व्यसनं पालकांची आणि पाल्यांची

    दिनांक :23-Aug-2019
परवा नागपुरातल्या एका मुलीने ब्ल्यू व्हेलमुळे आत्महत्या केली. हे वाचून हादरायला झालं. या गेममधले वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारत शेवटी आत्महत्या! आधी ‘पॉकिमॉन गो’ या व्हिडीओ गेमने उच्छाद मांडला होता. मुलं हरवत, कुठेही जात, पण ब्ल्यू व्हेलनं तर त्याच्याही पुढची पायरी गाठली. फिलिफ बुडेकीन या रशियन मुलाने हा खेळ तयार केला. त्याने व्यक्तिशः 17 जणांना आत्महत्या करायला लावली. सध्या तो तुरुंगात आहे. ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेममध्ये ‘फिफ्टी डे डेअर’ म्हणजे पन्नास दिवस रोज एक आव्हान स्वीकारून ते पूर्ण करायचं असतं. रोज एकापेक्षा एक कठीण आव्हान देऊन सवय केली जाते आणि शेवटचे पन्नासावे चॅलेंज म्हणजे आत्महत्या करणे. कोवळ्या वयातील मुलांना ना विचारशक्ती, ना सदसद्विवेकबुद्धी. ते झपाटल्यासारखे खेळतात आणि त्या अवस्थेत आत्महत्या करून मोकळे होतात. मुंबईतील अंधेरीमधली मनप्रीतिंसग साहनी या 14 वर्षांच्या मुलाने आपल्या राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याआधी शंभरेक जणांनी या गेममुळे आत्महत्या केल्या. रशिया, कझागिस्तान, किर्गिस्तान या देशांत या गेमवर बंदी आहे. भारतातही या गेमवर बंदीची मागणी होत आहे.
 
 

 
 
 
पालकत्व दिवसेंदिवस किती कठीण होत आहे, हे दर्शविणार्‍या आणखी काही घटना- मन्मथनं केलेली आत्महत्या, मोबाईल काढून घेतल्यामुळे एका सोळा वर्षांच्या मुलीने केलेली आत्महत्या. मुलांवर कुठे कुठे आणि केव्हा केव्हा लक्ष ठेवायचं? मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, मुले कुठे जातात, काय करतात, अभ्यास करतात का, कोणकोणते गेम्स मोबाईलवर खेळतात, कोणकोणत्या साईटस्‌ ना भेट देतात, पोर्नसाईटस्‌ बघतात का, एकटे बघतात की मित्र-मैत्रिणींसोबत बघतात इत्यादी इत्यादी. आई-बाबा सतत मुलांच्या मागे तर राहू शकत नाहीत. त्यांच्या मागे काही दिवसांनी गुप्तेहर लावायची वेळ येईल.
 
 
मुलांना मैदानी खेळासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. भरपूर शारीरिक व्यायाम, शुद्ध हवा, मित्रांसाठी काही करणे, तडजोड करणे, खिलाडूवृत्ती, अपयश पचविणे, थकणे, रग जिरणे हे सगळे फायदे पालकांना माहीत असतात. पटलेले असतात, पण पाल्यांपर्यंत पोहोचविणे कठीण आहे. थीअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये अंतर आहे. खेळल्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी वाढते, व्यायामामुळे शरीर मजबूत, पिळदार बनून, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोग दूर पळतात. व्यायामाबद्दल आपण रामदेवबाबांकडून ऐकतोच.
 
 
परवा माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘‘मुलं हवीत कशाला? नुसता डोक्याला ताप! इतक्या असुरक्षित, युद्धाच्या टोकावर असलेल्या जगात मुलांना जन्माला घालणे योग्य आहे का? आणि त्याला द्यायला वेळ कुठून आणणार? मला तर मरायलाही फुरसत नाही. ती भानगडच नको.’’ कुठल्याही गोष्टींनी मर्यादा सोडली तर त्याचे व्यसनात रूपांतर होते. सध्या दारूसाठी व्यसनमुक्ती केंद्र आहे, तंबाकू-गुटख्याचे नाही. इंटरनेट डिअॅडिक्शन सेंटर आहे. उद्या लहान मुलांनाही या केंद्रात भरती करण्याची वेळ येईल. हे होऊ नये यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
 
 
कुणाला कशाचे व्यसन लागेल हे सांगता येत नाही. टीव्हीचे, सीरियलचे व्यसन इतके वाढले आहे की, आज-काल कुणी कुणाकडे जात नाही. गेलो तर ज्यांच्याकडे जातो, ते लक्षच देत नाही, टीव्हीच पाहात बसतात. वाटलंच तर ब्रेकमध्ये बोलतात. माणसांपेक्षा (जवळच्या स्नेही, नातेवाईक, रक्ताच्या) टीव्ही त्यांना जास्त जवळचा वाटतो. त्यांच्या जीवनाचं सगळा टाईमटेबल टीव्ही ठरवतो. गृहिणींचं असतं- ‘या ब्रेकमध्ये कूकर लावीन, त्या ब्रेकमध्ये भाजी फोडणीला देईन, त्यानंतरच्या ब्रेकमध्ये जेवायला बसू. त्यापुढच्या ब्रेकमध्ये मागचं आवरीन’ असं. भक्तिभावाने टीव्ही पाहणं हे व्यसनांच्या गटात आजकाल गेलेलं आहे. गप्पांचा विषयही त्या कृत्रिम माणसांच्या कृत्रिम सुखदुःखाचा! एखादा भाग जरी सुटला तरी बायका इतक्या अवस्थ होतात की ज्याचं नाव ते!
 
 
तेच मोबाईलचे. परवा एका स्नेह्यांकडे गेलो होतो. बाहेर चपला तर दिसत होत्या, पण घरातून आवाज नाही. बघितले तर आई-वडील आपापल्या मोबाईलमध्ये गर्क, तर मुलं मोबाईलवर गेम खेळत होते. घरातला संवाद टीव्हीमुळे कमी झाला होता आणि मोबाईलमुळे संपलाच. संपर्काचं एक साधन- जगातल्या दूरवरच्या माणसांशी संवाद वाढवतो. जुने मित्र भेटतात. बॅचमेटस्‌ भेटतात. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे आपल्याला माहीत असतं, पण आपल्या मुलांच्या, आई-वडिलांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. मोबाईल मॅनिया नावाचा एक नवीन रोग जन्माला आला. काही लोक सतत मोबाईल बाळगतात. अगदी मॉर्निंगवॉकलासुद्धा मोबाईल घेऊन जातात. जणू काय सर्जन िंकवा गुप्तहेर खात्यातील नोकरीत आहेत, केव्हाही आणिबाणीची परिस्थिती ओढवू शकते? किमान त्यावेळात तरी आत्मसंवाद, मनन, िंचतन, आपल्याकडे लक्ष देणं नाही. जणूकाय तो सुटा अवयवच आहे. कधीकधी एक खट्याळ विचार मनात येतो- एका दिवस सगळ्यांचे मोबाईल गायब करावे आणि लोकांची अवस्था पाहावी.
 
 
परवा एका मैत्रीण म्हणाली, ‘‘अगं, काल दिवसभरात एकही फोन आला नाही. मी इतकी अस्वस्थ झाले की विचारू नकोस. मला वाटलं आपण इतके दुर्लक्षित झालो की काय? आपल्याला लोकांनी वाळीत तर टाकलं नाही ना. मी दहादा मोबाईल पाहिला, न जाणो, एखादा फोन आला असेल, आपल्याला रिंग ऐकू आली नसेल, मोबाईल सायलेंट तर नाही ना..’’ लोक दहादा मोबाईल पाहतात. कुणाचा फोन तर आला नाही ना म्हणून. जणूकाय एखादा फोन घेतला नाही तर जगबुडी होणार आहे. स्त्रियांचं व्यसन म्हणजे खरेदी करणं! सतत काही ना काही खरेदी करत असतात बायका. याचा खरंच आपल्याला काही उपयोग आहे का? ती वस्तू वर्षातून एकदा तरी आपण वापरणार आहोत का? कशाचाही विचार नाही. घरोघरी केकपॅन, टोस्टर, मायक्रोव्हेव असतात त्याचा उपयोग किती बायका, किती वेळा करतात? आता तर आटाचक्की, तेलघाणीही घरगुती वापरासाठी बाजारात आल्यात. लोक मोठ्या कौतुकानं खरेदी करतात, सुरुवातीला हौसेने काही दिवस वापरतात, मग त्या वस्तू अडगळीत पडून असतात. साड्यांच्या सर्व सेलला भेटी देणे, हा बायकांचा जन्मसिद्ध अधिकारच असतो; तर मोबाईलच्या, गाड्यांच्या शोरूमला भेट देणं हा पुरुषांचा नैसर्गिक आणि घटनादत्त अधिकार असतो. घ्यायचं नाही पण पाहायला काय हरकत आहे? पाहायला थोडेच पैसे लागतात? जस्ट विंडो शॉिंपग.
 
 
प्रश्न असा आहे, कोणतं आणि कोणाचं व्यसन कमी घातक? आणि कुणी कुणाला नियंत्रित करायचं? वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात व्यसनांचे (नेहमीची व्यसनं- दारू, सिगरेट, जुगार, लॉटरी, वेश्यागमन, एकेक सिनेमा एकेका गाण्यासाठी, एकेका हिरोईनसाठी दहादा पाहणं इत्यादी) दुष्परिणाम सगळ्यांना भोगायला लागतात...
 
माधुरी साकुळकर
9850369233