डॉ. सदानंद देशमुख यांच्या कवितेतील स्त्री...

    दिनांक :23-Aug-2019
भेदरलेल्या बोंडीला मुकावे लागते फांदीला
गर्भपात होतो कापसाचा फुलून येण्याआधीच...
पिकांमध्ये स्त्रीची सृजनशीलता शोधत असताना पिकांचा बहर जळणे म्हणजे त्या पिकाचा गर्भपात, अशी स्त्रीस्वरूपातील शेतीमाती आपल्या शब्दांमधून मांडणारे किंवा उगवून येणार्‍या गर्भातल्या प्रत्येक बियाणाला
हुदकण्या देते माती सुटलेला अदृश्य पान्हा पाजून
 
 
 
 
 
 
 
अशा शब्दांनी बियाण्याला पोषक पुरवणार्‍या मातीमध्ये लेकराला दूध पाजणारी आई ज्यांना दिसते ते आणि काळ्या मातीला जे मायच मानतात असे, ‘बारोमास’कार म्हणून महाराष्ट्रभरच नव्हे, तर भारतीय साहित्यात अग्रणी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे कादंबरीकार डॉ. सदानंद देशमुख यांचा जन्म 30 जुलै 1959 रोजी झाला. त्यांच्या ग्रामीण जीवनातील जीवनशैलीवर भाष्य करणार्‍या कविताही त्यांच्या कादंबरीइतक्याच प्रभावी आणि समृद्ध आणि आशयघन असून, ग्रामीण जीवनाचा आरसा आहेत, असे म्हणायला हरकत नाही. ‘गावकळा’ आणि ‘बळ घेऊन भूमीचे’ या कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या दोन कवितासंग्रहांमध्ये जवळपास 234 इतक्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणार्‍या कविता आहेत. सदानंद देशमुख यांना बारोमास या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला. त्यात महत्त्वाचा वाटा त्यांचा ग्रामीण जीवनाशी असलेला संपर्क, ग्रामीण जीवनातील त्यांनी टिपलेले सूक्ष्म अनुभव, स्वतः ग्रामीण संस्कृतीशी त्यांची जोडली गेलेली नाळ, शेतीमातीशी आणि शेतीमातीतील माणसाशी असलेले आत्मीय नाते, यामुळे त्यांच्या लेखनात सजीवता ठासून भरलेली आढळते. त्यांच्या कवितेतील स्त्रियासुद्धा कृषिप्रधान देशामध्ये खेड्यापाड्यांमध्ये वसलेल्या आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांच्या कवितेत आढळणारी स्त्री आपल्या परिसराचा, जीवनशैलीचा, कृषिसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, असे आपल्याला त्यांच्या कविता वाचताना जाणवते. सदानंद देशमुख यांच्या एकंदरच साहित्यामध्ये ग्रामीण संस्कृती खेळत आहे. त्यांच्या कवितांमधील स्त्रीसंदर्भाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कवितेमधील स्त्री हीसुद्धा ग्रामसंस्कृतीचे प्रातिनिधिक प्रतििंबबच आहे. ‘गावकळा’ या आपल्या कवितेमधून सदानंद देशमुख यांनी गावातील पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्णन करत असताना स्त्रियांची अवहेलना कशी केली जाते, याचे जिवंत वर्णन केले आहे,
 
गाणं म्हणे टीव्हीवर रूपवान बया
टांगा तिच्या उघड्याच गोरीपान काया
नाचणारी अशी एक परी आणू घरी 
काळी ढुऽऽस बायको ही झाली इच्यामारी
 
या ओळींमधून आभासी प्रतिमेला भुलून नट्यांच्या मागे वेडेपिसे झालेले पुरुष, आपल्या सुखदुःखात, आपल्याला जन्मभर साथ देणार्‍या बायकोची िंकमत किती हलकटपणे करतात, हे कवीने दाखवून दिले आहे. कष्ट करून काळा रंग झालेली पत्नी ही सिनेमा आणि टीव्हीच्या नटीपेक्षा माणसाच्या मनामध्ये कवडीमोल झाली आहे हे वास्तव प्रचंड अस्वस्थ करणारे आहे, मात्र तितकेच प्रखर सत्यसुद्धा आहे, यात शंका नाही. आता नेमकी ही परिस्थिती का आली असावी? तर विदर्भातील पावसाचे लहरीपणाचे ताळतंत्र, पावसाची कमतरता, त्यामुळे नेहमीच दुष्काळग्रस्त परिस्थिती. त्यात शेतकर्‍यांच्या समस्या वाढत जाणार्‍या, जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत तेथे नटणे, सजणे कुठून शक्य होणार? दिवसभर कष्ट करणार्‍या, उन्हातानात राबणार्‍या स्त्रिया सुंदर आणि आकर्षक कशा दिसू शकतील? अशा विचारातूनच गावातील स्त्रीआकर्षणासाठी हपापलेले जीव म्हणतात, इथं काही मजा नाही, गाईवाणी बाया सार्‍या
चामडीवरची रया झडून नुसत्या हाड्या काड्या झाल्या!
 
अर्थातच ही परिस्थिती माणसावरही असते. पण, पुरुषआकर्षणातून स्त्री कधीही पुरुषाची अशी अवहेलना करत नाही. पुरुष मात्र स्त्रीआकर्षणातून आपल्या हक्काच्या स्त्रीचा अपमान करताना कसलाही विचार करत नाही. निव्वळ कातडीवर प्रेम करणारी पुरुषी व्यवस्था हा आपल्या समाजव्यवस्थेचा सर्वात मोठा दुर्गुण आहे. बरे, हे आकर्षणसक्त पुरुष त्या स्त्रियांतील कलागुणांची कदर करणारे असतात असेही नाही. कारण ‘तमाशाच्या फडावर’ या कवितेमध्ये कवींनी नेमकेपणे त्यांच्या वर्मावर बोट ठेवून हल्लाबोल केला आहे.
 
या तमाशात त काईच मजा येऊन नाही राहिली
डोळे भरून पाहावे अशी एकबी देखणी दिसून नाही राहिली
म्हणून कुणी चेकाळलेला दगड भिरकावतो...
 
अशा विक्षिप्त मन:स्थितीत असलेल्या समाजातील वासनांध पुरुषासमोर तमाशातील स्त्रिया आपली अब्रू पणाला लावून नाचत असतात, त्या वेळी त्यांच्या मनामध्ये कुणाला नादी लावून बरबाद करावे असा हेतू मुळीच नसतो, तर पोटासाठी नाचून स्वतःचे व लेकराबाळांचे पोट भरले पाहिजे, एवढीच त्यांची मागणी असते. दुर्दैवाने ती मागणीही पूर्ण होत नाही. आजही ग्रामीण समाजव्यवस्थेमध्ये हुंडाप्रथा मोठ्या प्रमाणात रुजू आहे. त्यातूनच हुंडाबळी ही एक दुखरी बाजू सातत्याने समोर येते, त्यावर भाष्य करताना कवी म्हणतात, लेक टाकली जाळून, बोंब जळाली म्हणून
 
मह्या उदरात आग बाकी उरते जाळून...
अशी कशी बाई माया माणकाची माती झाली
लेक परायाले देली तिची राख हाती आली!
 
अनोळखी घरांमध्ये चौकशी न करता मुलीचे लग्न लावून दिल्यावर तिची राख हातामध्ये येणे यासारखे दुर्दैव नाही. हा एका मातेचा विलाप कवींनी आपल्या शब्दांतून मांडला आहे. सदानंद देशमुख यांच्या ग्रामीण जीवनातील निरीक्षणातून अतिशय सूक्ष्मपणे त्यांनी हे बारकावे टिपले आहेत. मुलीच्या लग्नामध्ये हुंडा किती घ्यावा? यावरून अनेक लग्नसंबंध बैठकीमध्येच मोडल्याचे दिसून येते. खरे म्हणजे दोन घरे, त्या घरातील माणसे एकमेकांना आवडलेली असतात. मुला-मुलीची पसंती झालेली असते अशा वेळी बैठक बसते आणि त्यात नको त्या गोष्टी प्रतिष्ठेच्या मानल्या जातात आणि बघता बघता होऊ घातलेला संबंध तुटतो, हे आपण सरसकट सर्व जण पाहतो. सदानंद देशमुखसुद्धा ते पाहतात, मात्र त्याचे पडसाद त्यांच्या हृदयावर उमटतात आणि ते हा अनुभव शब्दांकित करताना म्हणतात,
 
माय रडून सांगते पाव्हणे वापस ग गेले,
हुंडा द्याया नाही धन बाप काळजीन बोले,
वल्ल्या अंकुराची व्हते कशी मौत एकाएकी,
जुळवल्या इचाराची मन करे फेकाफेकी!
 
व्यवस्थेमधील हा दोष नेमकेपणाने टिपणे आणि त्यावर भाष्य करणे, हा कवीचा स्थायीभाव असला की, कविता अस्सल आणि जिवंत अनुभूती देते. तोच अनुभव सदानंद देशमुख यांच्या कविता वाचताना येत असतो. माय, माय वावरात गेली, मृग नक्षत्रात अशा कवितांमधून कवीने आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. आता ही मायसुद्धा एक कष्टकरी स्त्री आहे, हे सतत जाणवत राहते.
 
पांदीतल्या रस्त्यातून आहे चिखल सगळा,
अनवाणी तिच्या पायी काटा असेल मोडला.
माय वावरात गेली कशी नाही घरी आली,
काम करता करता याद माहीबी भुलली.
 
लहान मुलाच्या विश्वात जाऊन कवींनी अनवाणी पायाने चालणारी आई म्हणजे तिची आर्थिक परिस्थिती किती बिकट होती हे सुचवले. त्याच वेळी काम करता करता मुलाची आठवणसुद्धा तिला येत नाही, यावरून तिचा जीवन जगण्याचा संघर्ष किती भीषण होता, हे रसिकांना समजते. या संघर्षातही शेतकर्‍याची पत्नी नेहमी हिमतीने उभी असते.
 
चिल्यापिल्ल्याच्या खोप्यानं बाई कुकाच्या धन्यानं, रोज सुखाने जगावं हेच देवाला मागणं. अशा शब्दांत ग्रामीण संस्कृतीमधील स्त्री, पतीचं सुख आणि लेकराबाळांना सुख, याचीच देवाकडे मागणी करते. यातून तिचे कुटुंबवात्सल्य दिसून येते. ते नेमके सदानंद देशमुख यांनी शब्दांकित केले आहे. ‘बळीराजाच्या उदरी आली सीता’ या शब्दांमध्ये कवींनी रामासोबत वनवास पत्करणार्‍या सीतेसोबत बळीराजाच्या पत्नीची तुलना केली आहे. पतीसोबत आजन्म वनवास भोगणार्‍या स्त्रीला त्यांनी सीतेपेक्षाही श्रेष्ठत्व दिले आहे ते अगदी रास्त आहे. ‘धूळमाती’ या कवितेमध्ये
 
मासाळलेली शहरी आई हाडाडलेली गावठी माय
ओले सुके भारे वाहून वाकून गेले तिचे पाय
 
अशा शब्दांमध्ये शहरातील आई आणि गावातील आई यांचे तुलनात्मक वर्णन कवीने केले आहे. गावातील दुष्काळचक्रात फक्त आईच हाडाडलेली नाही, तर
 
तरणीताठी बायको माझी उन्हातानात वाळून गेली
पाण्यासाठी विहीर खोदून तहानलेली राहून गेली
 
या शब्दांमधून कवींनी ग्रामीण संस्कृतीमधील माणसाची बायकोसुद्धा किती हालअपेष्टा सहन करत आहे, हेच सांगितले आहे. माणसाला नेमकं काय आणि किती हवे असते, याचे मोजमाप कुणी करू शकत नाही. आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा हव्यास माणसाला सतत असमाधानी ठेवत असतो, त्यामुळे जगण्याचा आनंद घ्यायचा राहून जातो. त्याच वेळी कुणाकडे काहीही नसताना ते जीवनाचा आनंद घेताना दिसतात आणि मग पुन्हा माणसाची तगमग सुरू होते आणि मग कवीचे शब्द सजीव होऊन सरळ हृदयाला भिडतात, लमाणतांड्यावरच्या पोरी, म्हणत राहतात भरलं गाणं आणि आमच्या भरल्या घरात, सारं असून केविलवाणं...
 
आपल्या घरामध्ये हव्यासापोटी सतत काहीतरी कमतरता जाणवत राहते, प्रसन्नता वाटत नाही. ग्रामीण संस्कृतीत बोलायचे झाल्यास घर दण दण वाटत नाही. त्याच वेळी ज्यांची संध्याकाळच्या जेवणाची सोय आहे िंकवा नाही अशा पालामध्ये जगणार्‍या पोरींच्या गाण्याला जीवनगाणे समजून प्रेरणा घेत आपण जीवन जगले पाहिजे, असे कवी सुचवतात. सदानंद देशमुख यांनी आपल्या अनेक कवितांमधून स्त्रीजीवनाचे बारकावे टिपत स्त्रीजीवनाचे चित्रण केले आहे.
 
भाऊ नसलेल्या बहिणीला
पुन्हा पुन्हा नजर बारीक करूनही
सापडत नाही आभाळातला भाऊ
भाऊबीजेच्या ममताळू संध्याकाळी
तिचे डोळे पश्चिमेकडचे आभाळ निरखत
इकडून तिकडे पडतात चळी.
 
भाऊबीजसारख्या सणाला भाऊ नाही म्हणून चंद्राची वाट पाहून त्याला भाऊ म्हणून ओवाळणार्‍या स्त्रीची तगमग कवीने नेमक्या शब्दांत टिपली आहे. लोक सतत चंद्रावर गेले तरी भाऊ नसलेल्या सर्व बहिणींसाठी चंद्र भाऊ आहे आणि म्हणूनच तो तमाम भारतीयांचा मामा आहे, असे म्हणायला हरकत नाही. अर्धांगिनी म्हणून जीवन जगत असताना स्त्री, पुरुषाला किती साथ देते, याचे वर्णन ‘घर’ या कवितेमध्ये कवींनी केले आहे.
 
त्याने कुडासाठी उभ्या केलेल्या
निरगुडीच्या जाळीदार तकलादू िंभती,
मजबूत राहाव्यात म्हणून ती गिलावा देते,
घोळून घोळून लोणीदार केलेल्या मऊसूत चिखलाच्या गोळ्याचा...
 
अर्थात हे िंलपणे वरवर दिसते तितके साधे नाही तर हे िंलपण आहे संसाराला, पतीच्या मनाला, संबंध आणि कुटुंबाला... यामधून पुरुषाने घर बांधले, त्याला घरपण देण्याचे खरे काम स्त्री करत असते, असे कवींना सांगायचे आहे. सदानंद देशमुख हाडामांसाच्या शेतकर्‍याचे दुःख पाहून कळवळून जातात. शेतकर्‍यांचे भाग्य कोणी लिहिलं? असा प्रश्न सतत त्यांना पडत असतो. त्याच वेळी त्याच्याशी संवाद साधत असताना ते म्हणतात,
 
घामाच्या धारा पुसत धपापताना आठवत असेल
तुला लहानपणी तुझ्या आईने वारंवार दिलेली
तुझे घर उन्हात बांधण्याची धमकी...
 
एक स्त्री म्हणून आईच्या शब्दांमध्ये इतकी सत्यता उतरते की, त्यामध्ये शेतकर्‍यांचे संपूर्ण आयुष्य उन्हात जाते. मुलाबद्दल आई जे बोलते ते सत्यात उतरते, असे म्हणतात. म्हणून निदान आईने तरी मुलाचे हित िंचतावे असे म्हणतात. एकाच वेळी स्त्रीच्या शब्दाची थोरवी आणि शेतकर्‍यांचे हाल एकाच वेळी शब्दांकित केले आहेत. आपल्या संचितातील दुःख हे दैवाने दिलेले असून देवच ते दूर करू शकतो. अशा भाबड्या समजुतीने देवासमोर गार्‍हाणं मांडणार्‍या स्त्रियांबाबत कवी म्हणतात,
 
अशा किती अभागिनी
लेखाजोखा मांडून गेल्या असतील
आपल्या दुखर्‍या आयुष्याचा... 
उभार दगडी िंलगावर डोके ठेवून हळदी कुंकवातून घाम गळताना!
 
संपूर्ण आयुष्य आपलं दुःख दूर करण्यासाठी देवाला विणवणार्‍या अशा कितीतरी अभागी स्त्रिया आपण सर्व जण पाहत असतो. खरेतर त्यांचे दुःख दूर करण्यासाठी माणूस समोर आला तर त्यांना देवाला विनंती करण्याची गरज उरत नाही. हे कोणी समजून घेत नाही. िंलबोळ्या वेचणार्‍या पोरी, हा ग्रामीण भागामध्ये सर्रास येणारा अनुभव सदानंद देशमुख यांनी कवितेमधून मांडत त्या मुलींचे दुःख, त्या मुलींची स्वप्ने आणि त्यांचा भीषण आणि समस्याग्रस्त वर्तमान याचे वर्णन करत रसिकांना अस्वस्थ करणार्‍या परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
िंलबोळ्या वेचणार्‍या पोरींच्या डोळ्यात
एक विचार उसळी मारणारा
दहा किलो वजनाच्या कडूपणातून
कोणता उभार गोडवा आणता येईल
अभावग्रस्त दळभद्री आयुष्यात?
 
हा प्रश्न कवी जेव्हा विचारतात तेव्हा खरोखरच आयुष्यामध्ये गोडवा आणण्यासाठी कडूिंलबाच्या कडूशार िंलबोळ्या डोक्यावर वाहत नेण्याचे काम आपल्या देशातील स्त्रियांना करावे लागते. त्यांची स्वप्ने कडूपणाच्या वजनावर आकार घेत असतात, त्यांचे संसार कडूिंलबाच्या वासाने गंधाळत असतात. ही विलक्षण विषमतेची आणि भीषणतेची जाणीव कवीने करून दिली आहे. अशी अनेक स्वप्ने स्त्रिया पाहतात, त्यातील अनेक स्वप्ने अधुरी आणि अपूर्ण राहतात. असंच एखादं स्वप्न भंगलेली स्त्री गतकाळातील आठवणीत डोकावते आणि अस्वस्थपणे म्हणते,
 
पोळला शृंगार सख्या तुझ्याविण पुन्हा सुनसान झाले मन!
रेखते रांगोळी सुन्या मनावर आज अनावर आठवण!
 
जुन्या आठवणीमध्ये जीव गुंतला असताना अंगणामध्ये रांगोळी काढणारी स्त्री खरेतर ती रांगोळी उदास मनावर काढत असते, असेच कवी म्हणतात. मात्र, रांगोळी काढताना कालच्या आठवणीच्या खोल गर्तेत गुंतून राहून आजचा संसार नीट करण्याचा तिचा प्रयत्न रांगोळी काढताना या दोन शब्दांमधून अधोरेखित केला गेला आहे. तसेही घरंदाज स्त्रिया आपले दुःख आपल्यापाशी ठेवतात. असे सांगताना ‘तोल’ या कवितेमध्ये कवी म्हणतात,
 
असे घरंदाज दुःख त्याला शालीन झालर
कढ हुंदक्याचे दाबे ओठी दाबला पदर
 
ओठामध्ये पदर दाबून आपले दुःख मनाच्या गाभार्‍यात खोलवर कोंडणार्‍या उदास वाड्यातील स्त्रियांचे दुःख सदानंद देशमुख यांनी आपल्या कवितेमधून व्यक्त केले आहे. झालं माहेर भोगून कवितेमध्येही सासरला जाणारी तरुण स्त्री जेव्हा माहेरची वाट सोडून जाते तेव्हा अनेक गोष्टी सोडून जात असते. त्याबद्दल ती रडत रडत मनमोकळेपणाने बोलतेसुद्धा, पण तरीही तिच्या मनातील एक कोपरा अव्यक्त असतो. त्याबद्दल बोलताना कवी म्हणतात,
 
पूनवेचा चांद तसं कुंकू शोभंल ललाटी 
जुन्या दिवसाला गच्च थापलेली ताटी
 
या ओळींमधून जुने मंतरलेले दिवस असतात, त्या दिवसाला पूर्णपणे विसरून जाण्यासाठी थापलेली ताटी ही सुंदर उपमा कवीने वापरली आहे. एकदा ही ताटी थापली की आतलं बाहेर आणि बाहेरचं आत जाऊ शकत नाही. थोडक्यात, एकदा स्त्री संसारात पडली की, तिच्या मनामध्ये दुसरा कोणी डोकावू नये आणि मनाच्या कोपर्‍यातून पूर्वायुष्यातील कोणी बाहेर येऊ नये, असा दंडकच आपल्या समाजव्यवस्थेने घालून दिला आहे, असे कवीने स्पष्टपणे मांडले आहे. ग्रामीण जीवनातील संस्कृतीमध्ये जगत असताना ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवन रेखाटत असतानाच कवी भावनिक होत, काही ठिकाणी प्रेमपर्वात आणि प्रणयतुंबा या विशेष भागांमध्ये मी-तू या पातळीवर प्रियेसोबत मनोहरी संवाद साधताना दिसतात. हा संवादसुद्धा कष्टकरी स्त्रीला समोर ठेवूनच साधलेला आहे. यातच स्त्रीचे लावण्य, मनोस्पंदन, तिची मानसिक अस्वस्थता आणि प्रणयोत्सुकता यांचे अप्रतिम वर्णन कवीने केलेले आहे.
 
गाभुळावा पाड तसा यौवनला देह
किती डोळ्यावर त्याने पसरला मोह
 
अशा शब्दांमध्ये स्त्रीच्या तारुण्याचे वर्णन आणि त्याच वेळी शरीर आकर्षणाचा इतरांना पडणारा मोह, इत्यादी गोष्टी त्यांनी चितारल्या आहेतच. नाते, तू आहेस म्हणजे, ओढ, दविंबदू, अशा कवितांमधून हा प्रणयतुंबा अधिक आकर्षक झाला आहे, असे म्हणण्यापेक्षा भावनेने भरून गेला आहे, बहरून आला आहे, असे म्हणणे जास्त सोयिस्कर होईल.
 
रात सरता सरता
हळू चंद्र मालवला
तुझ्या कपाळीला टिळा
माझ्या भाळावर आला
या शब्दांतून िंकवा
झाले आभाळाचे डोळे आणि झाडवन धुके,
माझ्या ओठांचा ओलावा तुझ्या गालावर सुके
 
अशा शब्दांतून प्रणयविभोर साजन आपल्या प्रियतमेशी गुजगोष्टी करताना व्यक्त होतो. स्त्री मात्र असेल तेथे सुखी राहण्याचा प्रयत्न करत असते िंकवा तसा भास तरी निर्माण करत असते. ते सांगताना कवी म्हणतात,
 
...ती नसेलच उदास होत आताही जिथे
असेल तिथेही कारण आपण जिथे आहोत तिथे
जसे आहोत तसे आनंदीच राहिले पाहिजे कायम,
 
असं ती म्हणायची; तिच्या सहवासात असताना आणि तेच अंमलात आणण्याची कायम अभावात िंकवा प्रभावात कसेही असताना ती नसेलच उदास होत आताही जिथे असेल तिथे.
 
स्त्रीचे आहे ते स्वीकारण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची पद्धत िंकवा तिचा स्वभाव बघून कवीने खुबीने केला आहे. जीवनाच्या वळणावर स्त्रीला समोर येईल त्याला हो म्हणावे लागते आणि आनंद मानावा लागतो, असेसुद्धा या ठिकाणी अधोरेखित झालेले दिसते. अशाप्रकारे महाराष्ट्र साहित्यरसिकांच्या मनावर बारोमास, तहान, चारीमेरा अशा कादंबर्‍यांसोबतच कवितांमधूनसुद्धा ग्रामीण संस्कृतीचे जिवंत वर्णन करणारे सदानंद देशमुख यांच्या कवितेतील स्त्री कधी विदर्भातील समस्याग्रस्त शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा देऊन खंबीरपणे उभी आहे, तर कधी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्वतःच्या मनावर, शरीरावर होणारे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी आहे. कधी स्वतःचे सुख त्यागून पती आणि लेकराचे सुख ईश्वराकडे मागणारी, प्रसंगी दगडाच्या देवाकडे स्वतःवरील अन्याय, अत्याचाराचा पाढा वाचणारी, तर कधी प्रेमपर्वातील अल्लड, अवखळ प्रिया आणि प्रणयतुंब्यात प्रणयोत्सुक साजणीच्या रूपामध्ये डॉ. सदानंद देशमुख यांच्या कवितेमधून भेटते. सरतेशेवटी सदानंद देशमुख यांच्या शब्दांत सांगायचे तर,
 
ती दचकते, उठते, सावरते हळूच थोपटते
त्याचे घामेजले कपाळ पदराने पुसते मान, कपाळावरचा घाम...
ती थोपटत राहते त्याचं ललाट समजूतदार मनाने,
आपुलकीच्या स्पर्शाने...
 
अगदी साध्या शब्दांतून संसारामध्ये रात्री-बेरात्री भयाण स्वप्न पाहणार्‍या किंवा भीषण वास्तवात अडकलेल्या, गोंधळलेल्या, घाबरलेल्या पुरुषाला धीरगंभीरपणे साथ देणारी स्त्री डॉ. सदानंद देशमुख यांच्या कवितेमधून आपल्याला भेटते आणि आपल्या सभोवताली, संपर्कात राहणार्‍या, वावरणार्‍या स्त्रीला कवीने शब्दांकित करून आपल्यासमोर उभे केले आहे, याची जाणीव आपल्याला होते. यातच कवीच्या प्रतिभेची शक्ती आपल्याला कळते.
 
किरण डोंगरदिवे  
7588565576