या चौकात सोडून दे असे म्हणून ती ऑटोत बसली. रस्त्याने जात असताना महिला ही मनोरूग्ण आहे हे शहजादने हेरले. तिला कुठेही न उतरविता थेट उप्पलवाडी येथे राहणारा मित्र मो. जावेद याच्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी तिला त्याच घरात डांबून शहजाद ऑटो घेऊन आपल्या धंद्यावर निघून गेला. दरम्यान, मो. जावेदने याने देखील तिचा विनयभंग केला. सायंकाळी शहजाद धंद्यावरून घरी आला असता पुन्हा त्याने तोच प्रकार केला.
 
 
इकडे मुलगी दिसत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळली नाही. त्यानंतर गुरूवारी दुपारी शहजादने तिला इतवारी रेल्वेस्थानकावर सोडून पळ काढला. पळून जाताना कधी गरज भासल्यास या क्रमांकावर फोन कर असे बोलून तिला आपला मोबाईल क्रमांक दिला. सायंकाळी ५ च्या सुमारास महिला घरी आली असता तिच्या कुटुंबियांनी तिला विचारपूस केली. तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. लगेच मुलीला घेऊन तिचे आईवडिल धंतोली पोलिस ठाण्यात आले.
मुलीकडे शहजादचा मोबाईल क्रमांक होता. त्याच क्रमांकावरून पोलिसांनी तिला शहजादसोबत संपर्क करण्यास सांगून जगनाडे चौकात भेटण्यासाठी बोलविले. शहजाद जगनाडे चौकात जाताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर मो. जावेदला ताब्यात घेतले. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली.