बिग बींनी धरले सिंधुताईंचे पाय

    दिनांक :23-Aug-2019
‘कौन बनेगा करोडपती’ आणि अमिताभ बच्चन हे आजच्या घडीला एक घट्ट समीकरण झालं आहे. त्यामुळे या शोच्या अकराव्या पर्वातही सूत्रसंचालक म्हणून अमिताभ बच्चन त्याच उत्साहाने प्रेक्षकांसमोर आले. या शोने आतापर्यंत अनेकांना प्रसिद्धी आणि पैसा असं दोन्हीही भरभरुन दिलं आहे. त्यामुळे या शो ची प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा आहे. या शोमध्ये सामान्य माणसांपासून दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये पहिला ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ असणार आहे. या एपिसोडमध्ये काही मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे यंदा होणाऱ्या या भागात कोणती दिग्गज व्यक्ती येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यातच ‘केबीसी’ने एक व्हिडीओ शेअर करुन या भागात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या हजेरी लावणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे हा शो सुरु असताना बिग बी सिंधुताईंच्या पाया पडले, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
 
 
 
 
बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अमिताभ बच्चन यांचा आजही कलाविश्वामध्ये दरारा आहे. लोकप्रिय आणि तितकेच प्रसिद्ध असलेले बिग बी कलाविश्वातील महानायक म्हणून ओळखले जातात. मात्र अशी ख्याती असतानाही बिग बींनी ‘केबीसी’च्या सेटवर सिंधुताई सपकाळांचे पाय धरले. परंतु बिग बींनी असं करण्यामागे एक खास कारण आहे.
सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या एपिसोडचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. केबीसीच्या सेटवर सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावल्यानंतर बिग बींनी त्यांना पाया पडून नमस्कार केला आणि केबीसीच्या सेटवर त्यांचं स्वागत केलं. सिंधुताई यांचं समाजकार्य फार मोठं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे बिग बींनी त्यांना पाया पडून नमस्कार केला.
दरम्यान, अनेक अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंनी आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक लहान मुलांना दत्तक घेतलं आहे. त्याप्रमाणेच त्यांनी अनेक मुलांचा सांभाळही केली आहे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राची मदर तेरेसा असं संबोधलं जातं. त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.