ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी...

    दिनांक :23-Aug-2019
ऋणानुबंध हा शब्द मनाला आधार देणारा, दिलासा देणारा शब्द आहे. आज प्रत्येक जण आपल्या कर्माने जन्माला येतो. त्याचे जन्माला येताच प्रत्येकाशी नाते जुळते. त्याचे ऋणानुबंध जोडल्या जाते. पोटात असताना त्याचे नाते आपल्या आईशी जोडले जाते. तिच्या मनाचे धागेदोरे आपल्या जिवाशी विणले जाते. ती आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊन लहानाचे मोठे करते. आज जन्माला येणारे मूल केवळ आपल्या कर्माने जन्माला येते. या जगात जन्माला येणारा प्रत्येक माणूस ऋणानुबंधात बांधला गेला आहे. त्याचे प्रत्येकाशी कुठल्या ना कुठल्या नात्यानेे ऋणानुबंध जोडले गेले आहे. या जगातील व्यवहारसुद्धा ऋणानुबंधमुळेच चालतो. आपल्या कुटुंबातसुद्धा बहीण, भाऊ ऋणानुबंधामुळेच आहेत. त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा, माया, ममता हे केवळ ऋणानुबंधामुळेच जोडले गेले आहेत. या ऋणानुबंधामुळे जिवाला जीव देणारे मित्र निर्माण होतात. हे कशामुळे होते, तर तुम्ही चारचौघात संबंध वाढवता म्हणून. यामुळेच रक्ताचे नाते नसले तरी ते केवळ तुमच्या प्रेमामुळे एकत्र आलेले असतात.
 
 

 
 
 
आज माणूस मानसिक तणावाखाली जगतो आहे. माणसाची मानसिक स्थिती बिघडली की त्याला नातीगोती, प्रेमभाव राहात नाही. अशा स्थितीत तो आपल्या नात्यापासून दूर ओढला जातो. या स्थितीत त्याला प्रेमाची गरज असते. त्याच्या पाठीवरून कोणीतरी प्रेमाने हात फिरविण्याची त्याला गरज वाटू लागते. कधीकधी मानसिक तणावाखाली तो इतका खेचला जातो की, तो स्वत:ची ओळख विसरून जातो. या अशा स्थितीमधे आपापसातले ऋणानुबंध हे त्या व्यक्तीला पूर्वस्थितीमधे आणू शकतात. यात एवढी ताकद आहे. ऋणानुबंधासाठी फक्त रक्ताची नाती आवश्यक नाहीत, तर ऋणानुबंधामध्ये मित्र, मैत्रीण असतात. ही नातीपण तेवढीच महत्त्वाची असतात.
 
या नात्यांमध्ये कधीकधी ताणतणाव असतो. त्याचे कारण अगदी क्षुल्लक असतं. फक्त ते समजून घेणं आणि ज्याच्या त्याच्या हातात असते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदु:खं येतात. एखाद्या वार्‍यासारखे फुंकर मारून सुखाचा ओलावा देतात, तर दु:खाचे वारे हे उन्हाळ्यातल्या गरम वार्‍यासारखे चटके देऊन जातात. आयुष्यात आलेली सुखदु:खं ही झोपाळ्यासारखी मागे जातात, तर त्याचे वेगाने पुढे निघूनही जातात.
 
आयुष्याच्या दोन बाजू असतात. आपण त्या वेळेत मोडू. एक चांगली तर दुसरी वाईट. एखाद्याच्या जीवनात जर वाईट वेळ आली, तर त्यानंतर चांगली वेळ येईल. हा पाठशिवणीचा खेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, फक्त त्याला धीराने तोंड देणं, हे ज्याचं त्याला करावं लागतं. पण, तोंड देण्यासाठी माणसातले ऋणानुबंध कामी येतात. सुखात सगळेच साथ देतात, पण दु:खात कोणीही नसतो. अशा वेळेस सच्चा मित्र, त्याची साथ हवीहवीशी वाटते. नळ दुरुस्त करून प्लंबर त्या नळाचे पाणी थांबवू शकतो, पण डोळ्यांतले पाणी थांबवणारा कोणीतरी हवा असतो. तुमच्याजवळ काही नसेल तर एकच गोष्ट हवी, ती म्हणजे संयम. यश मिळवायचे असेल, सुख मिळवायचे असेल, तर फक्त संयमच हवा. संयमच या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला तारून नेईल.
 
कुणाच्या आयुष्यात एखादी गोड व्यक्ती येते, ती व्यक्ती त्याला योग्य सल्ला देते, तू कुठे चुकतो, तुला काय करायला हवं, ही दिशा दाखवते. या दिशा दाखवणार्‍या व्यक्तींना तुम्ही प्रेमाने जपा. एखाद्या क्षल्लक कारणाने त्यांना तोडून टाकू नका. कारण तुमच्याजवळ उद्या सगळं असेल, पण ही गोड माणसं नसतील तर तुमच्या आयुष्याला काही अर्थ नसेल. हे उजाड, कोरडं वाळवंट अनुभवण्यापेक्षा, तुमच्या हिरवळ बागेची म्हणजे या गोड माणसाची काळजी घेणं तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात वाईट दिवस येतात. त्या दिवसांना सामोरे जा. हे अनुभवल्याशिवाय त्यांना चांगल्या दिवसाची िंकमत कळत नाही.
 
आजकाल लोक ऑनलाईनवर वस्तू विकतात. एक गोष्ट करा, तुम्ही तुमचा अहंकार ऑनलाईनवर विक्री काढा, कोणीही विकत घेणार नाही. तेव्हा तुम्हाला समजेल की, आपण किती क्षुल्लक गोष्ट स्वत:जवळ बाळगत होतो. शेवटी मी हेच म्हणेल, ऋणानुबंधाच्या या प्रेमाच्या गाठी हळुवार जपा आणि त्याचा प्रेमाने सांभाळ करा. मग ही वीण कशी घट्‌ट होईल बघा...
 
पल्लवी उधोजी
8788070416