समृद्ध करणारी ‘आनंदीगोपाळ!’

    दिनांक :23-Aug-2019
नंदीगोपाळ’ हा चित्रपट तुमच्यापैकी कित्येकांनी पहिला असेल. मला चित्रपट बघण्याचा योग अजून आला नाही, कादंबरी मात्र वाचली. एखाद्या काल्पनिक कथेसारखीच ही सत्यकथा आहे. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेली, श्री. ज. जोशींनी लिहिलेली ही कादंबरी वाचताना एखादा कृष्णधवल चित्रपट िंकवा मालिका बघतो आहोत की काय असे वाटते. कादंबरी वाचल्यावर 1865 ते 1887 असं अवघं 22 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या आनंदीबाई केवळ िंहदुस्तानातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आपल्यासमोर येत नाहीत, तर िंहदू धर्माचा सार्थ अभिमान असणारी, इतर धर्माविषयी तेवढंच प्रेम असणारी, त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा आदर करणारी, िंहदू संस्कृतीचा आणि परदेशी संस्कृतीचा तौलनिक विचार करणारी असामान्य बुद्धिमत्तेची आणि तरीही पाय जमिनीवर ठेवून वावरणारी विदुषी म्हणून येतात.
 
 
 
 
 
कल्याणच्या जोश्यांच्या वाड्यातली ही लहानखुरी यमू आपल्याला भेटते तेव्हा अवघी नऊ वर्षांची असते, घरचे सगळे तिचे लग्न उरकण्याच्या खटपटीत असतात. ‘बडा घर आणि पोकळ वासा’ असलेल्या जोश्यांना त्यामुळेच की काय, 25 वर्षांचा बीजवर गोपाळराव नवरा मुलगा म्हणून पसंत असतो. शेतीवाडी नसलेला, तर्‍हेवाईक, ‘चक्रम’ स्वभावाचा हा गृहस्थ निव्वळ पोस्टात आहे, या कारणास्तव स्वीकारला जातो. गोपाळरावांच्या तर्‍हेवाईकपणाचे किस्से कादंबरीत वाचताना मजा येते. लेखक प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे गोपाळरावांच्या व्यक्तित्वातला हा विचित्रपणा कादंबरीत रंगत आणतो. ‘मुलगी म्हणजे परक्याचे धन’ अशी वृत्ती असलेला तो काळ. त्यामुळे बुटकीशी, दिसायला ठीकठाक असणारी यमू ‘नहाणं’ येण्याच्या आत उजवली म्हणजे आपण सुटलो, असेच घरच्यांचे विचार असतात, यमू मात्र या सगळ्यातून अलिप्त पोरपणतच रमलेली असते. तिकडे लोकमान्य टिळक, न्या. रानडे यांना समकालीन असणारे गोपाळराव खरंतर सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते. लेखक म्हणतात त्याप्रमाणे सुधारणेची ‘बोलकी चळवळ’ त्यांना मान्य नव्हती, खरेतर ते विधवाविवाह करायच्या प्रयत्नात होते, पण ते साध्य झाले नाही म्हणून लग्न ठरवताना होणार्‍या बायकोला मी भरपूर शिकवणार, तिने चूल-मूल-घरकाम यात अडकता कामा नये, या त्यांच्या मुख्य अटी होत्या. त्या काळातील सामाजिक स्थिती बघता असे काही मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे यमूच्या घरचे त्यांना या अजब हट्टापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करतात. मधल्या काळात, मी लग्नानंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारणार आहे, अशी पोकळ धमकी ते देतात, मग मधेच पुण्याला निघून जातात, त्यामुळे लग्न मोडते. अशा बर्‍याच गमतीजमती होतात. हा मनुष्य म्हणजे ब्राह्मणांच्या कुळाला बट्टा आहे, अशी त्या काळी सगळ्यांची समजूत असते. शेवटी एकदाचे लग्न लागते आणि ‘यमू’ची ‘आनंदीबाई’ होते. वरवर मिस्कील िंकवा तिरसट भासणारे गोपाळराव प्रत्यक्षात स्त्रीशिक्षणाची महती जाणून असतात, िंहदू समाजातल्या जुनाट, बुरसटलेल्या चालीरीती मोडून काढण्याची त्यांची तयारी असते. कल्याण िंकवा ठाण्याला राहून आनंदीचा अभ्यास होणार नाही, हे लक्षात आल्यावर गोपाळराव आपली बदली अलिबागला करून घेतात. अलिबागला आल्यावर आनंदीच्या शिक्षणाला गती येते. संस्कृत, मराठी, इंग्रजी या भाषांची आणि इतिहास, भूगोल, विज्ञान या शास्त्रांंची श्रीमंती तिला कळते, खर्‍या अर्थाने तिला अभ्यासाची गोडी लागते. अलिबागला असतानाच आनंदीला पुत्ररत्न प्राप्त होते, पण लहानशा आजाराचं निमित्त होऊन बाळ दगावते. अजाण वय आणि अभ्यास यामुळे आनंदी या दु:खातून सावरते. या जोडप्याच्या एकत्रित बाहेर जाण्यामुळे, अभ्यासाच्या विचित्रच(?) अशा नादामुळे, तिरसट स्वभावामुळे लोक त्यांची फार कुचेष्टा करतात, टोमणे मारतात. या सगळ्याला कंटाळून गोपाळराव आपली बदली कोल्हापूरला करून घेतात, शिवाय तिथल्या मिशन हायस्कूलमध्ये आनंदीला इंग्रजी शिकवण्याची त्यांची इच्छा असते, मात्र कोल्हापूर काय िंकवा नंतरची गिरगाव, भूज, कलकत्ता ही ठिकाणं काय, सगळ्याच ठिकाणी स्वबांधवांकडून टीका, कुचाळक्या, तर परकीयांकडून अवहेलनाच त्यांच्या नशिबी येते. कोल्हापूरला असताना फादर गुहीनच्या मदतीने आनंदीच्या शिक्षणासाठी अमेरिकावारी करण्याची योजना ते आखतात. आम्ही दोघेही ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास तयार आहोत, असे खोटे आश्वासनही देतात, परंतु तो प्रयत्न निष्फळ ठरतो. भूजला असताना मात्र जणू दैवी योजना असल्यासारखे मिसेस कारपेंटर या ब्रिटिश बाईचे पत्र आनंदीला येते आणि अमेरिकेला जायचे दार किलकिले होते. गोपाळरावांनी अमेरिकेला पाठवलेले पत्र तिथल्या एका वर्तमानपत्रात येते आणि योगायोगाने ते कारपेंटर बाईंच्या वाचण्यात येते. आधीपासूनचे काही नाते असावे तसा दोघींचा पत्रव्यवहार सुरू होतो. अमेरिकन मावशी पत्रातून अमेरिका दर्शन घडवते, तर तिची ही भारतीय भाची तिला स्वदेश, स्वसंस्कृतीची ओळख करून देते. भूजनंतर गोपाळराव आपली बदली कलकत्त्याला करून घेतात. अर्थात गाव बदलले तरी समाज तोच असतो. आनंदीचं व्यक्तिमत्त्व मात्र आता अधिकाधिक प्रगल्भ होऊ लागतं. गोपाळरावांना तिच्या बुद्धीचा आवाका लक्षात येऊ लागतो. अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आणि आपल्या देशबांधवांसाठी त्याचा उपयोग करायचा, असा दोघांचाही उदात्त हेतू असतो. कलकत्त्याला आल्यावर अमेरिकागमनाच्या योजनेला वेग येतो. शेवटी दोघांचेही जाणे शक्य होत नाही, हे लक्षात आल्यावर गोपाळराव काहीसे व्याकुळ होतात. शिकलेली बायको आपल्याला अंतरणार तर नाही ना, अशा पुरुषसुलभ भावनेमुळे तिचा मत्सर करू लागतात. आनंदी एकटीच अमेरिकेला रवाना होते. आताच्या काळातसुद्धा अशा दूरच्या परक्या देशात एकटीने जायचे म्हटल्यावर दडपण येते, तिथे त्या काळात बोटीने काही महिन्यांचा प्रवास आनंदीने एकटीने कसा केला असेल, याची कल्पनाच केलेली बरी!
 
 
 
सुरवातीला कारपेंटर मावशीकडे मुक्काम आणि मग फिलाडेल्फिया येथील पेन्‌सिल्वानिया या वैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचे, असे ठरते. आनंदीचे माहेरपण खर्‍या अर्थाने या दूरदेशी कारपेंटर मावशीकडे होते. पामीलासारखी बहीण आणि इतरही शेजारी आनंदीच्या जिवाभावाचे होतात. आपण खेळतो ते सागरगोटे ‘जॅक स्टोन’ म्हणून समोर येतात तो क्षण म्हणजे तर तिच्यासाठी आनंदाची परमावधी असतो. यथावकाश फिलाडेल्फियाचे वैद्यकीय शिक्षण सुरू होते आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या हवामानाशी आनंदीचा लढा सुरू होतो. एका िंहदुस्तानी स्त्रीप्रमाणेच आहार-विहार, पोशाख ठेवायचा, यावर आनंदी ठाम असते. शिवाय तिथली कोंदट खोली, उपकार केल्याप्रमाणे जेवायला घालणारी ब्रिटिश मालकीण, हाडे गोठवणारी थंडी आणि हे सगळे कमी की काय म्हणून गोपाळरावांची तिरकस पत्रे, हे तिची शारीरिक आणि मानसिक परीक्षाच बघत असतात. या सगळ्या काळात विद्यालयातील तिची मैत्रीण आबी हे तिचे एकमेव जिव्हाळ्याचे ठिकाण असते. अशा परिस्थितीतही आनंदी तिन्ही वर्षी प्रथम क्रमांक पटकावते. शेवटच्या वर्षाची परीक्षा संपता संपता गोपाळरावसुद्धा हर प्रयत्नांनी अमेरिकेत दाखल होतात. त्यांच्या विचित्र वागणुकीमुळे, विचारांमुळे आनंदीला अगदी कानकोंडे व्हायला होते. पण, कारपेंटर मावशीकडले सगळे त्यांना समजून घेतात. आनंदीचा पदवीदान समारंभ सुंदर रीतीने साजरा होतो. अनेको मैलांवर असलेल्या िंहदुस्थानसारख्या एका गुलाम देशातून एक बारकीशी काळी मुलगी डॉक्टर व्हायला इथे येते काय आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होते काय, याचे सगळ्यांना खूप कौतुक वाटते. प्रत्यक्ष पंडिता रमाबाई समारंभाला हजर असल्याने आनंदी अगदी कृतकृत्य होते. पण, या सगळ्याला आनंदीच्या आजारपणाची काजळी लागलेली असते जी सतत वाढत असते. अमेरिकेतच तिच्यावर उपचार सुरू असतात, पण दिवसेंदिवस तिचा आजार बळावत जातो. शेवटी मायभूमीच्या ओढीने ते दोघेही िंहदुस्तानात परत येतात. या सगळ्या दगदगीने आनंदी थकून जाते. या सगळ्या प्रकारामुळे काहीसे नरमलेले, हळवे झालेले गोपाळराव प्रयत्नांची शर्थ करतात, पण शेवटी आजार वाढतच जातो आणि मृत्यू आनंदीला गाठतोच.
 
 
 
आनंदीची ही पूर्ण कथा वाचल्यावर वाटतं, शिक्षण मनुष्याला काय देतं? तर विचार करायची शक्ती, स्वातंत्र्य देतं. चांगलं-वाईट ठरवण्याची विवेकबुद्धी प्रदान करतं, नाहीतर निव्वळ अक्षरओळख असणारी ही आनंदी नवर्‍याचं, पोराबाळांचं करून मरून गेली असती. हे मरण अहेवपणी आलं असतं तर धन्य झाली असती, पण तसं व्हायचं नव्हतं. सुरवातीला नवर्‍याच्या शिक्षणाच्या हट्टापायी का होईना, त्याच्या आधाराने उभी राहिलेली आनंदी त्याच्या छत्रछायेतून बाहेर येऊन एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्याला भेटते. अमेरिकेतले मोकळे वातावरण पाहून स्वतःच्याच तारुण्यसुलभ भावनांकडे दूरस्थपणे पाहते, त्यावर विचार करते. नवर्‍याचे आचारविचार पटत नसले तरी त्याच्याशी एकनिष्ठ राहते, त्याला समजून घेते. अमेरिकेसारख्या कर्तृत्वाला वाव देणार्‍या, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या देशात राहण्यापेक्षा मायभूमीला परतण्याचा निश्चय करते, रुग्णसेवेचं तिचं स्वप्न मात्र अपूर्ण राहतं, याची आपल्यालाही खंत वाटते.
 
आज एक ‘स्त्री’ म्हणून आपण जे काही अस्तित्व राखून आहोत, आपल्या हक्काचं स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रात मानमरातब मिळवतो आहोत त्याचं श्रेय बर्‍याच जणांना आहे. त्या श्रेयनामावलीत आपण आनंदीबाई आणि गोपाळराव यांची नावं कायम स्मरणात ठेवायला हवी. भारतीय स्त्री त्यांची कायमची ऋणी आहे.
अश्विनी गोरे