देशी कट्टयातून डोक्यात गोळी झाडून युवकाची आत्महत्या

    दिनांक :23-Aug-2019
नागपूर,
भिसीच्या पैशाच्या वादातून एका युवकाने आपल्या डोक्यात देशी कट्टयातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना अजनी हद्दीत जयवंतनगर येथे उघडकीस आली. आशिष धर्मदास उसरे (२६) रा. कामठी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
आशिष उसरे हा मुळचा कामठीचा राहणारा आहे. आठ महिन्यांपूर्वीच त्याने कामठी येथे राहणाऱ्या योगिनीसोबत लग्न केले होते. विवाहापूर्वी तो कामठी येथे भिसी चालवायचा. भिसीच्या माध्यमातून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा होत असे. मात्र, तो खर्चिक स्वभावाचा असल्याने त्याने भिसीतील सर्व पैसे खर्च करून टाकले होते. त्यामुळे सदस्यांना त्यांचे पैसे परत करण्यास तो असमर्थ ठरला होता. त्यातूनच त्याची आर्थिक कोंडी झाली होती. आशिष भिसी सदस्यांना पैसे देत नसल्याने सदस्यांनी कामठी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. कारागृहात जामीनावर बाहेर आल्यानंतर सदस्यांनी पैशासाठी पुन्हा त्याच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तो कामठी सोडून जयवंतनगर येथे नीलेश शर्मा याच्या घरी तो भाड्याने रहायला आला होता. आशिष आणि योगिनी हे दोघेही वरच्या मजल्यावर राहत होते.
 
 
योगिनीच्या काकाचा मृत्यू झाल्याने ती कामठीला गेली होती. गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास पती पत्नीमध्ये बोलणे झाले होते. त्यानंतर योगिनीने त्याला वारंवार फोन केला परंतु आशिषकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. योगिनीने कमीतकमी २५ ते ३० वेळा आशिषच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. आशिष प्रतिसाद देत नसल्याने रात्री दहाच्या सुमारास ती घरी आली. त्यावेळी आतून दार बंद होते. तिने आशिषला आवाज दिला परंतु, आशिषने दार उघडले नव्हते.
ही माहिती योगिनीने घरमालक शर्मा यांना दिली. शर्मा यांनी खिडकीच्या फटीतून पाहिले असता आशिष जमिनीवर पडला होता. त्याच्या हातात देशी कट्टा होता. लगेच ही माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दार तोडून पोलिसांनी पाहणी केली असता आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याने आपल्या डोक्यात देशी कट्टयातून गोळी झाडली होती. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.