कर्तृत्वाची ओळख ‘किरण बेदी!’

    दिनांक :23-Aug-2019
देशामध्ये लाखावर अधिकारी असतानाही केवळ काहीशे अधिकारी लोकांच्या मनामध्ये घर करून राहतात. या सदैव जनतेच्या भल्याचा विचार करून सेवा करणार्‍या अधिकार्‍यांना समाजामध्ये नोकरीत असतानाही आणि सेवानिवृत्त झाल्यासही खूप मानाचे स्थान मिळते. अशीच भारतीय जनमानसात आपल्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करणारी अधिकारी म्हणजे- ‘किरण बेदी!’ होय.
 
 
 
 
किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी झाला. विद्यार्थी जीवनात अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही बाबींना त्यांनी न्याय देण्याचे काम केले. एनसीसीमध्ये त्यांनी घेतलेला सहभाग हे पोलिस दलाकडे जाण्याचे त्यांचे पहिले पाऊल होते. टेनिसपटू म्हणून आपली एक वेगळी ओळख त्यांनी देशभर निर्माण केली होती. याच दरम्यान त्यांची भारतातील पहिली महिला आयपीएस म्हणून 1972 साली निवड झाली. पोलिस दलामध्ये पुरुषांची असलेली मक्तेदारी किरण बेदींच्या सहभागाने खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. कारण, त्यांची महिला पोलिस म्हणून निवड झाल्यानंतर अगणित तरुणींनी जाणीवपूर्वक आणि आपली आवड म्हणून पोलिस दलामध्ये जाण्याचे ठरविले. आज त्या यामध्ये यशस्वीपणे आपले योगदान देत आहेत. किरण बेदींची तीन दशकांची पोलिस दलातील कामगिरी वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहिलेली आहे.
 
 
 
सर्वांना सारखे नियम आणि चुकीला माफी नाही, हे तत्त्व त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात जपले. इंदिरा गांधी यांची चुकीच्या ठिकाणी उभी केलेली गाडी आपल्या अधिकार्‍याने क्रेनच्या मदतीने उचलल्यास त्यांनी आपल्या त्या अधिकार्‍याला पािंठबा दिला. बेदी यांच्या केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाबरोबर त्यांना बदलीला सामोरे जावे लागले. मात्र, बदली म्हणजे अधिक चांगले काम करण्याची संधी म्हणून त्यांनी त्या झालेल्या बदलीला सकारात्मक घेतले आणि अधिक जोमाने कार्य केले. आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान त्यांनी दिल्लीच्या रहदारीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलेले होते. असंख्य लोकांच्या ‘नो-पार्किंग’मधील गाड्या क्रेनने उचलल्यामुळे त्यांची ओळख किरण बेदी वरून ‘क्रेन बेदी’ अशी झाली होती. दिल्ली, गोवा, मणिपूर, पोलिस प्रशिक्षण अकादमी आणि तिहार जेलमध्ये त्यांनी केलेले काम एक आदर्श असेच आहे.
 
 
तिहार जेलमध्ये त्यांनी मुख्य अधीक्षक म्हणून केलेल्या सुधारणा यामुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली. या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तिहारमध्ये त्यांनी अमुलाग्र बदल केला. दोन हजार कैद्यांसाठी असलेले हे तुरूंग दहा हजार कैद्यांनी भरलेले होते. त्यांच्या जेवणात निघणारे किडे, आरोग्याचे प्रश्न, गुन्हेगारी, अस्वच्छता, व्यसने आणि एकंदरित अमानवी जीवन पद्धतीवर त्यांनी स्वच्छता, प्रार्थना, विपश्यना, योग, उत्सव, शिक्षण यांच्या मदतीने प्रहार केला. ज्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आणि लोकपालच्या लढाईमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. नवज्योती तसेच इंडिया व्हिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य आजही चालू ठेवले आहे. संपूर्ण देशभर त्या व्याख्याने, चर्चासत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. आय डेयर, इट्‌स आलवेज पॉसिबल, व्हॉट वेन्ट रॉंग, अॅज आयसी ही वाचनीय पुस्तके त्यांनी लिहली आहेत. शिस्त, धैर्य, पारदर्शक व्यवहार आणि एक कार्यशील शौर्यपदक विजेत्या महिला पोलिस अधिकारी म्हणून संपूर्ण देशाला परिचित असलेल्या डॉ. किरण बेदी पुदुचेरीच्या नायब राज्यपाल आहेत.
 
 नीलेश जठार