हजारोंच्या उपस्थितीत प्रभाकरराव मामुलकर यांना साश्रुनयनांनी निरोप

    दिनांक :24-Aug-2019
गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित खर्च पूरग्रस्तांना मदत 
 
राजुरा,
ज्येष्ठ काँग्रेस नेते, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ,लोकनेते ,प्रभाकरराव मामुलकर यांच्यावर आज शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व पक्षातील दिग्गज राजकीय मंडळी तसेच हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले.
 
अंत्यसंस्कारानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया , काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे व अन्य नेते तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.
 

 
 
पूर पीडितांना मदतीचा हात
गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित रक्कम कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूरग्रस्त पीडित कुटुंबीयांना मदत म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली. माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनीही समाजसेवेचा वसा घेऊन सामाजिक व राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. तोच वारसा पुढे चालवीत श्रीमती सुमनताई प्रभाकर मामुलकर, सुधीर दौलतराव नलगे, अविनाश नारायणराव जाधव, अभिजीत बबनराव भुते आणि आप्तेष्टांनी गंगा पूजनाचा कार्यक्रम थोडक्यात आटपून कार्यक्रमाचे जास्त जास्त उर्वरित निधी पूर पीडितांना देण्याचे जाहीर केले. माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन येत्या दोन-तीन दिवसात राजुरा येथे करण्यात येणार आहे.